विदेशातून ११०० कोटी उभारण्याला जैन इरिगेशनला भागधारकांची मंजुरी Print

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
विदेशी चलनातील परिवर्तनीय कर्जरोख्यांच्या (एफसीसीबी) तसेच भागभांडवल (इक्विटी) आणि आंतरराष्ट्रीय वाणिज्य कर्ज (ईसीबी) या माध्यमातून एकूण १,१०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य आंतरराष्ट्रीय स्तरावरून उभे करण्याच्या प्रस्तावाला जैन इरिगेशन लि.ने भागधारकांची मंजुरी अलीकडे आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत मिळविली. येत्या दोन आठवडय़ात हा निधी कंपनीला प्राप्त होईल, अशी माहिती जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जैन यांनी दिली. इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या जागतिक बँकेचे अंग असलेल्या संस्थेसह अन्य जागतिक वित्तीयसंस्थांनी जैन इरिगेशनच्या कृषी-विकासाभिमुख योगदानाची दखल घेऊन अर्थसहाय्यासाठी पुढाकार दाखविल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विदेशातील आकर्षक दरातील या कर्जामुळे कंपनीला दरसाल व्याजरकमेत तब्बल ८० कोटी रुपयांची बचत करता येईल. सद्यस्थितीत कंपनीला देशांतर्गत कर्जासाठी दरसाल केवळ व्याजावर ४०० कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत.