मंदीवर उतारा गिफ्टकार्ड्सचा! Print

यंदाच्या सणोत्सवात विक्रमी विक्रीचे वेध
व्यापार प्रतिनिधी , मुंबई

आर्थिक मंदी.. खरेपाहता ती तर मनाचे खेळ आहे असे मानणाराही एक प्रवाह आहे. गेली दीड-दोन वर्षे अशी मनमस्तिष्कावर ठाण मांडून बसलेल्या मंदीच्या भावनेला बाजूला सारून यंदाचा दिवाळी सण उत्साहाने साजरा करण्याचा चंगही मग काही मंडळी बांधताना दिसत आहेत. सर्व मित्र-आप्तेष्टांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी शक्य झाल्या नाहीत तरी भेटकार्ड, भेटवस्तू पाठविण्याचे मोठे बेत असल्याचे एका ताज्या पाहणीतून पुढे आले आहे. केवळ भेटकार्डाचीच विक्री १० लाखांचा आकडा पार करेल, असे हा अभ्यास सांगतो.
गेल्या वर्षी भारतात सणोत्सवाच्या काळात गिफ्टकार्डावर (बँकांकडून प्रस्तुत प्रीपेड व्हाऊचर्स कार्ड) जवळपास १८०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. यंदा सणोत्सवाच्या प्रारंभीच म्हणजे सप्टेंबरअखरेपर्यंत विकल्या गेलेल्या गिफ्टकार्ड्सची संख्या २७ लाखांवर गेली आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत ही १४५ टक्क्यांची वाढ आहे, असे ‘क्विकक्लायव्हर’ या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे देशाच्या बडय़ा महानगरांव्यतिरिक्त या कार्ड्सना दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरातील मागणी ४० टक्क्यांच्या घरात जाणारी आहे.
सणांच्या काळात भेटवस्तूंऐवजी गिफ्टकार्ड अथवा दोन्ही देण्याची प्रथा असून, ही भेटवस्तू जितकी महागडी तितकी त्या सोबतचे कार्डही महाग असल्याचे आढळून येते. दर्जेदार अ‍ॅक्सेसरीज ब्रॅण्ड जर भेट स्वरूपात दिली जाणार असल्यास ती गिफ्टकार्डासह नजराणा स्वरूपात सादर करण्याचा खर्च ३,३०० रुपयांच्या घरात जाणारा असतो, असे ‘क्विकक्लायव्हर’चे निरीक्षण आहे. म्हणूनच भारतात अशा नजराणा कार्डाचा प्रत्येकी सरासरी खर्च १४०० रुपयांचा असल्याचे कंपनी सांगते.
किरकोळ मागणीसह कॉर्पोरेट्समध्ये गिफ्टकार्ड्सना वाढलेली मागणी एकूणच बदललेल्या आर्थिक वातावरण आणि उद्योगक्षेत्राच्या उंचावलेल्या भावनेची प्रचीती देतात, असाही या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. बहुतांश सर्वच आघाडीच्या ब्रॅण्ड्सकडून यंदाच्या दिवाळीसाठी मोठय़ा प्रमाणात गिफ्टकार्ड्सची मागणी आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.