तीस हजार प्राध्यापकांना १९७ कोटींची थकबाकी अदा Print

न.मा जोशी , यवतमाळ
सहाव्या वेतन आयोगाची राज्य सरकारने प्राध्यापकांना द्यावयाची दहा महिन्यांची थकित रक्कम देण्याचे आश्वासन राज्य सरकारने उशिरा का होईना पाळले असून पाच महिन्यांच्या थकित बाकीचा पहिला हफ्ता अदा केला आहे.
उच्चशिक्षण संचालक डॉ. पी.आर. गायकवाड यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ‘लोकसत्ता’ला शुक्रवारी सांगितले की, प्राध्यापकांना राज्य सरकारने द्यावयाची १ एप्रिल २००९ ते ३१ जानेवारी २०१० या दहा महिन्यांच्या काळातील थकबाकी दोन हफ्त्यात देण्याचे आश्वासन राज्य सरकारने प्राध्यापक संघटनांना दिले होते.

जुलै महिन्यात ही थकबाकीची रक्कम (पहिला हफ्ता) द्यावयाची होती, पण काही महिन्यांच्या थकबाकीचा राज्यातील दहा उच्चशिक्षण सहसंचालकांना त्यांच्या मागणीप्रमाणे अदा करण्यात आला आहे.
नागपूर, अमरावती, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, पनवेल, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, पुणे या दहा विभागीय उच्चशिक्षण सहसंचालकांना थकबाकीची १९७ कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. उच्चशिक्षण सह संचालकांनी आपापल्या विभागातील विद्यापीठांशी संलग्न खाजगी अनुदानित महाविद्यालयांना या रकमेचे वितरण केले आहे. प्राध्यापकांच्या खात्यात थकबाकीची रक्कम जमा झाली आहे. प्राध्यापकांच्या ५१ दिवसांच्या संपानंतर जुलै २०१२ मध्ये थकबाकीची रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, पण जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे जास्तीचे ३ महिने लोटूनही थकबाकी देण्याचे आश्वासन शासनाने पाळले नाही म्हणून, तसेच इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने अर्थात ‘एम फुक्टो’ ने १० ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलन आयोजित केले आहे.
या पाश्र्वभूमीवर आंदोलनाची दखल घेत शासनाने थकबाकीचा पहिला हप्ता उशिराने का होईना पण अदा केला आहे. राज्यातील दहा अकृषक विद्यापीठातील संलग्न असलेल्या १ हजार १४१ अनुदानित खाजगी महाविद्यालयातील जवळपास ३० ते ३५ हजार प्राध्यापकांना या थकबाकीच्या रकमेचा लाभ झाला आहे.
दुसरा हप्ता सुद्धा शासन आश्वासन दिल्याप्रमाणे अदा करील, असा प्राध्यापक महासंघाचा विश्वास आहे. प्राध्यापकांच्या अनेक मागण्यांपैकी एक मागणी सरकारने अंमलात आणली मात्र इतर मागण्या कायम असल्याने १० ऑक्टोबरचे एम.फुक्टोचे मुंबईत आयोजित आंदोलन होणारच असल्याचे प्राध्यापक संघटनांनी म्हटले आहे.