अंतर्गत मूल्यांकनामुळे बहिशाल विभागाचे विद्यार्थी महाविद्यालयांकडे! Print

रेश्मा शिवडेकर , मुंबई - शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

‘टीवायबीकॉम’चा निकाल वेळेत लावता यावा इतक्या माफक हेतूने गुणात्मक दर्जाचा फारसा विचार न करता गेल्या वर्षीपासून मुंबई विद्यापीठाने अवलंबलेला ६०:४० चा ‘तकलादू’ मार्ग विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयांच्याही पथ्यावर पडतो आहे. कारण विद्यापीठाच्याच ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’चे (आयडॉल) शेकडो विद्यार्थी अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली होणाऱ्या गुणांच्या उधळणीचा फायदा घेण्यासाठी येथील प्रवेश सोडून यंदा महाविद्यालयात प्रवेश करते झाले आहेत. ४० टक्के अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली अनेक महाविद्यालयांनी गेल्या वर्षी आपला निकाल फुगवण्यासाठी विद्यार्थ्यांवर गुणांची अक्षरश: उधळण केली होती. त्यामुळे, टीवायबीकॉमचा निकाल आधीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्य़ांनी वाढला. यात प्रथम श्रेणीत (६०टक्क्य़ांहून अधिक गुण) उत्तीर्ण होणारे ३९,६२८ विद्यार्थी होते. या तुलनेत गेल्या वर्षी ही संख्या केवळ १७,९५६ होती. साहजिकच द्वितीय आणि उत्तीर्ण होण्यापुरते (पासक्लास) गुण मिळविणाऱ्यांची संख्या कमी झाली. गेल्या वर्षी ६२ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ ६९ विद्यार्थ्यांवर पासक्लासचा शिक्का बसला होता. या उलट त्या आधीच्या वर्षी पास क्लासमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी होते तब्बल ७,९८५.
अर्थात ६०:४० चा फॉम्र्युला केवळ महाविद्यालयांमधून शिकणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांपुरता मर्यादित होता. आयडॉलच्या नोकरी किंवा तत्सम व्यवसाय करून शिकणाऱ्या मुलांना जुन्याच पद्धतीने (१०० टक्के लेखी) परीक्षा द्यावी लागल्याने त्यांचा निकाल या पद्धतीने फुगला नाही. तिथे निकालाचे प्रमाण ३० टक्क्य़ांच्या आसपासच राहिले. त्यामुळे ही मुले ६०-४० फॉम्र्युल्याचे फायदे लक्षात घेऊन आयडॉलचे प्रवेश रद्द करून मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घेत आहेत.
आयडॉलचा प्रवेश रद्द करून अन्य महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. गेल्या वर्षी बीकॉमच्या दुसऱ्या वर्षांतून शेवटच्या वर्षांला प्रवेश घेणाऱ्या केवळ २१८ विद्यार्थ्यांनी आयडॉलमधून हे प्रमाणपत्र घेतले होते. यंदा ही संख्या ७३९ वर गेली आहे.
विद्यार्थ्यांच्या तुलनेत अध्यापकांची कमतरता यामुळे टीवायबीकॉमचा निकाल वेळेत लावणे मुंबई विद्यापीठापुढे मोठे आव्हान असते. गेल्या वर्षी हा निकाल तब्बल १०० दिवसांनी लांबला. त्यावर उपाय म्हणून यावर्षी केवळ टीवायबीकॉमपुरता ६०:४०चा फॉम्र्युला राबविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार १०० गुणांपैकी केवळ ६० गुणांच्या लेखी परीक्षेची जबाबदारी विद्यापीठावर राहिली. उर्वरित ४० टक्के गुणांची जबाबदारी चाचण्या, अहवाल सादरीकरण, हजेरी आदी ‘अंतर्गत मूल्यांकना’च्या माध्यमातून महाविद्यालयांवर टाकण्यात आली. महाविद्यालयांनी याचा फायदा आपला निकाल फुगवण्यासाठी केला. विद्यापीठाने नेमलेल्या समितीच्या अहवालात हे सिद्धही झाले आहे. ६० टक्क्य़ांच्या लेखी परीक्षेतही २० गुण ‘बहुपर्यायी’ स्वरूपाचे करून परीक्षकांच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामाचा ‘बोजा’ही कसा कमी होईल याची काळजी घेण्यात आली. २०११पासूनच पदवीच्या पहिल्या वर्षांला लागू करण्यात आलेली श्रेयांक-श्रेणी पद्धती दोन वर्षांत झिरपत तिसऱ्या वर्षांपर्यंत येणारच होती.  
या सर्व गोष्टी नजरेआड करून केवळ निकाल वेळेत लावण्याचे अल्पकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा नियम लागू केला गेला. त्यासाठी नेहमीप्रमाणे ‘तज्ज्ञां’ची समिती नेमण्याचा देखावा उभारण्यात आला. पण, निकाल वेळेत लावण्यासाठी केलेली ही वरवरची आणि तात्पुरती मलमपट्टी वाणिज्य शाखेचा गुणात्मक दर्जा खालावणारी ठरणार आहेत, असे मत प्राध्यापकांकडून व्यक्त होते आहे.    

अभ्यास कशाला करायचा?
तीन तासांच्या परीक्षेऐवजी संपूर्ण वर्षभर अंतर्गत मूल्यांकनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कस लागावा, असे या नव्या पद्धतीत अपेक्षित आहे. परंतु, एकूण निकाल वाढविण्याच्या प्रयत्नात गुणदानात महाविद्यालयांचा हात जरा जास्तच सुटतो आहे. इतक्या सहजपणे गुण मिळवून उत्तीर्णच काय तर प्रथम श्रेणीही मिळविता येत असेल तर मुलं अभ्यास तरी कशाला करतील
- संजय वैराळ, सिनेट सदस्य
विश्लेषण क्षमता कशी तपासणार?
६० गुणांच्या लेखी परीक्षेत २० गुण बहुपर्यायी उत्तरे असलेल्या प्रश्नांना दिले गेले आहेत. त्यामुळे ज्यात मुलांच्या विश्लेषणात्मक क्षमतांचा कस लागतो अशा दीघरेत्तरी प्रश्नांची संख्या कमी झाली आहे. पदवी स्तरावर विद्यार्थ्यांच्या या क्षमतांचा कस पाहिला जात नसेल तर त्यांना मिळणाऱ्या बीकॉम पदवीचा गुणात्मक दर्जा तरी काय असेल, याचा विचारच न केलेला बरा - ज्येष्ठ प्राध्यापक