स्त्री समर्थ : संघर्ष अस्पर्शित विषयांसाठीचा .. Print

मोहन अटाळकर ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२

वेश्या, कैदी, तृतीयपंथी हे तीन घटक सातत्यानं उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेले. त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी, या प्रामाणिक तळमळीतून अमरावतीच्या रझिया सुलताना यांच्या कार्याला सुरुवात झाली. स्वतच्या अडचणींमध्ये गुंतून न पडता त्यांनी अनेक सामाजिक मात्र अस्पर्शित विषयांसाठी वाहून घेतलं. परितक्त्यांचे प्रश्न, पौगंडावस्थेतील मुलींच्या समस्या अशा अनेक विषयांवर लेखन केलं. जातीधर्मापलीकडे बघून माणूस म्हणून जगण्याचा नवा आयाम शोधणाऱ्या रझिया यांच्या सामर्थ्यांविषयी..
‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ अशी परिस्थिती अनुभवताना दुसऱ्यांसाठी आयुष्य वेचणारे विरळेच. समाजाकडून कायम अस्पर्शित राहिलेल्या विषयावर झपाटलेपणाने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां रझिया सुलताना यांची संघर्षमय जीवनगाथा अशीच वेगळी आणि अनेकांना अंतर्मुख करायला लावणारी आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या, शिक्षा भोगलेले कैदी, तृतीयपंथी हे तीन घटक तर कायम उपेक्षित. त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी, या तळमळीनं रझिया सुलताना यांनी काम सुरू केलं. अनेक अडचणींचा सामना करावा लागूनही त्यांच्यात आत्मविश्वासाचा अंकूर फूलवण्याचं आणि या अंकुराला वाढवण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलयं.
‘वीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एकदा इर्विन रुग्णालयात गेले होते, एका बाईला स्ट्रेचरवरून नेलं जात होतं, ती जोरजोराने विव्हळत होती, तिचं शरीर रक्तानं माखलं होतं. जखमाही दिसत होत्या, माहिती घेतली तेव्हा कळलं की, वेश्या व्यवसायतली ती स्त्री होती आणि पुरूषी अत्याचाराचा तो कळस होता. डॉक्टरांनी या प्रकारांची सवय असावी, असे उपचार सुरू केले. एका महिला डॉक्टरला विचारलं तर या बाया अशाच आहेत, असं म्हणून तीनंही नाक मुरडलं होतं. या महिलांचा ‘दर्द’कुणी समजून घेणार की नाही, असा एक प्रश्न मनात आला आणि त्या क्षणापासून अशा स्त्रियांच्या आयुष्यातील पिळवणूक थांबवण्यासाठी काम करण्याचं ठरवलं.’ रझिया सुलताना सांगत होत्या.
रझिया सुलताना यांच्या आयुष्यात आंतरधर्मीय प्रेमविवाह मोठे वादळ घेऊन आला. वयाच्या विसाव्या वर्षी सुलतान मोबीन यांच्यासोबत झालेल्या विवाहानंतर ‘रजनी’च्या त्या ‘रझिया’ झाल्या. या धर्मातराला त्या सहजपणे सामोरे गेल्या, पण खरा संघर्ष पुढे होता. माहेरी मुक्त वातावरणात वाढलेल्या रझियांवर कर्मठ मुस्लिम आचार-विचारांचे ओझे आले. त्यांच्या लग्नाला माहेरून प्रचंड विरोध होता. माहेर कट्टर हिंदुत्ववादी तर सासर कर्मठ मुस्लिम धर्माभिमानी. सासरच्या लोकांनी त्यांना स्वीकारलं, पण लगेच रझिया यांचा स्पष्टवक्तेपणा आणि सासरकडील लोकांच्या त्यांच्याकडूनच्या अपेक्षा यात द्वंद्व सुरू झालं. रझिया सांगतात, ‘घरात स्त्रियांना दररोज आंघोळीची परवानगी नव्हती, फक्त आठवडय़ातून एकदा. मला तर रोज आंघोळीची सवय. रोजचे वर्तमानपत्र देखील वाचायची पद्धत  नव्हती. पुस्तकं तर फार दूरची बाब. पतीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. अनेकदा रद्दीमध्ये पुस्तकं यायची ती गोळा करून ठेवायची. मी रात्री किंवा दुपारी पानांचाही आवाज होऊ न देता पुस्तकं वाचायची, पण एक दिवस माझी चोरी पकडली गेली. पुस्तकं फाडण्यात आली. खूप आरडाओरडा झाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी होती, ती सोडून दिली. माहेर तुटलेलं आणि सासरी असं वातावरण. माझी स्थिती अडकित्त्यातल्या सुपारीसारखी झाली होती. लहान सहान गोष्टींवरून अपमान व्हायचा. सहन करण्यावाचून पर्याय नव्हता, पण एक मन मात्र बंड करू इच्छित होतं.’
