स्त्री समर्थ : खंबीर नेतृत्वाची रसाळ फळं Print

प्रा.सुलभा चौधरी ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

बदल घडवायचा तर हाती सत्ता हवी, या विचाराने झपाटलेल्या शांताबाई डुकरे  स्वबळावर सरपंच झाल्या. दारूबंदी, ग्राम-स्वच्छता अभियान यांसारखे उपक्रम गावात राबवून त्यांनी गावाचा कायापालट केला. कनिष्ठ वर्गातल्या स्त्रीने पुढे येऊन हा बदल घडवणं, तितकंसं सोपं नव्हतं. पराकोटीचा विरोध असूनही न डगमगता विकासकामांचा त्यांनी पाठपुरावा चालूच ठेवला आणि गावाला प्रगतीपथावर आणलं. आता ग्रामपंचायत सदस्या असणाऱ्या शांताबाई यांचा हा प्रवास..
वर्धा जिल्ह्य़ातले ‘बोदड’ हे एक गाव. अनेक अडचणी व प्रश्न असणारे. या प्रश्नांना उत्तर सापडले शांताबाईंच्या रूपाने! त्या सरपंच म्हणून २००६ साली बिनविरोध निवडून आल्या आणि गावाचा कायापालटच झाला.
सुमनताई बंग यांच्या चेतना विकासतर्फे चालणाऱ्या बचत गटाच्या शांताबाई सक्रिय सदस्या. या बचत गटामार्फत अनेक कामं केली जात होती. त्यातच त्यांनी गरजू शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले. ठोक भावानं धान्य खरेदी करून धान्यकोश तयार करून, गरजूंना धान्य माफक भावात उपलब्ध करून देताना बचत गटाला नफा मिळवून दिला. गटातर्फे किराणा दुकान चालविले. शंभर महिलांनी बुक बायंडिंगचा व्यवसायही काही काळ केला. पण ही सगळी कामं त्यांच्या पातळीवर आणि मर्यादित लोकांपुरतीच होती.
गावातली अनेक वर्षे खोळंबलेली विकासाची कामे करण्यासाठी सत्ता व पदसिद्ध अधिकार हवा म्हणून शांताबाई सरपंचपदासाठी विरोधी पॅनलमधून उभ्या राहिल्या व २००६ साली आदिवासींच्या बेघर वस्तीतून निर्भय उमेदवार म्हणून गोंड, गोवारी, बौद्ध, मुस्लीम गावकऱ्यांनी सरपंचपदाची माळ बिनविरोधपणे शांताबाईंच्या गळ्यात टाकली. अगोदर ग्रामपंचायत सदस्या म्हणून त्या कार्यरत होत्याच. त्यांनी ठामपणे सांगितलं, ‘आमच्या गावात मुळीच जातीभेद नाही. गावातले कोणतेही कार्यक्रम सर्वाच्या सहकार्याने पार पडतात.’ गावकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरत त्यांनी गावातील स्वार्थी लोकांच्या विरोधाला निर्भयपणे तोंड देत गावात अनेक सुधारणा करून खोळंबलेली ग्रामविकास कामे सुरू केली.
दोन वर्षांपूर्वी सरपंच या नात्याने पदभार सांभाळताना सर्वप्रथम त्यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाची डागडुजी करून घेतली. अगदी घरोघरी जाऊन, जास्तीत जास्त संख्येने महिलांनी आपापले प्रश्न घेऊन उपस्थित राहण्याचा आग्रह धरला. तसेच आपले प्रश्न ग्रामसभेत धीटपणे मांडण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले. महिलांकडून आलेल्या विकासकामांच्या संदर्भात, प्रश्नांवर सामूहिक चर्चा घडवून आणल्या. विकासनिधीतला पैसा गावकऱ्यांसाठीच खर्च व्हावा यासाठी शांताबाईंनी यापूर्वीच्या विकासनिधीचा शोध घेण्यासाठी ग्रामसभेत, ग्रामसेवकाकडून जुना रेकॉर्ड व नोंदी वाचून घेतल्या. त्यात बऱ्याच त्रुटी व अफरातफरीचे घोटाळे स्पष्ट झाले. तसेच बरेच दिवस प्रत्यक्ष हजर न राहता ग्रामसेवकाने सह्य़ा केल्याचे निदर्शनास आले. तसंच स्त्री सरपंच म्हणून उर्मटपणे वागणाऱ्या, गैरकारभारात सहभागी असणाऱ्या त्या ग्रामसेवकाची लेखी तक्रार शांताबाईंनी कलेक्टरकडे केली. त्यामुळे बेजबाबदार व अप्रामाणिक ग्रामसेवकाला बडतर्फ  करून दुसरा ग्रामसेवक मिळाला. साहजिकच विकासकामांना वेग आला.
गेल्या दशकापासून गावकरी अनेक समस्यांनी त्रस्त होते. बहुतेक घरांच्या बाजूला खतांचे ढिगारे होते. तशातच सांडपाण्यामुळे जागोजाग दलदलीचे साम्राज्य पसरले होते. शांताबाईंनी प्रथम खतांचे ढिगारे उचलण्याच्या कामावर लक्ष केंद्रित केले. ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत घरोघरी संडास-बाथरूम बांधण्याचे काम हाती घेऊन गाव हागणदारी मुक्त केला. त्यांच्या कार्यकाळात पक्क्य़ा गटारी व नाल्या बांधल्या गेल्या.
