स्त्री समर्थ : सोनपावलं Print

अलकनंदा पाध्ये , शनिवार , २२  सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

स्त्री आणि सराफ हे समीकरण विरळच. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी स्वत:च्या कथ्थक नृत्यातील करिअरवर पाणी सोडून त्यांनी सराफीच्या कामात जम बसवत स्वत:ची पेढी उघडली. त्या भाग्यश्री ओक या सामथ्र्यवान स्त्रीची ही ‘सोनेरी’ वाटचाल..
झ वेरी बाजारात जाऊन स्वत: सोने खरेदी करणे, ग्राहकांच्या ऑर्डरनुसार कारागिरांकडून जातीने लक्ष घालून दागिने बनवून घेत या व्यवसायात जम बसवणे आणि ते करता करता स्वत:ची अद्ययावत पेढी स्वत:, एकटीच्या ताकदीवर उघडून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची लखलखीत कामगिरी आज नव्हे तर गेल्या २२-२३ वर्षांपासून करत आल्या आहेत ठाण्यातील यशस्वी उद्योगिनी ‘भाग्यश्री ज्युवेलर्स’च्या भाग्यश्री ओक!
ठाण्यापुरते बोलायचे झाल्यास त्या ठाण्यातील पहिल्या महिला सराफ आहेतच, पण कदाचित त्या भारतातीलही पहिल्या महिला सराफ असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
      गोडबोल्यांच्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात वाढणाऱ्या भाग्यश्रीताईंच्या आईवडिलांची दोन खोल्यांच्या संसारात छोटीशी पेढी होती. पण भाग्यश्रीताईंचा व त्यांच्या बहिणीचा तिच्याशी कधीच संबंध आला नाही. कारण मुलींची नृत्याची आवड लक्षात घेऊन त्यांच्या आईने त्यांना नृत्य शिकण्यासाठी मान्यवर गुरूंकडे पाठवले होते. वयाच्या ७व्या वर्षी भाग्यश्रीताईंनी गुरुवर्य वसंतराव घाडगे यांच्याकडे कथ्थक नृत्य शिकण्यास सुरुवात केली. अंगभूत कलागुणांमुळे आणि मेहनती स्वभावामुळे त्या पं. रोहिणी भाटे, पं. मोहनराव कल्याणपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्यात उत्तरोत्तर प्रगती करत गेल्या. कॉलेजमध्ये गेल्यावर आंतरमहाविद्यालयीन नृत्यस्पर्धेत तर सलग तीन वर्षे त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. १९७६ मध्ये मुंबई विद्यापीठाने सवरेत्कृष्ट स्पर्धकाला ‘मॅडम मेनका ट्रॉफी’ जाहीर केली. आणि त्या ट्रॉफीवर पहिले नाव कोरले गेले -भाग्यश्री गोडबोले यांचे! त्याच वर्षी त्यांच्या रुपारेल कॉलेजने त्यांच्या चौफेर कामगिरीबद्दल ‘सवरेत्कृष्ट विद्यार्थी’ या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.
अशा या नृत्यविशारद भाग्यश्रीताईंना जीवनसाथी मिळाला तोही त्यांच्यासारखाच कर्तृत्ववान. कलासक्त, कलाप्रेमी, उत्कृष्ट हार्मोनियम वादक डॉ. विद्याधर ओक. सुवर्णकांचन योग म्हणतात तो हाच असावा बहुधा! मग काय विचारता? लग्नानंतर दोघांनी ‘सूर सिंगार संसदे’तर्फे सादर होणाऱ्या ‘कल के कलाकार’ या कार्यक्रमात आपापली कला सादर केली. आणि कौतुकास्पद बाब म्हणजे डॉ. विद्याधर ओक यांना वैयक्तिक हार्मोनियम वादनात ‘सूरमणी’ तर भाग्यश्रीताईंना कथ्थक नृत्यासाठी ‘सिंगारमणी’ असा मानाचा किताब मिळाला.
