स्त्री समर्थ : आकांक्षापुढती जिथे आकाश ठेंगणे Print

alt

प्रा. हेमा गंगातीरकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लोकरीपासून स्वेटर विणण्याच्या छंदाला तिने व्यवसायात बदलले. ‘स्वयंसिद्धा’ने तिला उभारी दिली आणि कुठेही जाहिरात न करता तिच्या ‘न्यू मीनाक्षी वूलन्स’ची वार्षिक उलाढाल आता आठ ते दहा लाख रुपयांवर गेलीय. तिच्या या व्यवसायामुळे अनेक गरजू महिलांना रोजगारही मिळाला हे विशेष. अपंगत्वावर मात करणाऱ्या मीनाक्षीचा हा उत्साह जणू ‘आकांक्षापुढती जिथे आकाश ठेंगणे’या उक्तीचा प्रत्यय देतो.
मी नाक्षी आप्पासाहेब पाटील. स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमधील चार खोल्यांत स्वेटरनिर्मितीचा उद्योग करणारी यशस्वी तरुण उद्योजिका. झीरो साइजपासून मोठय़ांच्या मनपसंत डिझाइनचे, मागाल त्या रंगाचे स्वेटर मशीनवर बनविण्याचे काम मीनाक्षी करते. आजकाल अनेक स्त्रिया, तरुणी स्वत:चा व्यवसाय करतात, उद्योजक बनतात. त्यात वेगळेपण ते कसले! मुद्दा बरोबर आहे, पण एखादी मुलगी जिच्या जन्मत:च कमरेखालील शरीराला संवेदना नाही ती उद्योजक बनण्याचं स्वप्न पाहते तेव्हा तिच्या या निर्णयाकडे कुटुंबातले आणि समाजातलेसुद्धा ‘हे काय नवीन फॅड’ या नजरेने पाहतात. कारण मुलीने तेही अपंग मुलीने स्वप्नं पाहायची नसतात. वाटय़ाला आलेलं जीवन भोग समजून जगायचं, उगाच जगावेगळं काही तरी नाही करायचं- ही टिपिकल मानसिकता होय. हे सगळे अडथळे, विचारसरणी पार करत मीनाक्षी आज यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आली आहे. स्वत: स्वावलंबी बनून गरजू, जिद्दी, आठ-दहा महिलांना अगदी घरी येणाऱ्या मोलकरणीलासुद्धा स्वेटरनिर्मितीचे ज्ञान देऊन त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. स्वावलंबनाचा धडा स्वत: गिरवत, मध्यमवर्गीय अल्पशिक्षित गृहिणींना आपल्याच घरात उद्योगाचे प्रशिक्षण देऊन नियमित उत्पन्न मिळविण्याचा मार्ग दाखविला आहे.
मीनाक्षी आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे अगदी उत्साहाने सांगते. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांला शिकत असताना एक जाहिरात वाचून काकूबरोबर लोकरीच्या वस्तू मशीनवर बनविण्याचा क्लास तिने लावला. या क्लासमध्ये दोन महिन्यांच्या कालावधीत लोकरीचे एकूण सोळा प्रकार शिकविण्यात आले, ज्यामध्ये स्कार्फ, मफलर, छोटी गोल टोपी, बेबी सेट- ज्यात स्वेटर, पायमोजे, टोपडे, कानटोपी, लाळेरे शिवाय इतर वस्तूंत जाकीट, शाल, लेडीज स्वेटर, लुजर, हाफ स्वेटर असे अनेक नमुने शिकविण्यात आले. शिकायची हौस शिवाय काकू घरचीच त्यामुळे अपंग असूनही विशेष त्रास जाणवला नाही. शिवाय आई-वडिलांनी येण्या-जाण्यासाठी रिक्षाची सोय केली होती.
