शेअर बाजारात तेजीने म्युच्युअल फंड गंगाजळीही तिमाहीत ८ टक्क्यांनी फुगल्या Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

संपूर्ण सप्टेंबरमध्ये तेजीत राहिलेल्या भांडवली बाजाराने एकूणच म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेला चांगलाच हातभार लावला आहे. आठ टक्क्यांनी झेपावलेल्या ‘सेन्सेक्स’मुळे ‘जुले ते सप्टेंबर या तिमाहीत फंडांचा निधीही याच प्रमाणात वधारला आहे. १ आक्टोबरपासून अंमलात आलेल्या नव्या नियमांमुळे मात्र फंडांचे भविष्य नाजूक बनले आहे. ‘सेबी’ने या कंपन्यांना एकाच लाभाची एक योजना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यानुसार ‘एसआयपी’ योजनांचा परिणाम एकूणच या उद्योगावर जाणवणार आहे.
म्युच्युअल फंड कंपन्यांची मालमत्ता यापूर्वी सर्वोच्च अशा ८ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. २०११ वर्षअखेरिस ही किमया गुंतवणूकदारांचा आवडीचा पर्याय समजले जाणाऱ्या या क्षेत्राने साध्य केली होती. यानंतर हा टप्पा पुन्हा कधीही दिसला नाही.
चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत देशातील ४४ फंड कंपन्यांची मालमत्ता ५४,६८१ हजारांनी वधारून ती ७,५३,७०३ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. एप्रिल ते जून या दरम्यान ती ६,९९,०२२ कोटी रुपये होती. वर्षभरापूर्वीही ही मालमत्ता ७.४७ लाख कोटी रुपये होती.
‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी) या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या संघटनेच्या यादीत अद्यापही खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी ही कंपनी सर्वाधिक मालमत्तेसह आघाडीवर आहे. तर ‘टॉप फाईव्ह’मध्ये यूटीआयचाही समावेश आहे.
या कालावधीत ‘यूटीआय’ची मालमत्ता सर्वाधिक ९,८६० कोटी रुपयांनी वधारली आहे. तर एचडीएफसी याबाबत चौथ्या स्थानावर आहे. ४४ पैकी ३२ कंपन्यांची मालमत्ता यंदा वधारली आहे. ‘टॉप १०’मध्ये एसबीआय, कोटक, आयडीएफसी यांचे नाव राहिले आहे.
एकूण मालमत्ता वाढीत आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल तिसऱ्या स्थानावर असली तरी या कालावधीत सर्वाधिक मालमत्ता वाढीच्या यादीतून ही कंपनी बाहेर पडली आहे. त्याऐवजी कोटक महिंद्रने ५,०२४ कोटी अधिक मालमत्ता राखली आहे. अ‍ॅक्सिस, रेलिगेअरनेही ४ हजार कोटी रुपयांपर्यंतची अधिक मालमत्ता जमा केली आहे.    
एएमसी                  एकूण मालमत्ता           तिमाही वाढ
एचडीएफसी    ९८,०७१        ५,१९९
रिलायन्स        ८८,६२६        ५,७३८
आयसीआय. प्रुडे.    ७६,५०१        ४,०००
बिर्ला सन लाईफ    ७२,९७९        ५,७०९
यूटीआय        ७०,७८३        ९,८६०
(जुलै ते सप्टेंबर २०१२ मधील मालमत्ता कोटी रुपयांमध्ये)