भाग्यश्रीताई जर अशीच कथ्थक नृत्यसाधना करीत राहिल्या असत्या तर आज भारतातील अग्रगण्य कथ्थक नर्तिका म्हणून त्यांच्या नावाचा बोलबाला झाला असता. परंतु वाढत्या संसारातील जबाबदाऱ्या पेलताना स्वत:ची नृत्याची आवड थोडी बाजूला ठेवणे त्यांना क्रमप्राप्त झाले. मोठय़ा औषधी कंपनीत उपाध्यक्ष पदावर असलेल्या पतीला कामाच्या अतिव्यस्ततेमुळे संसारात फारसे लक्ष द्यायला फुरसतच नव्हती. तरीही भाग्यश्रीताईंनी आपल्या नृत्यसाधनेत खंड पडू नये म्हणून १९८० मध्ये सायनला साधना विद्यालयात ‘कथ्थक साधना’ नावाने नृत्याचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. वर्षभरातच विक्रोळीलाही दुसरी शाखा सुरू केली. ज्या योगे संसार सांभाळताना त्यांनी नृत्याशी बांधीलकी ठेवली होती. मात्र पुढे त्या वांद्रय़ाला राहायला गेल्या तेव्हा आपल्या तीन मुलांची फारच हेळसांड होतेय असे वाटू लागल्यावर विक्रोळीचे वर्ग बंद केले आणि वांद्रय़ाच्या राहत्या घरीच नृत्यवर्ग सुरू केले.
एकीकडे हे सर्व सुरळीत चालू असले तरी लागोपाठच्या तीन मुलांकडे बघताना त्यांच्यातली ‘आई’ अधूनमधून अस्वस्थ होई. मुलांचा हूडपणा पाहून त्यांना वाटे की आपली मुले आजच्या स्पर्धेच्या युगात, टक्केवारीच्या शर्यतीतही टिकाव धरतील का? तसे झाले नाही तर त्यांचे भवितव्य काय? या विचारात असताना एक कल्पना चमकून गेली. भाग्यश्रीताईंचे थकलेले आईवडील त्यांना मुलगा नसल्याने त्यांची पेढी जवळपास बंद करायच्या तयारीत होते. गमतीची गोष्ट म्हणजे भाग्यश्रीताईच नेहमी त्यांना गेली वर्षभर पेढी बंद करण्याचा तबीवजा सल्ला देत होत्या. त्याच भाग्यश्रीताईंनी आईवडिलांना तात्काळ फोन करून सांगितले की  तुमचा छोटासा का होईना, सुवर्णकाराचा व्यवसाय सांभाळायला तुम्ही केवळ मुलगा नाही किंवा एखादा समर्थ पुरुष नाही म्हणून बंद करू नका. मला तो पुढे नेण्यात स्वारस्य आहे. लेकीचे हे विधान एक विनोद म्हणून गोडबोलेंनी हसण्यावारी नेले. परंतु भाग्यश्रीताई मात्र याबद्दल गंभीरपणे विचार करत होत्या. पतीच्या कानावर घातल्यावर ‘तुला योग्य वाटेल ते कर!’ असा संमतीवजा रुकार त्यांनी दिला. मात्र भाग्यश्रीताई जेव्हा माहेरी हा विचार प्रत्यक्ष सांगायला गेल्या तेव्हा त्यांच्या कडक शिस्तीच्या आईने, ‘दोन दगडांवर पाय ठेवलेले मला चालणार नाही. तुला हा व्यवसाय नक्की करायचा असेल तर तुझे कथ्थकचे सर्व वर्ग बंद कर. आणि मगच आमच्याकडे शिकायला ये. सुरुवातीला आम्ही मार्गदर्शन करू, पण मी बाईमाणूस, हे कसे करू? असे मनात न आणता चिकाटीने हा व्यवसाय स्वीकारलास तर नक्की यश मिळेल’ अशी खात्रीही दिली. ‘कला जोपासण्याचे स्वप्न की भविष्याच्या तरतुदीसाठी व्यवसायाचे वास्तव’ या द्विधा मन:स्थितीत मुलांची हितसाधक आई या नात्याने भाग्यश्रीताईंनी स्वप्नाकडे पाठ फिरवून व्यवसायाचे वास्तव स्वीकारले. मुलांसाठी निव्वळ संपत्ती मागे न ठेवता संपत्ती निर्माण करण्याचे ‘साधन’ मुलांच्या हाती त्या सोपवणार होत्या. विद्यार्थिनींच्या गांधर्व विद्यालयाच्या परीक्षा झाल्यावर सुमारे २०० विद्यार्थ्यांचे वर्ग त्यांनी आपल्या गुरुबंधूच्या हाती सोपवले. मात्र २००० सालापर्यंत त्या विद्यालयाच्या पेपर सेटर किंवा परीक्षक म्हणून नृत्याच्या संपर्कात होत्या.
