बँकांना कोटय़वधींच्या ‘एनपीए’चा विळखा! Print

 

मार्च २०१२ अखेर बँकांची दीड लाख कोटींची कर्जे थकीत
मनोज जोशी , नागपूर - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

बँकांच्या नफ्यात अडथळा ठरणारा आणि देशाच्या आर्थिक विकासातही खीळ घालणारा घटक म्हणजे एनपीए. आजघडीला बँकांच्या अनुत्पादित कर्जाची रक्कम कोटय़वधी रुपयांची असून देशातील राष्ट्रीयकृत बँकांपासून खाजगी बँकांपर्यंत सर्वानाच एनपीएच्या मोठय़ा आकडय़ांनी ग्रासले आहे. बँकेने कर्ज दिल्याच्या तीन महिन्यांनंतर, त्याची परतफेड करण्यात आली नाही तर ती थकित/ अनुत्पादित कर्जाची रक्कम ठरते आणि त्यामुळे बँकेच्या नफ्याचे प्रमाण घसरू लागते. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे मार्च २००१ अखेर देशभरातील सर्व बँकांची मिळून एनपीएची रक्कम सुमारे ७५ हजार कोटी रुपये होती.

ती मार्च २०१२ अखेपर्यंत सुमारे दीड लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. बँकांच्या वार्षिक ताळेबंदात जेवढी एनपीएची रक्कम जास्त, तितकी त्यांची नफ्याची रक्कम कमी किंवा तोटय़ाची जास्त, असे समजायला वाव असतो.
आर्थिक उलाढाल, ठेवींची रक्कम आणि शाखांची संख्या याबाबतीत देशातील पहिल्या क्रमांकावर असलेली भारतीय स्टेट बँक ही एनपीएच्या बाबतीतही अग्रक्रमावर आहे. या बँकेच्या एनपीएची रक्कम ३७ हजार १५६ कोटी रुपये आहे. विजय मल्ल्या यांच्या ‘किंगफिशर एअरलाईन्स’ला दिलेल्या कर्जाच्या मोठय़ा रकमेचा यात समावेश आहे. मार्च २००१ अखेपर्यंत एनपीएची १५ हजार ४७३ कोटी रुपये होती. स्टेट बँक समूहातील शाखांपैकी स्टेट बँक ऑफ हैदराबादचा एनपीए २००७ कोटी रुपयांचा आहे.
राष्ट्रीयीकृत बँकांपैकी पंजाब नॅशनल बॅकेची एनपीएची रक्कम सर्वाधिक म्हणजे ८ हजार ६९० कोटी रुपये आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचीही मार्च २०१२ अखेरची थकित कर्जे ७ हजार २७३ कोटी रुपयांची आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया ५ हजार ४२२ कोटी, बँक ऑफ इंडिया ५ हजार १७० कोटी, यूको बँक ४ हजार २० कोटी, कॅनरा बँक ३ हजार ८९० कोटी व बँक ऑफ बडोदा ३ हजार ८८२ कोटी रुपयांसह या खालोखालच्या क्रमांकावर आहेत. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (३५८० कोटी), इंडियन ओव्हरसीज बँक (३५५४ कोटी), सिंडिकेट बँक (३०५१ कोटी) व युनायटेड बँक ऑफ इंडिया (२१७६ कोटी) यांच्या एनपीएचेही प्रमाण बरेच मोठे आहे.
नव्या खाजगी बँकांपैकी आयसीआयसीआय बँकेकडील एनपीएची रक्कम स्टेट बँकेहून अधिक, म्हणजे तब्बल ९ हजार २९३ कोटी रुपये इतकी असून, एचडीएफसी बँकेचा एनपीए १८१५ कोटी रुपयांचा आहे. जुन्या खाजगी बँकांपैकी फेडरल बँकेची थकित कर्जाची रक्कम मार्च २०१२ अखेर १३०१ कोटी रुपये इतकी आहे. भारतात शाखा असलेल्या परदेशी बँकांचा विचार करता, स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडील थकित कर्जाची रक्कम सर्वाधिक, म्हणजे ३२१२ कोटी रुपये आहे. हाँगकाँग अँड शांघाय बँकेकडील एनपीए ७२० कोटी रुपये असून, बार्कलेज बँकेकडील एनपीएची रक्कम ५४७ कोटी रुपये इतकी आहे.
देशात स्टेट बँक व तिच्या सहयोगी बँका, राष्ट्रीयकृत बँका, जुन्या व नव्या खाजगी बँका, विदेशी बँका आणि ग्रामीण बँका मिळून देशभरात १६९ बँकांच्या एकूण ९७ हजार १०६ शाखा आहेत. यापैकी राष्ट्रीयकृत बँकांची संख्या ४८ हजार ५५१ इतकी आहे. मार्च २००१ अखेर देशात २९७ बँकांच्या एकूण ६५ हजार ९०२ शाखा होत्या. आजघडीला रिझव्‍‌र्ह बँकेकडे केंद्र सरकारची १०० कोटी ४९ लाख, तर राज्य सरकारांची ४२.४६ कोटी इतकी रक्कम जमा असल्याची माहिती रिझव्‍‌र्ह बँकेने अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकार कायद्याखाली विचारलेल्या उत्तरात दिली आहे.

गेल्या काही कालावधीत कच्च्या मालाच्या किंमती वधारल्या आहेत. तसेच विदेशी चलनही महाग होत आहे. परिणामी नफ्यावरील दबाव वाढत आहे. वाहनांच्या किंमती वाढविण्यावाचून आमच्यापुढे आता पर्याय नाही.
मयंक पारिख,
‘मारुती सुझुकी’च्या विपणन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सोमवारी नवी दिल्लीत)    

सेन्सेक्स
१८८६९.६९
४५.७८

निफ्टी
५७३१.२५
१२.४५

वधारले
हिंदुस्थान यूनि.    २.३७%
डॉ. रेड्डीज्    २.६५%
कोल इंडिया    १.९८%
हिंदाल्को    १.५५%
टीसीएस    १.४६%

घसरले
जिंदाल स्टील    -४.५८%
हीरो मोटोकॉर्प    -१.६६%
बजाज ऑटो    -१.५६%
इन्फोसिस    -१.१७%
आयटीसी    -१.१५%