या जाचक बंधनांचा गंभीर परिणाम रझिया यांच्या प्रकृतीवर झाला. त्यांचं मानसिक संतुलनही बिघडलं आणि त्यांच्या त्रासाची तीव्रता वाढली. अखेर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सासरच्या लोकांना ताकीद दिली की, रझियाला तिच्या मनाप्रमाणे वागू द्या, तिच्यावर जबरदस्ती करू नका. तेव्हापासून रझिया यांचा मानसिक छळ कमी झाला. मानसिक संतुलनही सुधारलं. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा ही त्यांच्यासाठी आत्मशक्ती ठरली.
त्याआधी दवाखान्यात नेताना  स्ट्रेचरवरच त्यांनी एक कविता लिहून काढली होती. ‘क्यों मुझे..’ या कवितेचा नंतर त्यांनी विस्तारही केला. त्यांच्यातील कवीमन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी त्यांचं मन व्यथित होत होतं. अखेर एक दिवस धर्य गोळा करून रझिया यांनी लेखणी हाती घेतली आणि अशा स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांची लेखणी ही तलवारीपेक्षा धारदार ठरणार होती.  त्यांनी लिखाणात विविधता आणली. परखडपणे आपले विचार मांडले. परितक्त्यांचे प्रश्न, अनैतिक संबंध, पौगंडावस्थेतील मुलींच्या समस्या इत्यादी अनेक विषयांवर प्रबोधनात्मक लेख लिहिले. सभांमधूनही आपले विचार मांडले. सामाजिक अन्यायाच्या विरोधात लढा देणाऱ्या रझिया यांनी एका वर्तमानपत्रात हज यात्रेकरूंची लूट कशी होते, हे सांगणारा ‘कुर्बानी’ हा लेख लिहिला आणि वादळ उठले, ज्यांनी लेख वाचला नाही, त्यांनाही चेतवण्यात आलं. कट्टरवाद्यांनी त्यांच्या विरोधात अनेक फतवे काढले. ‘रझिया यांना मेल्यावर कब्रस्थानात जागा देऊ नये, मृतदेह नेण्यासाठी कोणत्याही मशिदीने जनाजा देऊ नये, त्यांच्या मुला-मुलींशी कुणीही लग्न करू नये, रझिया यांच्या पतीने त्यांना तलाक द्यावा’ असे ते फतवे होते. या वेळी रझिया यांनी देहदानाचा संकल्प सोडून कट्टरवाद्यांना उत्तर दिलं. तुम्हाला कुणी सांगितलं, आमची मुलं मुसलमानांबरोबर लग्न करणार आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. दृढनिश्चयानं त्या परिस्थितीला सामोऱ्या गेल्या. नंतर पतीचीही साथ लाभल्यानं त्या त्यातून निभावून गेल्या.
आणखी एका प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली. दारिद्रय़रेषेखालील महिलेच्या पतीच्या आकस्मिक मृत्यूनंतर पत्नीला पंतप्रधान कौटुंबिक निधीतून १० हजार रुपयांचे साहित्य मिळते, पण दवाखान्यात पोहचण्यापूर्वी निधन झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवणे हे विधवेसाठी कठीण होतं. रझिया यांनी लेख लिहून या प्रश्नाला वाचा फोडली. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय पोहोचवला आणि एक जाचक अट रद्द करण्यास भाग पाडलं. विधवांना त्याचा फायदा झाला.
वेश्या व्यवसायातील महिलांचे आरोग्य आणि त्यांच्या सामाजिक प्रश्नांवर त्यांचं कार्य सुरूच होतं. या प्रश्नावर त्यांनी चर्चासत्रे, जाणीव जागृती कार्यक्रम घेतले. वेश्यांमध्ये स्वत:च्या आरोग्याविषयीची जागरूकता निर्माण केली. महिलांचे अनेक प्रश्न हाती घेतले आणि त्यांची सोडवणूकही केली. मानवी हक्कांच्या बाबतीतही जागरूकता निर्माण करण्याचं काम सुरू केलं. रझियांना एकदा महिला कैद्यांचे प्रश्न समजले. गृहमंत्रालयाकडे साध्या १५ पैशांच्या पोस्टकार्डाच्या माध्यमातून संपर्क साधला. राजकीय वलय नव्हतं, त्यांनी पाठपुरावा केला आणि नंतर त्यांना तुरूंगात जाण्याची परवानगी मिळाली. त्यांनी कैद्यांची भेट घेतली आणि त्यांचे प्रश्न हाती घेतले. तृतीयपंथीयांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी त्या भोपाळला गेल्या, त्यांनी लगेच त्यांच्यासाठीही कार्य सुरू केलं.
