इन्फोसिसने महसुली अंदाज खुंटविला Print

* भरघोस वेतनवाढ, बढती;
* नवीन भरती तूर्तास नाही
पीटीआय
बंगळुरु
रुपयाच्या तुलनेत स्वस्त होणारा डॉलर, आर्थिक मंदीपोटी व्यवसायाला असलेली कमी मागणी याही स्थितीत गेल्या तिमाहीत नफ्यातील वाढ नोंदवूनही इन्फोसिसने एकूणच आर्थिक वर्षांतील महसुली उत्पन्नाचा अंदाज खालावल्याने तमाम उद्योग क्षेत्रात निराशा पसरवली. यामुळे कंपनीच्या समभागमूल्यासह मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांकही रोडावला. कंपनीने चालू आर्थिक वर्षांतील उर्वरित कालावधीत भरघोस वेतनवाढ तसेच पदोन्नती जाहीर केली असली तरी मार्च २०१३ पर्यंत करण्यात येणाऱ्या कर्मचारी भरतीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी केले आहे.
दरम्यान, कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी व्ही. बालकृष्णन हे येत्या ३१ ऑक्टोबर पासून पायउतार होत आहेत. त्यांची जागा आता राजीव बन्सल हे घेतील. कंपनीने जुलैमध्येही महसूल वाढीचा अंदाज आधीच्या ८ ते १० टक्क्यांवरून ५ टक्के केला होता. कंपनीने गेल्याच महिन्यात खरेदी केलेल्या लोजस्टोन कंपनीमुळे आगामी कालावधीत अधिक व्यवसाय वाढीची अपेक्षा तमाम गुंतवणूकदारांनीही व्यक्त केली होती. कंपनीची ही ताबा प्रक्रिया तिच्या इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार होता. कंपनीने २३.७ अब्ज रुपयांचा नफा कमाविताना त्यात २४ टक्क्यांची भर घातली आहे. या कालावधीत कंपनीने नवे ३९ ग्राहकही जोडले होते.
कंपनी आपल्या दीड लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतनही वाढविणार असून १२ हजार कर्मचाऱ्यांना बढती देणार आहे. जानेवारी ते एप्रिल २०१३ या कालावधीत ती देण्यात येईल. सध्याच्या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासूनच ६ ते ८ टक्के वेतनवाढ मिळणार आहे. सलग दोन तिमाहीनंतर ६ टक्क्यांची वेतन वाढ जाहीर केली आहे. एरवी कर्मचाऱ्यांना दोन ते तीन टक्क्यांची वेतनवाढ नियमित होत असते.