कोर्सचा कालावधी संपला, जे शिकायचे ते शिकून घेतले. आता पुढे काय करायचे? मोठ्ठा प्रश्न. मला स्वत:चे मशीन खरेदी करायचे आहे असा प्रस्ताव मीनाक्षीने आई-बाबांसमोर मांडला. लोकरीचे विणकाम करायच्या मशीनची किंमत ४५ हजार रुपये होती तीही ८-१० वर्षांपूर्वी इतकी रक्कम कुठून उभी करायची? शिवाय हिला मशीनवर आठ-दहा तास काम करणे झेपेल का? इतके भांडवल घालायचे तर हा व्यवसाय करणे तिला कितपत जमेल? लेकीची काळजी, अपंगत्वाच्या मर्यादा आणि मराठी शंकेखोर मन, पण जिद्दी मीनाक्षीच्या मनात असल्या शंकाकुशंका, अडथळ्यांचा विचार कधीच येत नसे. तिचा आतला आवाज, खंबीर मन म्हणत असे- मी हे करणारच. मला हे नक्की जमेल. सुरुवातीलाच शंका-कुशंका नकोत. सुरुवात तर करू देत.
लेकीच्या प्रेमाखातर बँक ऑफ इंडियात काम करणारे वडील आणि एम.एस.ई.बी.त नोकरी करणारी आई या दोघांनी बँकेचे कर्ज घेऊन मीनाक्षीला पंचेचाळीस हजार रुपयांचे मशीन घेऊन दिले. व्यवसायाच्या सुरुवातीला हे माहीत नसतं की यश कधी मिळेल? प्रत्यक्ष काम सुरू केल्यानंतर एकेक अडचणी येऊ लागल्या. एखादा स्वेटर करायला घेतला की मुंदा कसा खोलायचा, गळ्याचे माप केवढे घ्यायचे, उंची कशी घ्यायची हे जमायचे नाही. थोडक्यात, व्यवसायाच्या खाचा-खोचा प्रशिक्षण काळात लक्षात येत नाहीत. क्वचित व्यवसायाचे गुपित म्हणून शिकविल्याही जात नाहीत. मीनाक्षीने स्वत:च या गोष्टी ‘ट्रायल-एरर’ पद्धतीने शिकून घेतल्या आणि कोल्हापूरच्याच एक तज्ज्ञ व्यवसायकर्त्यां माधुरी वुलन्सच्या बेडेकर काकू यांच्या मदतीने अनेक गोष्टी समजावून घेतल्या. विविध नमुन्यांचे स्वेटर बनू लागले. प्रत्येक स्वेटरबरोबर मीनाक्षीचा आत्मविश्वास वाढू लागला. नवनिर्मितीचा आनंद मिळू लागला.
एका परिचिताने डिसेंबरमध्ये त्यांच्या घरी असणाऱ्या लग्नानिमित्त आहेरासाठी पंचेचाळीस शालींची एकदम ऑर्डर दिली. सुमन, बेबी व इतर दोन मदतनीस महिलांना घेऊन मीनाक्षीने ती ऑर्डर वेळेत पूर्ण केली. याच घरी लग्नानिमित्त आलेल्या पाहुण्यांनी मीनाक्षीकडून १५०० रुपयांचा माल खरेदी केला. आईने ऑफिसमध्ये आलेल्या फिरत्या विक्रेतीकडचा एक बटवा खरेदी केला. तो नमुना पाहून मीनाक्षीने तसेच अनेक बटवे बनवून आईच्या ऑफिसमधील मैत्रिणींना दिले. हळूहळू काम जमू लागले. पैसे मिळू लागले. निर्मितीचा आनंद कळू लागला. कल्पनेला पंख फुटले. मिळालेले पैसे लोकर खरेदी, मदतनीसांचे पगार, मशीन खरेदी, दुरुस्ती यासाठी वापरले जाऊ लागले. नवनवे स्वेटर्स बनवायचे वेड लागले.
