वेव्हर ऑफ प्रीमिअम Print

आयुर्विम्याचा ‘हप्ताबंदी’ लाभ
ऋतुराज भट्टाचार्य, मुंबई

समीर, या सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या ३५ वर्षे वयाच्या युवकाने १५ वर्षे मुदतीची विमा योजना घेतली आहे. योजना सुरू झाल्यानंतर सात वर्षांनी एका दुर्दैवी घटनेत विमाधारकाला कायमचे अपंगत्व आले. जीवनातील या अघटित प्रसंगी नोकरीही टिकवता येईल काय असा प्रश्न त्याच्यापुढे असताना, पॉलिसीचे उर्वरित हप्ते भरण्याची त्याला कल्पनाही करवत नाही. परंतु आयुर्विमा कंपन्यांनी देऊ केलेली रायडर्स अर्थात विशेष लाभ याचसाठी असतात. अनेक कंपन्यांच्या आयुर्विमा योजनेत समीरसारख्या व्यक्तींवर गुदरलेल्या प्रसंगांची दखल घेऊन काळजी घेण्यात आली आहे. समीरकडे असलेल्या आयुर्विम्याच्या योजनेवरही ‘वेव्हर ऑफ प्रीमियम’ हा लाभ उपलब्ध असल्याने त्याला पॉलिसीचे पुढचे आठ वर्षांचे हप्ते भरण्यापासून सवलत मिळाली आहे. उल्लेखनीय म्हणजे तरीही त्याला पॉलिसीच्या मुदतपूर्तीला संपूर्ण लाभ रक्कम मिळविता येणार आहे.
वानगीदाखल दिलेल्या समीरच्या उदाहरणावरून ‘वेव्हर ऑफ प्रीमिअम’ हा लाभ कसे काम करतो ते लक्षात आले असेलच. विमाधारकाच्या बाबतीत अघटित प्रसंग ओढवला तरी लाभधारकाला योजनेचा पूर्ण फायदा मिळेल, याची हा लाभ खात्री देतो. विमाधारकाला अपंगत्व आल्यास योजनेच्या या वैशिष्टय़ामुळे विम्याचे भविष्यातील हप्ते माफ केले जातात. विमा कंपनी योजनाधारकाच्या वतीने हप्ते भरते आणि विमा योजना सुरू ठेवली जाते. हा फायदा एकतर योजनेबरोबरच मिळतो किंवा नंतर तो रायडरच्या स्वरूपात घेता येतो.  
काही चाइल्ड प्लॅन्सच्या बाबतीत ‘वेव्हर ऑफ प्रीमियम’ योजनेतच समाविष्ट असतो. अन्य योजनांबाबत मात्र हा लाभ रायडरच्या स्वरूपात घेता येतो. चाइल्ड प्लॅन्समध्ये विम्याचे हप्ते भरत असलेल्या पालकांचा मृत्यू झाल्यास, योजना तशीच चालू राहून अपत्याचे भवितव्याच्या सुरक्षिततेचे मूळ उद्दिष्ट पूर्ण करेल, ही काळजी ‘वेव्हर ऑफ प्रीमियम’ घेते. अशा योजनांत इच्छित लाभ अपत्याला मिळेपर्यंत हप्ते माफ केले जातात.
आवर्जून घ्यावे असे वैशिष्टय़
विमा योजना घेत असताना वेव्हर ऑफ प्रीमिअम या वैशिष्टय़ाचा विचार करावा. आकस्मिक दुर्दैवी परिस्थिती ओढवल्यास, कुटुंबाला आíथक सुरिक्षतता देण्याची खात्री करण्यासाठी हा आदर्श पर्याय आहे. त्यामुळे तुमच्या आयुर्वमिा योजनेतून तुम्ही हा लाभ मिळविला आहे की नाही, याची आजच आवर्जून खात्री करून घ्या.
लेखक, बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे  ‘मार्केट मॅनेजमेंट’ विभागाचे प्रमुख आहेत.