आदिवासी भागात वीज व पाणीपुरवठा नव्हता. आपल्या प्रभागातल्या या अडचणी दूर करीत वीज व पाणीपुरवठा सुरू झाला.
ग्रामसभेत प्रत्येक निर्णय होऊ लागल्याने विकासकामात लोकसहभाग व लोकजागृती वाढू लागली. ग्रामस्वच्छता अभियानाच्या उत्तम कामाबद्दल बोदड ग्रामपंचायतीला १५ हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला.
चेतना विकासतर्फे गावात सुरू झालेली बालवाडी व बालभवन उत्तमप्रकारे सुरू आहे. गावातल्या शाळेला पंचायत समितीचा दहा हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला, तर अंगणवाडीला पाच हजार रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला. अर्थात हे पुरस्कार मिळवून देण्यात शांताबाईंचा सिंहाचा वाटा आहे.
गावातल्या पाच शेतांमध्ये शेततळी तयार झाली असून, गुराढोरांना पाणी पिण्यासाठी सोयीच्या जागी त्यांच्यासाठी पाण्याचे हौद बांधले. गावात पाच घरी गोबर गॅस प्लॅन्ट सुरू आहेत.
सर्व कामे पद्धतशीर व वेळेवर व्हावीत म्हणून शांताबाईंनी विभागवार समित्या बनवून जबाबदारीचे पद्धतशीर वाटप केले, म्हणून विकासकामे वेगात व वेळेवर पूर्ण झाली.
शांताबाईंच्या कल्पनेप्रमाणे गावात वेळोवेळी प्रभात फेरी काढून ‘झाडे लावा झाडे जगवा’ आणि उपयुक्त लसीकरणाचे संदेश घरोघरी पोहचविले जातात.
वेळोवेळी गावात गुरांची आरोग्य शिबिरे व ग्रामस्थांसाठी आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत. गावात आणि शेतशिवारात होणाऱ्या वृक्षतोडीला, शांताबाईंनी नेमलेल्या दक्ष कार्यकर्त्यांचा वचक निर्माण झाला. तसेच बेकायदेशीर केलेल्या वृक्षतोडीच्या लाकडांचा जाहीर लिलाव केला गेला व त्या पैशांचा उपयोग शेणखड्डे तयार करणे, नाल्या बांधणे यासाठी केला गेला.
सरपंच या नात्याने शांताबाईंनी गावकऱ्यांना परसबागेत वनौषधी झाडे लावून वनौषधी बागा तयार करायला प्रोत्साहन दिले. ‘घरोघरी एक एक झाड लावा व जगवा’ हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. प्रशिक्षित महिलांकडून निर्धूर चुली बनविण्याचा उपक्रम राबवून धूर व धुरापासून होणारा स्त्रियांचा त्रास वाचला. ‘घर दोघांचे’ ही संकल्पना रुजवून स्त्री-पुरुष समानतेची गुढी उभारली.
बोदड गावात दुधापेक्षा दारूचे उत्पादन जास्त. दारूबंदी योजना यशस्वीरीत्या राबविण्यासाठी त्यांनी महिला संघटनेबरोबर युवा संघटनेची सुरुवात केली.
खेडय़ात दारू पिऊन शिवीगाळ करणे, आणि आपल्या बायकांना  मारहाण करणे हे नित्याचेच. अन्यायाने पेटून उठण्याचा पिंड असणाऱ्या शांताबाईंनी, ग्रामसभेतच खुलेआम दारूबंदीची घोषणा केली. गावात दवंडी देण्यात आली. ‘जो कोणी गावात दारूचा व्यवसाय करील किंवा दारू पिऊन शिवीगाळ मारहाण करील, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सुरुवातीला बराच वाद व संघर्ष झाला, पण गावात वचक निर्माण होऊन दारूबंदीची सुरुवात झाली.’
एक हजार लोकवस्ती असलेल्या या बोदड गावात स्त्री-पुरुषांचे सध्या बारा बचत गट सक्रिय आहेत. या बचत गटांची आर्थिक उलाढाल एक लाखापेक्षा जास्त आहे. सध्या प्रगती बचत गटाच्या सक्षम कार्यकर्त्यांदेखील आहेत.
रसुलाबादचे माहेर असलेल्या शांताबाई आईवडिलांची एकुलती एक लेक. पण गावातल्या शाळेत फक्त सातवीपर्यंत शिक्षण झालं आणि लग्न होऊन जवळच्या बोदडगावी डुकरे परिवारात रमल्या. घरी दुधदुभते, गायी, म्हशी, बैलांचा समृद्ध गोठा आहे. त्या शिकल्या नसल्या तरी मुलं आणि मुली मात्र शिकल्या. एका मुलाने एमएसडब्लू केलाय, तर मुलीने एमए केलंय. वयाच्या सत्तरीतही जनार्दन डुकरे सायकलवरून २५ किलोमीटपर्यंत दूध वाटप करतात.
एक सक्षम महिला संवेदनशील असल्यास स्वत:सह कुटुंबाचाच नव्हे तर गावाचा चेहरामोहरा बदलून, गावाला विकासाच्या वाटेवर समर्थपणे चालायला शिकवते. शांताबाई त्याचं ठसठशीत उदाहरण आहे.