व्यवसायवृद्धी जादूच्या कांडीप्रमाणे झटपट घडून येत नाही. प्रयत्न, अनुभव, जिद्द, धडपड याच्या जोडीला जाहिरात, कुणाचा तरी पाठिंबा, सहकार्य या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे काम करत असतात. स्वयंसिद्धा ही कोल्हापुरातील महिला उद्योजकांसाठी काम करणारी नामवंत संस्था. या संस्थेच्या कांचनताई परुळेकर जिद्दी, उद्योजक महिलांना बळ देण्याचे काम सातत्याने अनेक वर्षे करत आहेत. २००३ साली कांचनताईंनी मंगलधाम येथील महिला उद्योजकांच्या प्रदर्शनातील एक स्टॉल मीनाक्षीला अजिबात भाडे न घेता दिला. हजारो ग्राहकांनी मीनाक्षीच्या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी केली. प्रदर्शनानिमित्त बनविलेला सर्व माल हातोहात खपला. यातून ओळखी वाढल्या. नवीन ऑर्डर्स मिळू लागल्या. दुकानदार मोठय़ा ऑर्डरसाठी भेटू लागले. कोल्हापुरातील अंबाराम या दुकानाच्या मालकांनी एकदम सातशे बेबीसेटची ऑर्डर दिली. जोडीला रुपये पाच हजारांचा अ‍ॅडव्हान्सही दिला. मीनाक्षीने अंबारामची ऑर्डर वेळेत पूर्ण केली. गेली दहा वर्षे मीनाक्षीचे अंबाराम हे गिऱ्हाईक आहे. सातत्याने ऑर्डर वाढते आहे. यश मिळाले की हुरूप येतो. कामाचा थकवा जाणवत नाही. शारीरिक अडचणींवर मात करणारी मीनाक्षी मनाने दुबळी कधीच नव्हती. आता समाजमान्यतेच्या पावतीमुळे वाढत्या ऑर्डर्सने मीनाक्षी इतर गरजू महिलांना रोजगाराचे साधन पुरविते. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी महिलांना प्रशिक्षित करून फावल्या वेळेत घरबसल्या उद्योगाचे धडे देते. धुणी-भांडी करणाऱ्या बायकांना हातशिलाई करायला, टोपडय़ाचा गोंडा लावायला, स्वेटरची बटणं लावायला शिकवून हजार-दोन हजार रुपये त्यांना आरामात मिळवून देते. ताई, ह्य़े काम मला वो कसं येणार? अशी नकारघंटा वाजवणाऱ्या महिलेला मीनाक्षी जवळ बसवून काम शिकवते, सांभाळून घेते. आणि हे जादाचे पैसे शिल्लक कसे टाकायचे, सणासुदीला, मुलांच्या शिक्षणाला कसे वापरायचे याचे धडे देते. मीनाक्षीकडे सात-आठजणी नियमित कामाला येतात. काही जणी घरी जाऊन काम करतात. फ्रोशा वर्कचे फ्रॉक, स्वेटर, जाकीट बनविणाऱ्या दोन-तीन वेगळ्या महिला आहेत. त्या मागणीप्रमाणे माल बनवून देतात. सुमन नावाची मदतनीस गेली दहा वर्षे मीनाक्षीकडे काम करते. सुमन फक्त चौथी पास आहे. कर्तृत्वाच्या, कौशल्याच्या आड शिक्षण येत नाही हेच खरे. आता तर दहावी पास, पदवीधर मुली-महिलाही मीनाक्षीकडे कामाला आहेत. या सगळ्यांची भिशी आहे. गरजू स्त्रीला प्राधान्यक्रमाने भिशी दिली जाते. प्रसंगी मीनाक्षी स्वत:ची भिशी पण गरजेप्रमाणे इतरांना देते. हिशेब मग बघू. तू घेऊन जा, पैसे हा आधार महिलांना भावतो.
मीनाक्षीकडे आज एकूण १३ मशिन्स आहेत. कुठेही जाहिरात न करता वर्षभर काम असते. मीनाक्षीचा माल कोल्हापूरबरोबर गांधीनगर, इचलकरंजी, सांगली पार मुंबई उपनगरातील उल्हासनगर, नाशिक, गोवा या ठिकाणी जातो. मालाचा दर्जा चांगला राहण्यासाठी मीनाक्षी वर्धमानची लोकर वापरते. रंग छान फ्रेश असतात. धुतले तरी खराब होत नाहीत. महाराष्ट्रातील थंडीचा विचार करता टू प्लाय, थ्री प्लाय प्रकारची लोकर वापरावी लागते. जी लोकर लूज पडत नाही, गोळे येत नाहीत, शायनिंग छान असते, अशीच लोकर ती निवडते. आजवर कुणालाही प्रत्यक्ष न भेटता फोनवर ऑर्डर आणि पैशाचे व्यवहार बँकेमार्फत होतात. विश्वास आणि सहकार्य हे भांडवल. मशीन दुरुस्तीसाठी लागणारे तांत्रिक कर्मचारी नाशिकहून येतात. त्यांची सेवा चांगली असून, देण्या-घेण्यावरून कधी वाद होत नाही. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मशीनची किरकोळ दुरुस्ती, पार्ट बदलणे, आमचे आम्हीच करतो. एक काळ असा होता, कोल्हापूरच्या भिमा फेस्टिव्हलमध्ये चार दिवसांत दहा हजार रुपयांचा सेल झाल्यावर खूप आनंद झाला होता. आता ‘न्यू मीनाक्षी वूलन्स’ची वार्षिक उलाढाल आठ ते दहा लाखांची आहे.
व्यवसाय म्हटले की कडू-गोड आठवणी आहेत. एखादे गिऱ्हाईक चित्र दाखवून, स्पेशल डिझाइननुसार स्वेटर बनवायला सांगते आणि तयार झाल्यावर आवडला नाही म्हणून नाकारते. मग मी नाराज न होता तो स्वेटर उसवून त्याचे बटवे, पर्स बनविते आणि विकते. कधी एखादा दुकानदार सर्व माल उचलतो पण शेवटचे दहा हजारांचे पेमेंट अडकवतो. मी अपंग, घराबाहेर न पडणारी मग माझा इंजिनीअर भाऊ मदतीला येतो. संबंधित दुकानदाराला कोल्हापुरी खाक्या दाखवून बिले वसूल करतो. सुरुवातीला मला वाईट वाटायचे. लोक असे का वागतात? असा प्रश्न मला पडायचा, पण आता माझी मानसिकता बदलली आहे. धंद्यात हे असे चालायचेच असे मनाला समजावते. कामगार मिळत नाहीत. शिकायला आलेल्या मुलींना पहिल्या दिवसापासून पगार हवा असतो, मध्येच सोडून जातात. कधी त्यांच्यामुळे महागडे मशीन बिघडते, पण शांतपणे सारे प्रश्न मी हाताळते. मी नेहमीच्या मोठय़ा गिऱ्हाईकांना म्हणते- मला कळतंय तुम्ही किती कमावताय. मी या व्यवसायाकडे केवळ बिझिनेस म्हणून नाही बघत. मी स्वत: आणि या आठ-दहा बायकांचा वेळ छान जातो. महिन्याच्या कमाईनंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला खूप काही मिळवून देतो. कृपा करून तुम्ही माझ्याशी पंगा नका घेऊ. मीनाक्षीचे विचार वृत्ती खूप काही सांगून जाते.
मीनाक्षीला प्रवास करायला आवडतो. अपंगत्वाचा बाऊ न करता आपले आई-वडील, भाऊ आणि व्यवसायातील मदतनीस महिलांना घेऊन मीनाक्षी मैसूर, बंगलोर, उटी, गणपतीपुळे, तिरुपती येथे जाऊन आली आहे. गणपतीपुळ्याच्या अथांग समुद्राकडे तासन् तास पाहत बसायला मीनाक्षीला आवडते. आजवर मीनाक्षीला अनेक पुरस्कार लाभले आहेत. कोल्हापूर, सांगली आकाशवाणीवरून ‘यशस्वी उद्योजिका’ म्हणून तिची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. हिंदी-मराठी गाण्यांचा खूप मोठा संग्रह तिच्याकडे आहे. मराठीतील अनेक पुस्तके, चरित्रे ती वाचते. व्हीलचेअरवर बसून काम करणारी, चारी खोल्यांतील कामावर लक्ष असणारी, स्वत:ही सफाईदारपणे मशीनवर वीणकाम करणारी उत्साही, बोलकी मीनाक्षी म्हणते- मी मनाने एकदम ठणठणीत आहे. मला कुणाची सहानुभूती नको. जितके तुम्ही इतरांना द्याल त्याच्या दुप्पट देव तुम्हाला देतो. धडधाकट तरुणींनी हात-पाय गाळून निराश होऊ नये. माझ्या छोटय़ाशा धडपडीतून हा संदेश घेऊन त्यांनी कामाला लागावे, असे मला वाटते.