मोबाईल फोनचा वापर आरोग्यास अपायकारक नाही Print

नॉर्वेच्या तज्ज्ञगटाचा निर्वाळा
वॉशिंग्टन, पीटीआय

मोबाईल फोनच्या वापराच्या आरोग्याला अपायकारकतेबाबत विविध संभ्रमाला कोणताही शास्त्रीय आधार नसून, प्रत्यक्षात आरोग्याला बाधा पोहचत असल्याचा आजवर कोणताही पुरावा पुढे आलेला नाही, असा निर्वाळा नॉर्वेच्या एका तज्ज्ञ अभ्यासगटाने दिला आहे. घरात वापरात येणाऱ्या अन्य वापरात येणाऱ्या अनेक प्रकरणाच्या उपकरणातून किरणोत्सार हा कमी-अधिक प्रमाणात होतच असतो, त्या तुलनेत मोबाईल फोनच्या वापरातून होणाऱ्या किरणोत्साराचे प्रमाण अत्यल्प असल्याचे या अभ्यासगटाने केलेल्या विस्तृत निरीक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे मोबाईल फोनमुळे कर्करोग, वंध्यत्व व अन्य गंभीर आजारांच्या धोक्याचा बागुलबुवाही अनाठायी असल्याचा स्पष्ट निष्कर्ष समितीने नोंदविला आहे. मोबाईल फोनच्या परिणामी अशा प्रकारचे कोणतेही आजार संभवत असण्याला कोणताही आधार सापडत नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
जगभरात या संबंधाने सुरू अनेक तर्क-वितर्कानंतर या समितीने स्वतंत्रपणे या अभ्यासाची जबाबदारी हाती घेऊन आपला अहवाल सादर केला आहे. गेली तब्बल २० वर्षे मोबाईल फोन वापरणाऱ्यांच्या आरोग्याच्या स्थिती या निमित्ताने अभ्यासली गेली आहे. या समितीत काम करणारे एक शास्त्रज्ञ यॅन अलेक्झांडर यांच्या मते, ‘मोबाईल फोन अथवा अन्य बिनतारी उपकरणांचा सातत्याने वापरातून आरोग्याला गंभीर अपाय नसल्याचे स्पष्टच दिसून येते. मात्र जे संशोधक असा दावा करतात, त्यांच्याकडून त्या पृष्ठय़र्थ काही ठोस पुरावा सादर झाल्याचेही आजवर आढळून आलेले नाही.’
अल्प-क्षमतेच्या विद्युत-चुंबकीय भार निर्माण करणाऱ्या घराघरात वापरात येणाऱ्या अन्य सर्व किरणोत्सारी उपकरणांचा अभ्यास केल्यास, त्यातून मोबाईल फोनच्या वापराची अपायकारकता ही नगण्यच असल्याचे स्पष्टपणे दिसून येते असे अलेक्झांडर सांगतात.