तिमाहीत फोनधारक वाढले! Print

नवी दिल्ली
पीटीआय
तिमाहीत एकूण जून २०१२ अखेर देशातील एकूण दूरध्वनीधारकांची संख्या वाढली आहे. या कालावधीपर्यंत एकूण ९६.५५ लाख दूरध्वनीधारक राहिले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीतील वाढ ही १.४९ टक्क्यांची आहे. मार्च २०१२ पर्यंत देशात ९५.१३ लाख दूरध्वनीधारक होते.
भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्चपर्यंत सतत घसरणारे जोडणी विरहित दूरध्वनीधारक जूनअखेर मात्र १.६२ टक्क्यांनी वधारले आहेत. त्यावेळी ९१.९१ लाख सीडीएमए आणि जीएसएमधारकांची असणारी संख्या जूनपर्यंत ९३.४० लाख झाली आहे.
जोडणीधारक दूरध्वनी ग्राहकांची संख्याही कायम घटती आहे. मार्च २०१२ अखेर ३.२१ कोटी धारकांची संख्या जून २०१२ अखेर ३.१४ कोटींवर आली आहे. मार्चपर्यंत २.२८ कोटी असणारे इंटरनेटधारक जूनपर्यंत (+०.६%) २.३० कोटी झाले आहेत. तर ब्रॉडबॅण्डधारकही १.३८ कोटींवरून १.४५ कोटी झाले आहेत.
सप्टेंबरमध्ये मात्र ग्राहक घट
देशातील मोबाईल कंपन्यांमध्ये आघाडीचे नाव असणाऱ्या भारती, व्होडाफोनसारख्या कंपन्यांना यंदाच्या सप्टेंबरमध्ये कमी ग्राहकसंख्येचा फटका बसला आहे. देशातील एकूण मोबाईलधारक या कालावधीत १९ लाखांनी कमी झाले असून त्यांची एकूण ग्राहकसंख्या ६७.१६ कोटींवर आली आहे.
जीएसएम प्रकारात सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेल २७.६८ टक्के बाजारहिश्यासह पहिल्या क्रमांकावर असली तरी तिने ९.८ लाख कमी मोबाईलधारकांसह १८.५९ कोटी ग्राहक नोंदविले आहेत. व्होडाफोन, आयडिया, लूप मोबाईल, व्हिडिओकॉनसारख्या कंपन्यांचीही ग्राहकसंख्या रोडावली आहे.
एअरसेल आणि यूनिनॉर यांचे मोबाईलधारक मात्र सप्टेंबरमध्ये वाढले आहेत. त्यांनी अनुक्रमे ६.५५ लाख आणि ३२,६६२ हजार अधिक ग्राहक मिळविले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेडच्या ग्राहकसंख्येत काहीही फरक पडलेला नाही. ९.६२ कोटींसह कंपनीचा जीएसएम क्षेत्रात १४.३३ टक्के हिस्सा आहे. तर याच क्षेत्रातील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडने १४,७५६ ग्राहक कमी नोंदविले असून तिची सप्टेंबरअखेर ग्राहकसंख्या ५१ लाख आहे.    

एप्रिल-जून तिमाही कामगिरी
* प्रति ग्राहक सरासरी महसूली वाढ    : ९५ रु. (-२रु.)
* प्रति ग्राहक मिनिटांचा वापर     : ३५६ (स्थिर)
* इंटरनेटधारक     : २.३० कोटी
* ब्रॉडबॅण्ड वापरकर्ते ग्राहक    : १.४५ कोटी

* भारती एअरटेल    : १८.५९ कोटी (-९.८ लाख)
* व्होडाफोन    : १५.२६ कोटी (-६.८ लाख)
* आयडिया    : ११.५४ कोटी (-५ लाख)
* बीएसएनएल    : ९.६२ कोटी (स्थिर)