पालकांच्या अनास्थेमुळेच मुली शिक्षणापासून वंचित Print

‘बालिका हक्क दिना’निमित्ताने ‘क्राय’ची पाहणी
प्रतिनिधी , मुंबई
शाळेतील वातावरणापेक्षाही पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी असलेल्या अनास्थेमुळेच निम्न किंवा गरीब कुटुंबातील बहुसंख्य मुली शिक्षणापासून वंचित राहात असल्याचा निष्कर्ष ‘क्राय’ या स्वयंसेवी संस्थेने देशभरातील चार मुख्य शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
इतर मुलींच्या तुलनेत थोडीफार अधिक उंच आहे, लहान भावंडाची काळजी घेण्यास सक्षम आहे, ‘वयात’ आली, नोकरी करू शकते, घराकामात मदत करू शकते, कुटुंबियांच्या अपरोक्ष घर सांभाळू शकते अशा अनेक कारणांमुळे मुलींचे शिक्षण अध्र्यावर थांबविले जाते. ११ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय बालिका हक्क दिना’निमित्ताने ‘क्राय’ने केलेल्या पाहणीत नेमक्या ह्य़ाच मानसिकतेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. मुलींसाठी सरकारकडून विशेष योजना राबविल्या जातात याची माहितीही अनेकांना नव्हती. ‘शिक्षणाचा अधिकार’ अस्तित्त्वात येऊन चार वर्षे झाली तरी अवघ्या २० टक्के पालकांना या देशात शिक्षण मोफत आहे याची माहिती होती. मुंबईत मात्र या कायद्याविषयी जागरूकता असल्याचे दिसून आल्याचे ‘क्राय’च्या पश्चिम विभागाच्या प्रमुख क्रेयानी रबडी यांनी सांगितले.
या पाहणीत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू या पाच मुख्य शहरांमधील निम्न व गरीब आर्थिक स्तरातील कुटुंबांची मते आजमावून त्यांचा मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तपासण्यात आला. त्यापैकी ७८ टक्के व्यक्ती कुटुंबाला मदत म्हणून घराबाहेर किंवा घरात काम करू शकणाऱ्यांना कोणालाही (मग त्यात लहान मुलेही आली) लहान मूल मानण्यास तयार नव्हत्या.
क्लिक राईट्स फॉर दि गर्ल चाइल्ड
मुलींच्या शिक्षणाविषयी जाणीवजागृती करण्यासाठी ‘इच्छा’ नावाची छायाचित्रे पाठविण्याची मोहीमही राबविण्यात आली होती. यात मुली शाळेपासून दूर जाण्याची कारणे टिपणारी सुमारे दीड हजार छायाचित्रे देशभरातून जमविण्यात आली. या छायाचित्रांचे प्रदर्शन ४ ऑक्टोबरपासून मुंबईच्या हायस्ट्रीट फिनिक्स मॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन ७ ऑक्टोबपर्यंत सुरू राहील.