आर्थिक वर्षांत सेंट्रल बँक नवीन २०० शाखा व १६०० एटीएम उघडणार : टांकसाळे Print

व्यापार प्रतिनिधी , मुंबई

राष्ट्रीयीकृत असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुढील सहा महिन्यात देशभरात २०० नवीन शाखा व १६०० एटीएम उघडणार असून बँकेच्या एकूण व्यवसायात चालू आíथक वर्षांत सुमारे १७ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे बँकेचे अध्यक्ष एम.व्ही. टांकसाळे यांनी सांगितले. सेंट्रल बँकेच्या वाशी शाखेमध्ये आयोजित कार्यप्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. सेंट्रल बँकने आता अद्ययावत सेवा देणाऱ्या ई-लॉबी प्राधान्याने स्थापन करण्याचे ठरविले आहे. या ई-लॉबी सेवेअंतर्गत एकाच ठिकाणी धनादेश जमा करणे, रोख रक्कम जमा करणे व खात्यातून काढणे किंवा पासबूक िपट्र करणे थेट ग्राहकांना शक्य होणार आहे. सध्या बँकेच्या मुंबई व बेलापूर या ठिकाणी ई-लॉबी कार्यरत असल्याची माहिती टांकसाळे यांनी दिली. बँकेच्या संपूर्ण भारतात एकूण ४१०० शाखा कार्यरत असून १३०० उपशाखा व सुमारे ३७५० गावांमध्ये बँकिंग प्रतिनिधींमार्फत ग्रामस्थांना सेवा पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीयीकृत बँकांची सेवा उपलब्ध नसलेल्या खेडय़ामध्ये सेंट्रल बँकेने विशेष मोहीम राबवून सुमारे ३५ लाख लोकांपर्यंत बँकिंग सुविधा नेण्याचे मोठे कार्य केले असल्याचे टांकसाळे यांनी सांगितले.  महाराष्ट्रातील सात जिह्यांमधील विशेषत विदर्भ व मराठवाडय़ातील दुर्गम भागात बँकिंग प्रतिनिधींतर्फे या सुविधा पोहचविण्यात बँकेने पुढाकार घेतल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकिंग सुविधा अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्यासाठी आपली बँक कटिबद्ध असल्याचे प्रतिपादनही टांकसाळे यांनी केले.