जपानच्या टोयोटाने सादर केली नवी स्मार्ट कार Print

मेलबर्न, ३ ऑक्टोबर/पीटीआय
जपानच्या टोयोटा कंपनीतील अभियंत्यांनी नवीन स्मार्ट कार (मोटार) तयार केली असून, ती तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाडन तुम्हाला पुढे नेमकी काय कृती करायची आहे हे आधीच जाणून घेऊ शकते. ‘इनसेक्ट’ कार अशी ही संकल्पना असून जपानच्या टोयोटा या स्वयंचलित वाहन कंपनीने ती प्रत्यक्षात आणली आहे. या मोटारीत गती संवेदक, आवाज ओळखणारे संवेदक, वर्तनाचे भाकीत करणारे तंत्रज्ञान यांचा वापर केला आहे. चालकाच्या चेहऱ्यावरून त्याची पुढची कृती काय असेल याचा अंदाज या तंत्रामुळे बांधता येतो. धुक्यातील विशिष्ट लाईटची सुविधाही त्यात आहे. स्मार्ट फोन सॅटेलाईट नॅव्हिगेशन प्रणालीच्या वापराने जाण्याचे स्थान निश्चित करता येते. त्यात माहितीचा अर्थ लावला जातो, असे कार्सगाइड डॉट कॉम डॉट एयू या संकेतस्थळाने म्हटले आहे.
ही मोटारचालकाशी बोलते. चालक जेव्हा मोटारीजवळ येतो, तेव्हा ‘हॅलो’ असे शब्द पडद्यावर उमटतात व पॅनेल मॉनिटरवर प्रतिसाद दिला जातो. केवळ हात करून मोटारीचा दरवाजा उघडता येतो. ही मोटार टोयोटा कंपनीत क्लाऊड जोडणीने व्हच्र्युअल एजंटला जोडलेली असते, त्यामुळे सेंटिग आपोआप बदलता येतात व ही मोटार चालकाच्या घराशीही जोडलेली असते, त्यामुळे त्याला मोटारीची कुलपे, वातानुकूलन यंत्रे चालू किंवा बंद करता येतात. स्मार्ट इन्सेक्ट मोटार कंपनीने मंगळवारी टोकियो येथे सुरू झालेल्या प्रगत तंत्रज्ञान प्रदर्शनात सादर केली असून त्याचे इन्सेक्ट हे नाव इनफॉर्मेशन नेटवर्क सोशल इलेक्ट्रिक सिटी ट्रान्सपोर्टर या मोठय़ा नावाचे संक्षिप्त रूप आहे.