स्त्री समर्थ : आधारवड Print

धरित्री जोशी - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

अक्का या नावाने सुपरिचित असलेलं ते एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व.  बारामतीतल्या श्रमिक संघटनेच्या, स्त्रीमुक्ती संघटनेच्या मुख्य संघटक, कार्यवाह म्हणून त्या काम पाहतात. घरकामे करणारी  मोलकरीण, कष्टकरी शेतमजूर ते सामाजिक कार्यात स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी धडाडीची कार्यकर्ती असा त्यांचा प्रवास आहे. त्या अनेक स्त्रियांच्या आधारवड ठरलेल्या रुक्मिणी लोणकर या समर्थ स्त्रीविषयी..
डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती
आलं परीस राबून, आम्ही मरावं किती

    गवताचा भारा बाई गं घेऊन चढावं किती
    आडाचे पाणी बाई गं पाणी वाढावं किती
    घरात तान्हा माझा गं तान्हा रडल किती
    तान्हय़ाचं रडं ऐकून पान्हा येईल किती..
डोंगरी शेत माझं गं, मी बेनू किती..

शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली
पैसेवाल्या पोरांनी जागा बळकावली
गरिबाची पोरं बघा कशी खाली राहिली
मुली कितीक चढती, निम्म्या खाली उतरती
शिक्षणाची गाडी चालली, शिक्षणाची गाडी चालली..

