स्त्री समर्थ : कचऱ्यातून वेचू फुले Print

अलकनंदा पाध्ये , शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बालविवाह झालेली सुशीला कामधंदा न करणाऱ्या नवऱ्याच्या संसारात पडली खरी परंतु आपल्यालाच घरची कर्र्ती व्हायचंय हे तिच्या लक्षात आलं. दुर्गंधीयुक्त कचरा गोळा करण्यापासून तिने सुरुवात केली आणि एक एक पायऱ्या चढत चढत आज त्यांची संस्था १८ एकर जमिनीवरील कचरा व्यवस्थापनाचे मोठय़ा प्रमाणावर कंत्राट मिळणारी पहिलीच महिला संस्था ठरली आहे. सुशीला म्हणजे त्री सामर्थ्यांचं हे आणखीही एक ठसठशीत उदाहरण..
alt
घरातील कर्ता पुरुष अनेक कारणांनी हतबल झाल्यावर एका अनपढ ‘अबला’ समजल्या जाणाऱ्या सुशीला मोकलने कर्तबगार ‘सबला’ बनून स्वत:ची संसाराची गाडी रुळावर तर आणलीच; परंतु अनेकांच्या रुळावरून घसरलेल्या गाडय़ांना जागेवर आणून गतीही दिली. स्त्री-सामर्थ्यांचा उत्तम आदर्श सुशीलाने अनेकींपुढे ठेवला आहे.
पितृछत्र हरविल्यावर सात-आठ वर्षांची सुशीला मराठवाडय़ातून आपल्या आई आणि दोन भावांसह मुंबापुरीत कामधंदा शोधायला आली. आई मंगलदास मार्केटमध्ये कचरा वेचून  कच्च्याबच्च्यांसाठी चिमणचारा आणू लागली. जेमतेम चवथी शिकलेल्या सुशीलानेही आईबरोबर कचरा वेचण्याचे काम सुरू केले. आईच्या एका कचरा वेचणाऱ्या मैत्रिणीची नजर १०-११ वर्षांच्या सुशीलावर गेली व तिने आपल्या मुलासाठी सुशीलाला मागणी घातली. मुलगी म्हणजे पदरातला निखारा, डोक्यावरचे ओझे मानणाऱ्या समाजातल्या त्या अशिक्षित आईने मुलाची नीट चौकशीही न करता खाणारे एक तोंड कमी होईल, हा विचार करून अवघ्या १२ व्या वर्षी लेकीचा बालविवाह करून दिला. असे करणे कायद्याला धरून नाही, तसेच विवाहनोंदणी आवश्यक असते याची कल्पना दोन्हीकडील मंडळींना असणे शक्यच नव्हते (किंवा त्यांना त्याची गरज वाटत नसेल) असो! मुलगा रेल्वेत कायमचा कामाला नव्हता, तर हंगामी पद्धतीने, कधीतरी सठीसामाशी जाई. बाकीचा वेळ फक्त आळसात आणि चैनीत जाई. छोटय़ा सुशीलाला सासूने मात्र कायमच सांभाळले, समजून घेतले. लग्नानंतर तिला तिच्या मामाकडे गावी संगमनेरला पाठवले. तिथे ती शेतात निंदणी-खुरपणी किंवा रस्तेबांधणीच्या कामावर जाऊन रोजी दोन रुपये कमावीत असे. अशावेळी मामाला कुणी तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल आडून विचारायचेसुद्धा; परंतु ‘मेणाचे मोडायचे आणि शेणाचे जोडायचे कशापायी?’ हा सुशीलाचा खास बिनतोड सवाल विचार करण्याजोगा होता. शेवटी हक्काच्या नवऱ्याच्या म्हणजेच ‘मेणाच्या घरात’ मुंबईला जायचा तिने निर्णय घेतला; परंतु सासरी आल्यावर जाणवले की इतक्या वर्षांत तिच्या ऐतखाऊ नवऱ्यात फारसा फरक पडला नव्हता. एवीतेवी परत आलोच आहोत तर हेच मेणाचे घर वाचवायला तिने कुठेकुठे हालचाल सुरू केली. सुपारी बागेतल्या एका संस्थेत काही काळ चहा देण्याचे काम केले. त्याच वेळी मुंबई महानगरपालिकेची सफाई कामगार भरतीसाठी जाहिरात आली. त्या फॉर्मसाठी दोन रुपये पण तिला भारी होते, पण जिद्दीने अर्ज केला; मात्र सुशीलाच्या आयुष्यात सुखदु:ख कायमच लपंडाव खेळत राहिले. तिची मुलाखत होऊन निवडही झाली; परंतु त्याच वेळी ती कडक डोहाळ्यांनी हैराण झाली होती. कामावर जाणे अशक्यप्राय होते. तिथल्या समजूतदार अधिकाऱ्यांनी तिला प्रसूतीनंतर तीन महिन्यांनी रुजू व्हायची सवलत दिली. सुशीलाने लेकीला जन्म दिला. पहिली बेटी अक्षरश: नोकरीच्या पगाराची पेटी घेऊन आली म्हणतानाच मुलीत व्यंग आढळले. जन्मत: तिच्या हृदयाला भोक होते व पुढील काही वर्षे तिची जातीने देखभाल करणे आवश्यक होते. अर्थातच लेकीच्या मायेपुढे सुशीलाला नोकरीचे दोर तोडावे लागले. ‘पोटचा गोळा की पोटासाठी नोकरी?’ या द्विधा मन:स्थितीत चांगली महानगरपालिकेची नोकरी गमवावी लागली. नवऱ्याच्या तुटपुंज्या पगारात त्याची व्यसने, आजारपण, कुटुंबनियोजनाबद्दल कमालीचे अज्ञान या दुष्टचक्रात सापडलेल्या सुशीलाच्या संसारात आणखी दोन मुलांची भर पडली. घरात पोरांना खायला घालायला आपण अन्नाचा कणही देऊ शकत नाही, ही चिंता कर्त्यां पुरुषाला नाही तर सुशीलाला जाळू लागली. अखेर शेजारणींबरोबर बेलापूरला कचराकुंडय़ांवरचा कचरा गोळा करून पैसे कमवायचा तिने निश्चय केला. पहाटे घर सोडून दुपारी दोनपर्यंत पैसे कमावून त्यातून पोरांसाठी डाळ-तांदूळ आणायचे ठरले; परंतु बेलापूरला कचराकुंडय़ांपाशी पोहोचल्यावर तिला ब्रह्मांड आठवले. पूर्वी मंगलदास मार्केटमध्ये फक्त गोणपाट, कागद, पुठ्ठे असल्या कचऱ्याची तिला सवय होती, पण इथे मात्र सर्व प्रकारचा ओला-सुका दरुगधीयुक्त कचरा तिला उचलायचा होता. अक्षरश: तिथून पळून जावेसे वाटले; परंतु दोन दिवसांची मुलांची भुकेली तोंडे डोळ्यासमोर आली आणि मनावर दगड ठेवून तिने कामाला सुरुवात केली. सुरुवातीला तिच्या सर्वागाला कंड येई, दरुगधीने डोके ठणके, पण दिवसाकाठच्या शंभर सव्वाशे रुपयांसाठी सर्व करावे लागे, कारण घरातील कर्ता पुरुष/स्त्री सब कुछ सुशीलाच होती.
सुखदु:खाच्या लपंडावात एक दिवस सुशीलाच्या बाजूने दान पडले. स्त्रीमुक्ती संघटनेच्या काही कार्यकर्त्यां त्यांना भेटायला गेल्या. विचारपूस केली. कमाईतून दहाजणींचा बचतगट करायला सुचविले आणि इथेच सुशीलाच्या आयुष्याला अनपेक्षित कलाटणी मिळाली. संघटनेने चेंबूर येथे ओल्या कचऱ्यापासून खत बनवायचे शिक्षण द्यायला सुरुवात केली होती. त्या पहिल्या तुकडीत चुणचुणीत सुशीलाची निवड झाली. बीएआरसीमधील तज्ज्ञ त्या सर्वाना आठवडय़ातून एकदा त्यांच्या कामाची पाहणी करून आणखी सूचना देत. तीन महिन्यांत सुशीला या कामी अगदी पटाईत झाली. मग तिची नेमणूक माहूल येथील टाटा कॉलनीत सफाई कामगार म्हणून झाली आणि तिथेच मोठा खड्डा खणून त्यात जमा झालेला कचरा टाकून त्यापासून खत बनविण्याची जबाबदारी तिच्यावर आली. कॉलनीतील इतरांनाही ते प्रशिक्षण देऊ लागली. मधल्या काळात तिच्यातील अंगभूत हुशारी आणि झाडांप्रतीची तिची आवड हेरून तिला माहीम नेचर पार्कमध्ये बागकामाचेही शिक्षण दिले गेले. त्यामुळे आधी कचरा गोळा करणे, त्यापासून खत बनविणे आणि त्या खतांचा वापर करून कॉलनी परिसरात सुंदर-सुंदर बागा फुलविणे हा तिचा हातखंडा झाला. या तिच्या कौशल्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांमधील खत प्रकल्पांवर ती पर्यवेक्षक म्हणून जाऊ लागली. गोड बोलून त्या लोकांचा विश्वास संपादन करून ती त्यांना ओला-सुका कचरा वेगळा का व कसा ठेवावा सांगू लागली. आजपर्यंत तिच्यासारख्या कित्येक स्त्रियांना तिने हे शिक्षण तर दिलेच, पण मुंबई तसेच ठाणे महानगरपालिका, कुलाबा बस डेपोसारख्या कित्येक सार्वजनिक आस्थापनांमध्येही ती इतरांना प्रशिक्षण देते. नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या परिसरात तर तिला लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी महिनाभर घेऊन गेले होते. ती प्रत्यक्ष उपलब्ध नसेल तर मोबाइलवरून तिचा सल्ला घेतला जातो.
