स्त्री समर्थ : गरुडझेप Print

alt

मेधा चुरी , शनिवार , १  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चार मुली झाल्या म्हणून नवऱ्याने ‘टाकून’ दिलेल्या तिने पुरुषाचं प्राबल्य असणाऱ्या सीमेंट ग्रिल्स तयार करण्याच्या व्यवसायात उडी घेतली आणि त्यातून घेतलं स्वत:चं घर, स्वतंत्रपणे उभारलं स्वत:चं वर्कशॉप. इतकंच नाही तर चारही मुलींना आखून दिल्या वाटा कर्तृत्वाच्या. राजश्री कुंभार या सामथ्र्यवान स्त्रीची ही कथा..
नुकतीच कुठे तिने व्यवसायाला सुरुवात केली होती. हाती आलेले पैसे ठेवायला बँकेसारखं सुरक्षित माध्यम नाही म्हणून ती पैसे भरायला बॅंकेत गेली, लिहिता-वाचता येत नसल्यामुळे तिथे असलेल्या एका अनोळखी माणसाकडून फॉर्म भरून घेतला. त्यानेही गोड बोलून तिला मदत केली. फॉर्म भरला. पैसे ताब्यात घेतले. ते भरले. आणि हसून तिचे धन्यवादही स्वीकारले.. पण तीन-चार दिवसांनी तिच्या लक्षात आलं की तिचे पैसे तिच्या नावे जमा झालेच नाहीत.. तिच्या आयुष्यातला हा सर्वांत मोठा धडा होता. काही गोष्टी स्वत: शिकल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आलं आणि ती लिहायला, वाचायला शिकली.. आज तिचे व्यवहार ती मोठय़ा धाडसाने करते. मोबाइलवरून व्यवसायाच्या ऑर्डर मिळवते. त्याच बळावर तिने आपल्या व्यवसायात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे..
तिचे नाव राजश्री मोगलप्पा कुंभार. जन्म गुलबर्गा  जिल्ह्य़ातला. तिच्या माहेरच्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय होता कुंभारकाम. वडील-भाऊ घागर, रांजण, मातीच्या कुंडय़ा, तवे अशा वस्तू लाकडी साच्यातून काढून बनवीत असत, अर्थातच त्यापासून मिळणारे अर्थार्जन मर्यादित होते. तीन बहिणी, दोन भाऊ अशा वाढत्या कुटुंबाला अपुरे होते. त्यामुळे घरच्यांनी भावांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले व राजश्री शिक्षणापासून वंचित राहिली.
घरच्या गरिबीमुळे तिचे लहान वयात लग्न झाले, तिचा नवरा त्याच गावातला.  तिला ‘सवतीला दिले’, म्हणजे पहिल्या पत्नीला मुलं नव्हती, वंशाला दिवा पाहिजे म्हणून हिच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र राजश्रीला चारही मुली झाल्या. मुली होत गेल्या तसं तसा तिचा घरात छळवाद वाढू लागला, पण तिने ठामपणे आपण मुलींची जबाबदारी घेऊन त्यांना शिक्षण देण्याचा निर्धार केला आणि आपल्या लहान मुलींना घेऊन ती मुंबईजवळील विरार या उपनगरात आली ती जवळजवळ वीस वर्षांपूर्वी. या नवीन ठिकाणी आयुष्याची सुरुवात करायची होती..
मुंबईच्या नजीकतेमुळे विरारसारख्या ठिकाणी इमारत निर्माण, बांधकाम क्षेत्र विकसित होऊ लागले होते. एकंदर इमारत निर्माण क्षेत्रात चाललेल्या उलाढालीमुळे त्याच्याशी निगडित अशा विविध कामांचा मोठा पसारा होता, त्यामुळे कामगारवर्गाची गरज होती. याची संधी साधून कामगारांबरोबर काम करता करता राजश्रीला इमारत बांधकामात लागणाऱ्या सीमेंटच्या जाळ्यांचा उद्योग सुचला व तिने छोटय़ा ऑर्डर घेण्यास सुरुवात केली.