‘‘कष्टकरी शेतकरी महिलेच यथार्थ चित्रण सांगणाऱ्या या ओळी.. गाणाऱ्याही शेतकरी महिलाच.. त्या ज्या आर्ततेने गात होत्या, ते ऐकून उपस्थितांची मने हेलावून जात होती. या ओळींनीच तर माझे जीवनच पालटून गेले..’’ बारामतीच्या धडाडीच्या कार्यकर्त्यां रुक्मिणी रघुनाथ लोणकर सांगत होत्या.. सर्वामध्ये अक्का या नावाने सुपरिचित असलेलं हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. निमित्त होते बारामतीजवळ सुरू असलेल्या शेतकरी-शेतमजूर परिषदेचे. राज्याच्या विविध भागांतून या परिषदेसाठी मोठा जनसमुदाय जमला होता. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. अक्का ज्या ठिकाणी शेतमजुरी करीत असत, त्या ठिकाणापासून अगदी जवळच ही परिषद भरली होती. शेतावरची कामे चालू असतानाच या ओळी कानावर आल्या आणि अक्कांची पावले आपोआपच त्या दिशेने ओढली गेली..
आज अक्का बारामतीत श्रमिक संघटनेच्या, स्त्रीमुक्ती संघटनेच्या मुख्य संघटक, कार्यवाह म्हणून काम पाहतात. घरकामे करणारी मोलकरीण, कष्टकरी शेतमजूर ते सामाजिक कार्यात स्वत:चे स्थान निर्माण करणारी, स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी धडाडीची कार्यकर्ती.. रुक्मिणी अक्कांचा हा सारा प्रवास विलक्षण आहे. मात्र सामाजिक कार्यात वाहून घ्यायचा निर्णय घेतल्यावर सुरुवातीच्या वाटा काही तितक्या सरळ नव्हत्या. अक्कांना सर्वप्रथम तोंड द्यावे लागले ते त्यांच्या कुटुंबाच्याच विरोधाला. वयाच्या ३० वर्षांपर्यंत त्या सासरच्या जबाबदाऱ्या सांभाळत शेतमजुरी करीत होत्या. त्यातून बाईने सामाजिक कार्यात पडणे, हे सासरच्यांना पचनी पडणारे नव्हते. मात्र अक्कांचे ध्येय आता निश्चित झाले होते. स्वत: अन्याय सहन करणार नाही आणि दुसऱ्यावरही अन्याय होऊ देणार नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यानंतर सासरहून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे काही वर्षांनी त्यांचा विवाह रघुनाथ लोणकर यांच्याशी झाला. अक्कांच्या सामाजिक कार्यात आजही लोणकर आणि त्यांचे कुटुंबीय त्यांना भक्कम साथ देत असतात.
अक्कांच्या ठळक सामाजिक कार्याबाबत सांगायचेच झाले तर आजपर्यंत गावातील अनेक सामाजिक विषयांत, महिलांच्या विविध समस्यांप्रश्नी त्या बेधडकपणे उतरल्या आहेत. त्यामध्ये कोतवालांना योग्य मोबदला मिळवण्यासाठीचे आंदोलन असो वा वनकामगारांना न्याय मिळावा यासाठी छेडलेले आंदोलन असो, अशा सर्व आंदोलनांमध्ये अक्का पुढाकाराने सक्रिय राहिल्या आहेत. अंगणवाडी भरतीमध्ये विधवा, परित्यक्तांना प्राधान्य मिळावे तसेच कामाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून अक्कांनी आंदोलने छेडली आहेत. गावातील वयोवृद्ध तसेच निराधारांना पेन्शन मिळावी म्हणून विविध मार्गानी त्यांनी आवाज उठवला आहे. आज आयुष्याच्या उत्तरार्धात फुल ना फुलाची पाकळी म्हणून ज्यांना पेन्शन प्राप्त झाली आहे, असे शेकडो हात अक्कांना आशीर्वादच देत आहेत. गावामध्ये असाच एक धगधगता प्रश्न होता तो शेतावर काम करणाऱ्या शेतमजूर महिलांचा. अशा महिलांच्या बाबतीत सरकार कागदोपत्री फक्त दाखवते, की शेतमजूर महिलांना पुरुषांप्रमाणेच समान वेतन दिले जाते. पण प्रत्यक्षात मात्र वास्तव वेगळेच होते. शेतमजूर महिलांची कामाच्या ठिकाणीही पिळवणूक होत होती. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या महिलांना मात्र अगदी तुटपुंजा पगारच हाती दिला जात असे. उरलेल्या फरकाचे पैसे ‘मधल्या मध्ये’ गायब होत. अक्कांनी बऱ्याच वर्षांपूर्वीच या अघोषित भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला. थेट राज्य सरकारपुढे ही गाऱ्हाणी मांडली आणि तीव्र आंदोलने छेडून सरकारला हे दुष्टचक्र भेदून काढण्यास भाग पाडले. या प्रकरणात थेट सरकारी कर्मचारी, अधिकारीवर्गाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे अक्कांवर दबाव आणण्याचेही प्रयत्न झाले. मात्र त्या न डगमगता या बायांच्या मागे उभ्या राहिल्या आणि त्यांना समान वेतन मिळवून दिलेच. या आणि अशा प्रकारच्या आंदोलनांमुळे अक्कांचा गावात दबदबा वाढू लागला होता. शोषित, पीडित महिलांना अक्का म्हणजे आधारवडच वाटत असत..
१९९०च्या सुमारातील या काही जिवंत आठवणी.. त्या आठवणी सांगताना रुक्मिणी अक्का आजही गदगदतात. सावित्रा कौले नावाची महिला. आपल्या सासरी काबाडकष्ट करून राहात होती. सासरचे हिच्याकडे वारंवार तिच्या आईच्या जमिनीचा वाटा  मागत असत. एकदा ऐन दिवाळीत सासरच्यांनी सावित्राला बेदम मारहाण केली. इतकी की सावित्रा उठून उभीही राहू शकत नव्हती. कित्येक दिवस अंथरुणाला खिळून होती. एक दिवस सासरच्यांची नजर चुकवून सावित्रा कशीबशी उठत बसत घराबाहेर पडली. एस.टी. पकडली आणि थेट अक्कांच्या दारातच हजर! मग अक्कांनी व त्यांच्या कुटुंबीयांनीच हिला आधार दिला, धीर दिला. तिच्यावर योग्य ते औषधोपचार केले. याच काळात अक्कांनी सर्व प्रकार पोलिसांना कळवला आणि सासरच्यांना पोलिसांच्या मदतीने योग्य ती समजही दिली. सावित्राला तिचा हक्क मिळवून दिला. आता सावित्रा तिच्या सासरी सन्मानाने नांदते आहे.. हे आजही सांगताना अक्कांना विलक्षण समाधान वाटते.
अशीच एक घटना घडली सुमन कुंडलिक जाधव यांच्या बाबतीत. सासरचा राजरोजचा छळ सहन करीत सुमनताई आपली दोन मुलगे व एका मुलीसहित नवऱ्याच्या घरी राहात होती. या सुमनताईंना एक दिवस सासू, दिराने हाकलून दिले. पदरी तीन लहान लेकरं असताना ही बाई जाणार कुठे? अशा अवघड काळी तिने माहेरी धाव घेतली. पण माहेरच्यांनीही तिला आसरा देण्यास नकार दिला. हे सर्व समजले तेव्हा अक्कांनी थेट तिला आपल्या घरी बोलवून घेतले. काही काळ आसरा दिला. महत्त्वाचे म्हणजे सुमनताईंकरिता त्या कायदेशीर लढाईसुद्धा लढल्या आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात अक्कांना यश आले.
आणखी एक हृदयद्रावक घटना आहे ती माळेगावच्या शहनाज पठाण हिची. ती सांगताना आजही अक्कांचे मन हेलावते. शहनाज ही तिच्या नवऱ्याची दुसरी बायको. अनेक वर्षे प्रयत्न करूनही त्यांचे पटेना. नवऱ्याने एक दिवस शहनाजला हाकलून दिले. मग शहनाजसाठी अक्कांनी पोटगीचा दावा लावला आणि हा दावा त्या जिंकल्याही. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही तिचा नवरा पोटगी देईना. त्यामुळे अक्कांनी पुन्हा पोलिसांकडे मदत मागितली. पोटगी न भरल्याने तिच्या नवऱ्याला तुरुंगाची हवा खावी लागली. याचा राग म्हणून तुरुंगातून बाहेर आल्यावर तिच्या नवऱ्याने तिला एकटीला रस्त्यात गाठून मारले. त्याने व सासरच्यांनी इतके मारले की तिच्या अंगावरचे संपूर्ण कपडे फाटले होते. ती भर रस्त्यात आक्रोश करत होती, पण तिच्या नवऱ्याची इतकी दहशत होती, की कोणी तिला सोडवायला जायची हिंमत करीत नव्हता. या प्रकरणाची पोलिसांनीही किरकोळ तक्रार नोंदवून घेतली. हा प्रकार समजताक्षणी अक्कांनी शहनाजकडे धाव घेतली. त्या रात्री शहनाजला अक्कांनी तिच्या घरीच ठेवून घेतले. ‘स्थानिक पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नाही हे लक्षात आल्यावर आम्ही लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्या वेळचे वरिष्ठ पोलीस शिंत्रे साहेब यांनी मात्र आम्हाला खूप मदत केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी झटपट पुढची पावले उचलली. पण त्याही पलीकडे जाऊन त्यांच्यातल्या माणुसकीचे दर्शन पदोपदी घडत होते..’ अक्का हे सर्व सांगत असताना आजही त्या भावुक होतात. त्यानंतर या प्रकरणाची सर्वानी तडजोड घडवून आणली. शहनाजला पोटगी मिळाली. आज तिचे जीवन सुरळीत चालू आहे. गावातच अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून ती काम करीत आहे. शहनाज म्हणते, ‘एवढय़ा भीषण परिस्थितीतून बाहेर पडल्यावरही माझे जीवनचक्र सुरूच आहे. मात्र एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे अक्कासारख्या आईमुळे माझा पुनर्जन्मच झाला. मलाही जीवनात प्रेरणा देणारी अक्का ही माझी खरी आई आहे!’
अशा एक ना असंख्य महिला, मुले आहेत ज्यांच्यासाठी अक्का या ना त्या रूपाने आधारवड ठरलेल्या आहेत. शिक्षणाची आस असलेल्या लहानग्यांबद्दल विशेषत: मुलींबद्दल तर अक्कांना जास्त आपुलकी वाटते. प्रत्येक लहान मुलीत त्या स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करतात. आपली खूप शिकण्याची इच्छा अधुरी राहिली.. मात्र ज्या मुलींना शिकायचे आहे त्यांना त्यांच्या परीने शक्य होईल तेवढी मदत करतात.
गेल्या ३० वर्षांहून अधिक काळापासून त्यांनी चालू ठेवलेले समाजसेवेचे व्रत त्या आजही पुढे नेत आहेत. आज त्यांचे वय ५९ वर्षांचे आहे. वय वाढले, शरीर थोडे वयपरत्वे थकले असेलही, पण अक्का मनाने आजही तरुण आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायची चीड आजही त्यांच्या मनात धगधगत आहे. गावासाठी त्यांना अजूनही खूप काही करायचे आहे. त्यांच्या उत्तरायुष्यातही त्यांनी घेतलेले समाजसेवेचे व्रत अखंड चालू राहो, वृद्धिंगत होवो याच शुभेच्छा!