स्त्री समर्थ : अस्वस्थ आत्मा Print

डॉ. प्रिया अमोद , शनिवार , १४  जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

श्रीकला जाधव म्हणजे अस्वस्थ आत्मा आहेत. एक गोष्ट शिकून थांबणं त्यांना माहिती नाहीच म्हणूनच त्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल ७० कोर्सेस केले. अनेक व्यवसाय सुरू केले. शोभेच्या  वस्तूंची प्रदर्शने भरवली. अनेक घरांत रोजच्या रोज ताज्या भाज्या थेट शेतातून पोहोचवण्याचा व्यवसाय केला. पहिल्याच वर्षी ८ लाख रुपयांची ग्रंथ विक्री करण्याचा उपक्रम केला. सामाजिक कार्यही करताहेत. स्वत:वरच्या दुर्धर आजारावर मात करत स्त्री सामर्थ्यांचा नवा अध्याय लिहिणाऱ्या श्रीकला यांच्या विषयी..
सं कटाला संधी आणि संधीला आव्हान समजून वाटचाल करणे हेच ज्यांचे आयुष्य बनले त्या श्रीकला उत्तमराव जाधव यांनी कुठल्याही परिस्थितीत चिकाटी सोडली नाही. कधी कलेच्या क्षेत्रात, कधी शेती उद्योग तर कधी पवनचक्की असे विविध उद्योग त्यांनी आजवर केले आहेत. मुंबईत वाढलेल्या श्रीकला (पूर्वाश्रमीच्या रेखा अनाजी सावंत) यांना नृत्य-नाटक याची लहानपणापासून आवड होती. शाळेतल्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन त्या नंबर पटकवायच्या. सोळाव्या वर्षांपासून त्यांनी सुधाताई करमरकरांच्या बालनाटय़ातून काम करायला सुरुवात केली. पुढे मोहन तोंडवळकरांच्या ‘पर्याय’, ‘पतिव्रता’सारख्या व्यावसायिक नाटकांतून भूमिका केल्या. नाटकांतून काम करत असतानाच जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून फॅशन आर्ट्समधील पदवी घेतली. चित्रपटाच्या ऑफर्स यायला लागल्या, पण घरातून विरोध झाला. चित्रपटात काम करणाऱ्या मुलीला मराठा समाजात स्थळ मिळणार नाही, असा विचार करून श्रीकलांच्या अभिनय करण्यावर बंदी आली. पण स्वस्थ बसणं रक्तात नव्हतंच. श्रीकलांनी व्यवसाय करण्याच्या इच्छेपोटी विमा सल्लागार म्हणून काम सुरू केले. बोलका स्वभाव, मेहनत करण्याची तयारी यामुळे चांगला प्रतिसाद मिळू लागला. याच बरोबर सतत नवीन शिकण्याची इच्छा होती, त्यामुळे समाजशास्त्रात पदवी, टेक्सटाइल डिझाइनिंग अशा शिक्षणासोबतच त्यांनी फुले बनवणे, बाटिक, हस्तकला, कॅटरिंग, स्क्रीनप्रिंटिंग असे छोटे छोटे कोर्सेस केले. कुठलीही गोष्ट परफेक्ट जमत नाही तोवर पुन्हा पुन्हा शिकण्याचा त्यांचा स्वभाव, त्यामुळे आईस्क्रीम बनवण्याचा कोर्स तीन ठिकाणी जाऊन केला. आजवर श्रीकलांनी असे सत्तर कोर्सेस केले आहेत.