हे सर्व एका क्षणात घडलेलं नाही. रझिया यांना या विषयांची व्याप्ती फार मोठी आहे, हे कळलं होतं. महिलांच्या आयुष्यातील वादळांनी त्यांना आणखी वेगळ्या विषयाकडे नेलं. लैंगिक विषयाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन त्यांना अस्वस्थ करून सोडत होता. स्त्रियांची घुसमट त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती. विवाहबाह्य़ संबंध, सेक्सविषयक जाहिरातींना भुलून संकट ओढवून घेणारे पुरूष, अल्पवयीन मुला-मुलींमध्ये असलेलं सेक्सविषयक अज्ञान अशा अनेक गोष्टींमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या समस्यांवर उत्तर शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अनेकांच्या आयुष्यात आलेल्या सेक्सविषयक समस्या त्यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून सोडवल्या आहेत. अनेक कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचली आहेत. पुरुषांची गरज म्हणून  ‘ठेवलेल्या’ स्त्रियांचे प्रश्न त्यांच्या समोर येताच अशा पुरूषांची वेळप्रसंगी कानउघाडणी करून त्यांना वठणीवर आणण्याचं कामही रझिया यांनी केलं आहे. तृतीयपंथीयांना भिकाऱ्यांसारखं आयुष्य जगावं लागतं. सातत्यानं उपेक्षा वाटायला येते. अशा वेळी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांना मिळकतीचा मार्ग मिळेल आणि हळूहळू समाजात सन्मानाचे स्थानही मिळेल, हा उद्देश डोळयासमोर ठेवून रझियांनी तृतीयपंथीयांना मार्गदर्शन केलं. त्यातील अनेकांनी छोटे-छोटे उद्योग सुरू केले. तृतीयपंथीयांना समाजात भक्कम असे स्थान मिळवून देण्याचा यशस्वी असा प्रयोग त्यांनी अमरावतीत केला आहे. विशेषत: कुठल्याही प्रकारची सरकारी मदत न घेता रझिया यांनी आपलं काम सुरू ठेवलं आहे. वेश्या, तृतीयपंथीय हे घटक दखलपात्रच नाहीत. कैद्यांना कशीही वागणूक मिळाली, तरी त्याची समाजाला पर्वा असण्याचं कारण नसतं, पण तरीही पश्चातापाच्या आगीत होरपळणाऱ्या कैद्यांना सुधारण्याची संधी मिळावी, महिला कैद्यांना मिळणाऱ्या वागणुकीत सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी सातत्यानं आवाज उठवला. त्यात त्यांना यशही मिळालं आहे. वारांगणांचं आर्थिक पुनर्वसन कशा पद्धतीनं होऊ शकतं, त्यांचं जगणं अधिक सुसह्य़ कशा पद्धतीने होऊ शकेल, या विषयावर आता त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे.
रझिया सुलताना सांगतात, ‘महिलांचे अनेक प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. त्याकडे लक्षच दिलं गेलेलं नाही. यौनिक अधिकार, लैंगिक अंधश्रद्धा, एकल महिलांच्या समस्या, असा अनेक विषयांचा गुंता आहे. वेश्येला दुषणे दिली जातात, पण ग्राहक उजळ माथ्यानं वावरत असतो. समलैंगिकता हा तर धगधगता प्रश्न आहे. दवाखान्यांमधील स्त्री भृणहत्येविषयी आज बोललं जात आहे. पण घरगुती उपचार करून गर्भ पाडण्याचे प्रकार कसे रोखणार हा प्रश्न आहे. तृतियपंथियांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देणं, ही कामे करावी लागतील.  व्यसनाधीनता आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वैवाहिक समस्या, लैंगिक स्वास्थ, या प्रश्नांवर अधिक डोळसपणे पाहून काम करावे लागेल. समाजाचा या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल. ’
 वेगवेगळया विषयांवर रझिया सुलताना यांनी आपले परखड विचार लेखांमधून मांडले आहेत. कैद्यांच्या जीवनावर आधारित ‘अपराजिता’, ‘कैद मे है बुलबुल’, ही पुस्तकं त्यांनी लिहिली. मुलांच्या भावविश्वावर आधारित ‘अंथरुणातील बंडखोरी’, ‘मुस्लिमांचे भावविश्व’, ‘नकाब- मुस्लिम महिलांचे प्रश्न’, ‘बचतीचा नवा अर्थ’, ‘गणिकांच्या वेदना’, ‘जचकी’, ‘प्रतिती’, ‘सेक्स- एक सामाजिक प्रतिबिंब’, ‘चांदण्यांचे गुपित’, अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
रझिया सुलताना यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवलं आहे. नॅशनल फाउंडेशनचा पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा सामाजिक कार्य पुरस्कार, हमीद दलवाई पुरस्कार, स्मिता पाटील पुरस्कार, इंडियन मेडिकल असोसिएशनचा पुरस्कार, समर्थनचा १९९४ सालचा मानवी हक्क पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार, संघर्ष पुरस्कार असे अनेक गौरवाचे क्षण त्यांना मिळाले आहेत.
अमरावती शहरात त्या ‘मानव संवाद केंद्र’ चालवतात. महिलांच्या आणि पुरूषांच्या खाजगी आयुष्यातील प्रसंगांवरून होणारे मतभेद, आरोग्य, समलैंगिक प्रश्न, अशा अनेक विषयांवर समुपदेशनाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलं आहे. लिखाणासोबतच चाकोरीबाहेरच्या या विषयांवर सक्रिय भूमिका घेऊन त्या अव्याहतपणे कार्य करीत आहेत.    
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it