अर्थव्यवस्था पुन्हा वेग धरेल : राष्ट्रपती Print

व्यापार प्रतिनिधी , मुंबई

भारतीय अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा वेग धरला असून लवकरच ती पूर्वपदावर येईल, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला. राष्ट्रपतीपदी नियुक्त झाल्यानंतर आर्थिक राजधानीतील आपल्या पहिल्या भेटीत मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या आगामी वाटचालीबाबत आशावाद निर्माण केला. ‘फिक्की’तर्फे आयोजित ‘इंडिया केम २०१२’ परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल के. शंकरनारायणन, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही याप्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्रीय निर्मिती धोरणाचा उल्लेख करीत मुखर्जी यांनी देशातील निर्मिती क्षेत्राचा हिस्सा सध्याच्या १६ टक्क्यांवरून २०२५ पर्यंत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या २५ टक्के होईल, असे नमूद केले. तसेच या क्षेत्रात २०२२ पर्यंत १० कोटी रोजगारही उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.
समारंभाच्या निमित्ताने रसायन क्षेत्राबद्दल बोलताना त्यांनी हे क्षेत्र वार्षिक उलाढालीच्या केवळ एक ते दोन टक्केच खर्च हा संशोधन व विकासावर करीत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हे प्रमाण ५ ते ६ टक्क्यांवर पोहोचायला हवे, असा आग्रहही त्यांनी या क्षेत्रातील उद्योजकांसमोर धरला. यादृष्टीनेच राष्ट्रीय रसायन धोरण आकारास येत आहे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
सध्या १०८ अब्ज डॉलरची असलेला भारतीय रसायन उद्योग हा जागतिक पातळीवर तूर्त ३ टक्केच हिस्सा राखत असून याबाबत ४५ टक्क्यांपर्यंत वाढणाऱ्या आशियाई क्षेत्रात त्याने अधिक सहभाग घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. या उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवायला हवी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. भारत सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत जपानही सहभागी झाला आहे. तर महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांचेही परिषदेसाठी सहकार्य लाभले आहे.