१९८५ साली श्रीकलांनी घरीच ‘कलासागर छंद वर्ग’ सुरू केले. वेगवेगळ्या हस्तकला, चित्रकला शिकवतानाच हॉटेलमध्ये चित्रे काढणे, म्युरल्स करणे असे उद्योग सुरूच होतेच. १९८९ सालापासून त्यांनी काचेच्या शोपीसेसचे प्रदर्शन भरवायला सुरुवात केली. त्यासाठी राजकोट, फिरोझाबाद येथे स्वत: जाऊन काचेची खरेदी करू लागल्या. श्रीकलांच्या प्रदर्शनांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला. मिळालेल्या पैशातून त्यांनी पुण्यात फ्लॅट घेतला, गुंतवणूक म्हणून सोने घेतले. त्यांच्या वडिलांनी श्रीकलांना जागा घेऊन दिली आणि त्यांनी ‘कलासागर हाऊस ऑफ गिफ्ट्स’ हे दुकान सुरू केलं. तिथे मुद्दाम नापास झालेल्या मुलांना काम दिलं. हळूहळू चांगला जम बसला. श्रीकलांच्या हाताखाली नऊ माणसे काम करू लागली. कॉर्पोरेट गिफ्टच्या ऑडर्स मिळू लागल्या. १९९१ साली श्रीकलांनी आपली पहिली फियाट गाडी घेतली. उद्योगात भरभराट होत होती. १९९४ साली त्यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार मिळाला. त्यानंतर दहा दिवसांनीच एक दुर्दैवी अपघात घडला. घरीच दोनेक फूट उंच असलेल्या पलंगावरून श्रीकला खाली पडल्या. डोक्याला मार बसला. सुरुवातीला फीट येऊ लागल्या, नंतर डॉक्टरांनी ‘न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर’चे निदान केले. सतत धावपळ, नवीन शिकण्यासाठी धडपड, चैतन्याने भरलेल्या श्रीकला अचेतन अवस्थेत जाऊ लागल्या. तीन-चार महिने फक्त झोपून राहू लागल्या. खाणे-पिणे, नैसर्गिक विधी कशाचीही संवेदना जाणवत नसे. फारसे आशादायी चित्र नव्हते.  त्या जेव्हा ठीक असत तेव्हा श्रीकलांना मागचे काही आठवत नसे. डॉक्टरांच्या मते, हा एक दुर्धर विकार होता, बरे होण्याची कसलीही आशा नव्हती. आजारपणामुळे सगळा उद्योग बंद पडला. पुन्हा शून्यावर यायला झाले. या कठीण काळात श्रीकलांनी ‘आपण बरे व्हायचेच’ असा पण केला. योगासने करू लागल्या. ध्यान, प्राणायाम, प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांना अचेतन अवस्थेचे अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण कमी झाले. अचेतन अवस्था दोन-तीन महिन्यांवरून दोन आठवडे आणि नंतर एक आठवडय़ावर आली. याच दरम्यान आई-वडिलांचा आधार गेला होता. पुन्हा उभे राहायचे असे ठरवून त्यांनी श्रद्धानंद महिलाश्रमात अधीक्षका म्हणून नोकरी पत्करली. क्षयरोग, त्वचाविकार झालेल्या मुलींची सेवा केली. याच सुमारास त्यांना उत्तमराव जाधव यांचे स्थळ आले. ते सेंट्रल एक्साइजमध्ये कमिशनर होते. २००६ साली श्रीकला विवाहबद्ध झाल्या. त्यांच्या आजाराची पूर्वकल्पना देऊनही उत्तमरावांनी त्यांना स्वीकारले आणि अचेतन अवस्थेत श्रीकलांची सगळ्या प्रकारची सेवा केली.
‘माझ्या पतींनी मला नुसते स्वीकारलेच नाही, तर माझ्यातील उद्योजिकेत पुन्हा आत्मविश्वास भरला.’ श्रीकला भावूक होऊन सांगतात. उत्तमराव यांचे मूळ सांगली जिल्ह्य़ातील सुलतानगादे (ता. खानापूर). तिथल्या भाजी-फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा ही त्यांची इच्छा होती. थेट वितरणाची कल्पना त्यांनी श्रीकलांसमोर मांडली. त्यातून ‘श्रीशैल्य शेती उत्पादन’ या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुलतानगादेमधील भाजी-फळे थेट मुंबईला आणून विकायची. सेंद्रीय खत, रसायनांचा अल्प वापर करून पिकवलेल्या या शेतीमालाचा शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार होता. २००७ सालापासून ‘श्रीशैल्य’ची भाजी-फळे विक्री मुंबईत सुरू झाली. वडाळ्यात श्रीकलांनी भाडय़ाने जागा घेतली. सुरुवातीचे दोन आठवडे अल्प प्रतिसाद मिळाला. मग श्रीकलांनी व्हॅनमध्ये भाजी-फळे ठेवली आणि सकाळी सहा वाजता शिवाजी पार्कमध्ये गाडी लावली. थेट शेतावरची, ताजी, रससशीत भाजी लोक घेऊ लागले. चांगला प्रतिसाद मिळू लागला. स्वत: पहाटे पाच वाजता उठून श्रीकला गाडी घेऊन ब्रीच कँडी, सायन, दादर येथे जायच्या. लोक त्यांच्या गाडीची वाट पाहू लागले. एकाच्या तीन गाडय़ा झाल्या. नऊ माणसे या उद्योगात काम करू लागली. ज्या कुटुंबांना भाजी हवी आहे अशा कुटुंबांसाठी श्रीकलांनी ‘सभासद योजना’ सुरु केली. याही योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. साडेचारशे सभासद झाले. रोज सत्तर घरांत थेट भाजी पोहचवली जाऊ लागली. बाजारभावापेक्षा वीस टक्के कमी दराने मिळणारी सेंद्रीय भाजी चांगलीच लोकप्रिय झाली. परंतु पतीची पुण्याला बदली झाल्यामुळे २०११ साली श्रीकलांना पुण्याला यावे लागले. आपला चांगला चालणारा उद्योग कुणाला तरी विकण्यापेक्षा, कामगारांना देऊन त्या पुण्याला आल्या. कामगारांनी हा उद्योग चालवून समृद्ध व्हावे हा त्यामागचा उद्देश होता.