 हाती घेतलेल्या कामात झोकून देण्याची वृत्ती आणि प्रामाणिकपणा या गुणांशिवाय आपल्या सहकाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याच्या तिच्या गुणांमुळे १० बचतगट मिळून जी ‘वसुंधरा घनकचरा व्यवस्थापन सेवा सहकारी संस्था’ २००४ साली स्थापन झाली, त्याच्या सचिवपदाची जबाबदारी अर्थातच सुशीलावर पडली. आज या संस्थेच्या सुमारे ७० महिला विविध गृहनिर्माण संस्थांचे घनकचरा व्यवस्थापन पाहतात. कुठलेही काम सहजपणे घेणाऱ्या सुशीलाच्या कर्तृत्वाला धुमारे फुटणारी आणखी एक संधी अलीकडेच चालून आली आणि नेहमीप्रमाणे तिने आणि तिच्या सहकाऱ्यांनी संधीचे सोने केले आहे. २०१० मध्ये ‘वसुंधरा घनकचरा व्यवस्थापना’ला अंधेरी येथील सीप्झ मधील अनेक कारखान्यांच्या परिसरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट मिळाले आहे. १८ एकर जमिनीवरील या कचरा व्यवस्थापनाचे मोठय़ा प्रमाणावर कंत्राट मिळणारी ही पहिलीच महिला संस्था आहे. तिथल्या कारखान्यातून कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची पद्धतशीर विल्हेवाट लावण्याचे महत्त्वाचे काम सुशीला तिच्या १८ सभासद महिलांच्या मदतीने व्यवस्थितपणे पार पाडते. त्या परिसरात त्यांनी प्रथमच बॉयोगॅस प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी सर्वानी उत्साहाने शिक्षणही घेतले आहे. इथल्या सर्व कंपन्यांमध्ये कँटीन सुविधा आहे, त्यामुळे इथल्या कचऱ्यापासूनच्याच बॉयोगॅसवर इथल्या कँटीनमध्ये अन्न शिजायला सुरुवात होते आहे आणि उरलेल्या कचऱ्यापासून खत बनते आहे, ज्यावर सीप्झ परिसरात डोळ्याला आल्हाद देणारी झाडे फळाफुलांनी बहरत आहेत.
या फुलांसारख्या हसऱ्या, प्रसन्न चेहऱ्याची सुशीला आपल्या अन्य सहकाऱ्यांना बचतीचे महत्त्व समजावून सांगते. अनेक बचतगटांमध्ये सामावून घेते. त्यामुळे अनेकींच्या आर्थिक गरजा भागून त्या सुशीलाच्या सल्ल्याने, साहाय्याने स्वयंपूर्ण होत आहेत. आपल्या गटासाठी कचरा वर्गीकरणाची कामे गोडीगुलाबीने मिळवणे, त्यासाठी अनेकांना भेटणे, शिक्षित मध्यमवर्गीयांना कचरा वर्गीकरणाचे महत्त्व सांगतानाच आपल्या भोवतालच्या अशिक्षित स्त्रियांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या सुशीलाची महती, कर्तबगारी आता तिच्या घरच्यांनाही पटली आहे. त्यांनी ती मान्यही केली आहे. कदाचित सुशीलाच्या कर्तबगारीमुळे, तिच्या आदर्श वागणुकीमुळे असेल, आता तिचा पती
नियमित कामावर जातो, तसेच तीन मुलेही नोकरीधंद्याला जातात. घराची आर्थिक घडी सुशीलासारख्या एका सबल कर्तबगार स्त्रीने अगदी चोख बसवली आहे. कचरा टाकून द्यायचा असतो पण सुशीला सारखी माणसं त्या कचऱ्यालाच आपला भाग्योदय करतात तो असा.