तिच्या कामाचा चांगला दर्जा पाहून तिला ऑर्डर्स सहज मिळत गेल्या. सागवानी लाकडाचे साचे आणून वेगवेगळ्या डिझाइनच्या आकाराचे आरसीसीचे साचे तयार करून ती बिल्डर्सना इमारतीसाठी पुरवू लागली. कुणाच्याही आधाराशिवाय स्वत:ची मेहनत आणि हिमतीने. या प्रक्रियेत रि-इन्फोर्स सीमेंट काँक्रीटचे मिश्रण टाकून ते समपातळीत आणावे लागते. नंतर सुकवून मजबूत होण्यासाठी सतत जाळीवर पाणी मारून साचे तयार करावे लागतात. बांधकामाच्या ठिकाणी अवजड तयार जाळ्या पोहोचविण्यासाठी स्वत: तिथे जाऊन लक्ष द्यावे लागते. सुरुवातीच्या काळात तिला हे सगळं स्वत: करावं लागे. आज तिच्याकडे काही मजूर कामाला आहेत. वर्षांला काही लाख रुपयांत तिची उलाढाल आहे.
पुरुषप्रधान असलेल्या या कामात साहजिकच रात्रपाळीसुद्धा करावी लागते. पण त्यामुळे मागे हटेल ती राजश्री कसली? ती अभिमानाने सांगते, ‘‘रात्रपाळीचे काम करताना मला कशाचीही भीती वाटत नाही. मुळातच परिस्थितीने मला खूप काही शिकविले आहे. काही ठिकाणी स्पष्टवक्तेपणा, रोखठोक स्वभाव मला उपयोगी पडतो. कामाची वसुली करताना इमारत व्यवसाय करणाऱ्यांशी शाब्दिक चकमक होते, पण ती तात्पुरती असते.’’ एकदा या व्यवसायात उडी घ्यायची ठरवल्यावर स्वत:ला भक्कमपणे उभं करणं हे गरजेचं आहे. तेच तिने केलं. म्हणूनच तिला दैववादी असणं अजिबात पसंत नाही. प्रयत्न, श्रम तसेच मेहनतीवर तिचा विश्वास आहे. जोपर्यंत तब्येत साथ देते तोपर्यंत या व्यवसायातून मी निवृत्ती घेणार नाही, असं ती ठामपणे सांगते.
याच व्यवसायाच्या फायद्यावर तिने स्वत:च्या मालकीचे घर घेतले आहे. पूजा आर.सी.सी. ग्रिल्स वर्क या नावाने स्वत:चे वर्कशॉप टाकले आहे. एकीचं लग्न स्वकर्तृत्वावर लावलं आता दुसऱ्या दोन मुली महाविद्यालयीन तर धाकटी शालेय शिक्षण घेत आहेत. त्याचं तिला पुरेपूर  समाधान मिळतंय आणि जीवनाची चव चाखता येतेय.. दगदग, धकाधकीतून तिने स्वत:करिता वेगळा वेळ काढला आहे. ‘ओम साई’ महिला मंडळाची ती सदस्य आहे. बहुजन विकास आघाडीच्या स्थानिक सामाजिक कार्यक्रमात तिचा सहभाग असतो.
समूहामध्ये राहिल्यावर बोलायचे कसे, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे, दुसऱ्यांच्या उपयोगी कसे पडायचे हे शिक्षण मिळते. मंडळातून स्त्रियांना मेणबत्त्या तयार करणे, अगरबत्ती, अत्तर यांचे प्रशिक्षण मिळते, ती इतरही बायकांना प्रशिक्षणासाठी प्रवृत्त करते आणि त्याचा तिला अभिमान वाटतो. तसेच बचत गटातही तिचा सक्रिय सहभाग आहे.
गाणगापूरसारख्या गावातून आलेल्या राजश्रीने स्वकर्तृत्वाने व्यवसाय सुरू केला आणि नायगाव, वसई, पालघर, नालासोपारा या गावांपर्यंत आपला माल पुरवून तो  वृद्धिंगत केला आहे. एकटी स्त्री पतीच्या आधाराविना गरुडझेप कशी घेऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
सध्याचा काळ हा संक्रमणाचा आहे. माहिती तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणात स्त्रियादेखील पुरुषांच्या बरोबरीने पुढे जात आहेत. पण स्त्री भ्रूणहत्येसारख्या घटनांमुळे प्रगत समाजाची दुसरी बाजू दिसून येते, अशा वेळी मुलींना ओझे न समजता त्यांना बरोबर घेऊन कशी प्रगती केली जाऊ शकते हे राजश्रीसारख्या ग्रामीण स्त्रीने दाखविले आहे. स्वत:च्या उदाहरणातून ती समाजाला प्रेरणा देत आहे, महिला मंडळातून ती याबाबत जागृती करीत आहे. आज सरकारतर्फे मोठय़ा प्रमाणात स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध आंदोलन सुरू आहे. तिने आपल्या चार मुलींना एकटीने वाढवून या आंदोलनाला सबळ केले आहे.