श्रीकलांच्या पतीची पुण्याहून थोडय़ाच दिवसात कोल्हापूरला अप्पर आयुक्त म्हणून बदली झाली. कोल्हापुरात आल्यावर श्रीकला यांनी प्रकाशन व्यवसाय सुरू केला. मुलांच्या निर्मितीक्षम मनाचा विकास व्हावा यासाठी पहिली ते आठवी वर्गासाठी शैक्षणिक साहित्याच्या पुस्तकांची निर्मिती केली. मराठी व इंग्रजी भाषेतील ही पुस्तके विक्री करण्याचीही जबाबदारी घेतली. सातारा, सांगली, पंढरपूर, रत्नागिरी येथील ग्रंथप्रदर्शनात पहिल्याच वर्षांत आठ लाख रुपयांची विक्री केली. यंदाच्या वर्षी त्यांनी दोन कोटीचे उद्दिष्ट ठरवले आहे.
अलीकडेच श्रीकला यांनी एअर कॅसल्स पब्लिक लिमिटेड ही बांधकाम कंपनी सुरू केली आहे. पती उत्तमराव जाधव यांच्या ‘हवेतील इमले’ या संकल्पनेला आकार देण्याचं काम करण्यात येत असून त्यासाठी त्यांनी जागतिक पेटंटही घेतलं आहे. याशिवाय शेतकऱ्यांची जागा पवनचक्की उभारणीसाठी घेतली जाते आणि शेतकऱ्यांना त्यापासून उत्पन्न काहीच मिळत नाही. या परिस्थितीतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी श्रीकला काम करत आहेत. पवनचक्क्यांच्या उत्पन्नात शेतकऱ्यालाही रॉयल्टीच्या रूपाने हिस्सा मिळावा या भावनेतून लवकरच महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग साकारतो आहे.
श्रीकला यांच्या उद्योजक म्हणून भूमिकेमागे एक सामाजिक विचार आहे. त्यातूनच त्यांनी सुलतानगादेत ‘वृद्ध ठेव योजना’ साकारली गेली आहे. गावातील निराधार, गरीब, आजारी वृद्धांसाठी रोज सकाळ-संध्याकाळ ताजे रुचकर जेवण दिले जाते. जाधवांच्या घरात येऊन तेथील बचतगट हे जेवण तयार करून, डबे पोहचवण्याचे काम करतो आहे.
केवळ आपल्या सुबत्तेसाठी, समृद्धीसाठी उद्योग करायचा नाही, तर समाजासाठी काही करण्याच्या उद्देशातून उद्योग उभा करायचा ही श्रीकलाची इच्छा राहिली आहे. त्यामुळेच आपल्या ड्रायव्हरला स्वत:च्या पोल्ट्रीतील अंडी विकण्याचा व्यवसाय त्यांनी उभा करून दिला आहे.
एका दुर्धर विकाराशी रोज सामना करत श्रीकला कुटुंबीयांच्या साथीने कार्यरत आहेत, ते केवळ दुर्दम्य आशावाद आणि प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर.