तेजी अव्याहत Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

सलग तिसऱ्या सत्रात दोन्ही प्रमुख भांडवली बाजारातील तेजी कायम राहिली आहे. ४६ अंश वाढीसह ‘सेन्सेक्स’ १८,८७० पर्यंत गेला आहे; तर ‘निफ्टी’तही १२.५६ अंश वाढ झाल्यामुळे तो ५,७३१.२५ वर गेला आहे.
दोन्ही निर्देशांकांनी दिवसाच्या उच्चांकाला जाताना गेल्या दीड वर्षांतील नवा टप्पा गाठला आहे. मुंबई शेअर बाजार दिवसभरात १८,९०५.६२ पर्यंत तर राष्ट्रीय शेअर बाजाराने या कालावधीत ५,७४३.२५ वर झेप घेतली. ‘सेन्सेक्स’ यापूर्वी २५ जुलै २०११ रोजी दिवसाच्या सर्वोत्तम पातळीवर तर बंद होतानाही ‘निफ्टी’ २९ एप्रिल २०११ च्या समकक्ष होता. दोन्ही निर्देशांकांनी गेल्या १४ ते १७ महिन्यानंतर पुन्हा नव्या उच्चांकाला स्पर्श केला आहे.
मंगळवारच्या विश्रांतीनंतर मुंबई निर्देशांकाने सकाळच्या सत्राची सुरुवात ५१ अंश वाढीसह केली होती. शेअर बाजार यावेळी १८,८७५ वर होता. तर ‘निफ्टी’ही १७.७० अंश वाढीमुळे ५,७३६.५० पर्यंत गेला होता.
गेल्या दोन सत्रात ‘सेन्सेक्स’ २४५ अंशांनी वधारला आहे. यामुळे तो १८,८२५ पर्यंत जाऊ शकला. भांडवली बाजाराची आगेकूच तिसऱ्या सत्रातही कायम राहिली आहे. यामुळे या कालावधीत २९१ अंशांची भर पडली आहे.
यावेळी तेल व वायू तसेच सार्वजनिक कंपनी क्षेत्रातील समभागांची खरेदी जोरदार होती. त्याचबरोबर रिलायन्स, हिंदुस्थान यूनिलिव्हर, टीसीएस, एचडीएफसी, ओएनजीसी यांचेही समभाग मूल्य वधारले गेले. डॉलरच्या तुलनेत रुपया ५२ वर जाताना त्याने गेल्या पाच महिन्यांचा उच्चांक सत्रादरम्यानही कायम राखल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना मागणी राहिली. तर सप्टेंबरमधील घसरत्या वाहन विक्रीमुळे हा निर्देशांकही खाली आला होता.    

किंगफिशर समभाग मूल्य नीचांकावर
कंपनीने अंशत: टाळेबंदी जाहीर केल्याचा परिणाम किंगफिशर एअरलाईन्सच्या समभागावर बुधवारी भांडवली बाजारातील व्यवहारात सकाळीच दिसून आला. ‘सेन्सेक्स’मध्ये सुरुवातीची तेजी नोंदविली जात असताना कंपनी समभाग मात्र यावेळी ५ टक्क्यांनी घसरताना त्याच्या १४ रुपये या नीचांकी पातळीवर आला होता.
रुपयाचा ५२ पुढील प्रवास कायम
डॉलरच्या तुलनेत रुपयाचा ५२ च्या वर मजबूतीने प्रवास सलग दुसऱ्या सत्रातही कायम आहे. बुधवारी सकाळच्या सत्रातही रुपयाने सुरुवातीच्या सत्रात १२ पैशांची भर घालत डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाला ५२.२८ वर नेले. रुपयाची ही पाच महिन्यातील नवीन उच्चांक पातळी आहे. दिवसअखेर रुपया २४ पैसे कमावून ५२.१४ वर बंद झाला.