‘मारुती’ महागली Print

पीटीआय , नवी दिल्ली
गेल्या महिन्यात विक्रीवाढीच्या घवघवीत आकडय़ांची नोंद करणाऱ्या मारुती कंपनीने दसऱ्याच्या तोंडावर आपल्या सर्वच प्रकारच्या वाहनांच्या किंमती महाग केल्या आहेत. एक टक्क्याप्रमाणे २,५०० ते ५,२५० रुपयांपर्यंतच्या कंपन्यांच्या वाढीव किंमतीची अंमलबजावणी तातडीने होत आहे. यानुसार मारुती ८०० ते किझाशी या सर्व प्रकारच्या वाहनांच्या किंमतींवर परिणाम होणार आहे. सध्या त्या २.०४ ते १७.५० लाख रुपयांच्या घरात आहेत.
कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि वधारत जाणारे विदेशी चलन यामुळे उत्पादनांचे दर वाढविण्यावाचून पर्याय नाही, असे कंपनीच्या विपणन आणि विक्री विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयांक पारीख गेल्याच महिन्यात जाहीर केले होते. यामुळे नफ्यावरील दबाव वाढत असल्याचेही ते म्हणाले होते. होंडानेही २.६ टक्क्यांनी किंमती वाढविल्या आहेत. तर ऑडीने क्यू३ च्या किंमती ५० हजार रुपयांनी वाढविल्या आहेत. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीने लवकरच वाहनांच्या किंमती दोन टक्क्यांपर्यत वाढविण्याचे सूतोवाच केले आहे. याउलट टाटा मोटर्सने तिच्या इंडिका ईव्ही२ च्या किंमती २३ हजारांनी कमी केल्या आहेत.