कलाकार ते सुवर्णकार या प्रवासात त्यांची आई त्यांची ‘आद्यगुरू’ बनली. वडील थकलेले असल्याकारणाने त्या आईबरोबर झवेरी बाजारात सोने खरेदी करणे, तिथून सोन्याचे दागिने करणाऱ्याकडे नेणे, सोन्याचा कस तपासणे, गिरगावातील गल्लीबोळातील कारागिरांकडे जाऊन त्यांना ग्राहकांची ऑर्डर, डिझाइन समजावून सांगणे, दागिन्यांची डिलिवरी, सोन्याची देवाण-घेवाण ही सर्व जोखमीची कामे त्या आईच्या मार्गदर्शनाखाली शिकत गेल्या. सुरुवातीला गल्लीबोळातून फिरताना त्या गोंधळून जात. पण आईच्या शब्दांनी बळ येई. आठवडय़ातून दोन दिवस बाजारातील धावपळ आणि उरलेले दिवस तीन मुलांचे सर्व करून संध्याकाळी चार तास दादरला माहेरच्या पेढीवर बसणे अशी तारेवरची कसरत त्यांना करावी लागे. पुढे यावर तोडगा म्हणून भाग्यश्रीताईंनी ठाण्याला राहायला जायचे ठरवल्यावर आईवडिलांनीही लेकीच्या जवळच जागा घेतली. आईवडिलांच्या ब्लॉकमधील एका खोलीत भाग्यश्रीताईंनी आपला छोटासा व्यवसाय सुरू केला. तसे त्यांनी आपल्या पूर्वीच्या ग्राहकांना कळवलेसुद्धा! परंतु १९८९ हे वर्ष त्यांची सत्त्वपरीक्षा पाहणारे ठरले. त्या नित्यनियमाने घरातील सर्व काम आटपून ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसून राहात. पण जवळपास वर्षभर त्या दुकानवजा खोलीत कुणीही ग्राहक फिरकला नाही. या व्यवसायाची आपली निवड चुकली की काय असे वाटू लागले. रोज रात्री निराशा पदरी घेऊन त्या स्वत:च्या घराकडे वळत. आणि एके दिवशी एक बाई आपल्या फिरकी दुरुस्त करायला आल्या.  बाई ग्राहक घेऊनच आल्या. कारण त्यानंतर हळूहळू दुकानात वर्दळ सुरू झाली. ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात त्या इतक्या यशस्वी झाल्या की, दुकानातील गर्दीमुळे कित्येक वेळ काही ग्राहकांना इमारतीच्या जिन्याशी थांबावे लागायचे. त्यांच्या कॉलनीतील दाक्षिणात्य ग्राहक जेव्हा दागिने खरेदीसाठी येऊ लागले तेव्हा त्यांच्या पद्धतीचे दागिने त्यांना बनवून देण्यासाठी त्यांनी माटुंग्याच्या दाक्षिणात्य कारागिरांची भेट घेतली. त्यांच्या तांबूस रंगाच्या सोन्याचा मोदरम (अंगठी), मांगल्यम (मंगळसूत्र) यांसारख्या दागिन्यांच्या घडणीचा अभ्यास केला. इतकेच काय त्यांच्याशी व्यावहारिक पातळीपलीकडे संवाद साधण्याच्या हेतूने त्या जुजबी तामिळ भाषाही शिकल्या. त्यामुळेच आज त्यांच्या ग्राहकांमध्ये दाक्षिणात्य ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. एक स्त्री सराफ म्हणून स्त्रियांशी मोकळेपणाने संवाद साधणे, दागिने चांगल्या स्थितीत असताना ते हौसेपोटी मोडायला येणाऱ्यांना शक्यतो परावृत्त करणे, व्यवहारात चोख असणे या त्यांच्या गुणांमुळे त्यांची गिऱ्हाईकांशी घरगुती स्वरूपाची बांधीलकी निर्माण झाली. नावातील ‘भाग्य’ आणि ‘श्री’ हातात हात घालून चालू लागल्यावर त्यांच्या यशाची कमान उंचावत गेली नाही तरच नवल! अखेर एका खोलीतील  दुकानाची जागा अपुरी पडू लागली तेव्हा १९९९ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ठाण्यातील भरवस्तीत एका अद्ययावत, ऐसपैस वातानुकूलित अशा शोरूममध्ये पेढीचे बस्तान हलवले. तेसुद्धा स्वत:च्या हिमतीवर. लेकीचे हे झगमगीत यश पाहून फार क्वचित कौतुकाचे शब्द तोंडून काढणाऱ्या आईने जेव्हा पाठीवर शाबासकी दिली तेव्हा भाग्यश्रीताईंना आपण खरोखरच काही सिद्ध करून दाखवले हे जाणवले.
ज्या हेतूने त्यांनी या व्यवसायात पाऊल टाकले तो हेतूही साध्य होत गेला. आईवडिलांचा कलेचा वारसा घेतलेले तिन्ही मुलगे कलासंपन्न तर आहेतच. पण आईच्या व्यवसायातही त्यांनी आईच्या हाताखाली धडे घ्यायला सुरुवात केली. रत्नांची, हिऱ्यांची पारख करण्यासाठी तिघांनी Gemology  चा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आहे. मधला मुलगा आनंदने Diamond Technology चा डिप्लोमाही पूर्ण करून तो पत्नी धनश्रीबरोबर आईसोबत दिवसभर पेढी सांभाळतो. मोठा मुलगा आदित्य मात्र आता पेढी सोडून संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग त्याच्या अद्ययावत रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये करत असतो. आणि धाकटा मुलगा आमोद याने www.light of venus ही स्वत:ची website (संकेतस्थळ) बनवली असून, त्यायोगे त्यांच्या  पेढीतून platinum हिऱ्यांच्या दागिन्यांची निर्यात, पार अमेरिका, इंग्लड येथे होत आहे. भाग्यश्रीताईंची सून धनश्रीसुद्धा सासूबाईंच्या पावलावर पाऊल टाकून १ ग्रॅम सोन्याचे दागिने, मोत्याचे, तसेच नकली दागिनेपासून खऱ्याखुऱ्या सोन्यामोत्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या व्यवसायात तयार होत आहे.
भाग्यश्रीताईंच्या मते गेल्या २५-३० वर्षांत या व्यवसायात आता खूप बदल होत आहेत. आजकाल Hall-mark चा जमाना आहे. धंद्यात पारदर्शकता वाढते आहे. त्यांच्या पेढीवर काम करणाऱ्या कारागिरांना त्या त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे समजतात. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून पेढी चालवणे हे ‘व्रत’ म्हणून पाळणाऱ्या भाग्यश्रीताई मनोरंजनाचे प्रकार, पर्यटन सहली किंवा कित्येक घरगुती समारंभांत सहभागी होऊ शकत नाहीत. परंतु या ठाम निश्चयामुळे, अखंड परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर एका खोलीत चालू झालेली पेढी आजच्या जाहिरातीच्या युगातही एक पैसा जाहिरातीवर खर्च न करता, ‘भाग्यश्री ज्युवेलर्स’ या शोरूममध्ये स्थलांतरित झाली आहे आणि दिवसेंदिवस लखलखीत अशी सोनेरी वाटचाल करत भरभराटीला येत आहे.