जीएमआरला दिलेला १०.५ कोटींचा धनादेश वटलाच नाही Print

मल्ल्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट
पीटीआय
हैदराबाद
सुमारे १०.५ कोटी रुपयांच्या धनादेश न वटल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने किंगफिशर एअरलाईन्सचे अध्यक्ष विजय मल्ल्या यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजाविले आहे. या प्रकरणात यापूर्वीच समन्स बजावूनही मल्ल्या यांच्यासह कंपनीचे चार संचालक शुक्रवारी सुनावणी दरम्यान अनुपस्थित राहिल्याने अखेर हे वॉरंट बजावण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशमधील जीएमआर हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीने दाखल केलेल्या याचिके दरम्यान एर्रामंजीलच्या १३ व्या विशेष दंडाधिकारी न्यायालयाने मल्ल्या यांच्यासह कंपनीचे मुक्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल तसेच अन्य तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात हे पाऊल उचलले आहे.
हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हाताळणीची जबाबदारी असणाऱ्या जीएमआरने याबाबतची याचिका दाखल केली होती. किंगफिशर कंपनीने तिच्यामार्फत होणाऱ्या विमानांच्या उड्डाणासाठी कंपनीच्या जागेचा वापर, देखभाल आदींसाठीही १०.५ कोटी ही रक्कम होती. या एकूण रकमेचे चार धनादेश किंगफिशरमार्फत जीएमआर कंपनीला देण्यात आले. मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो वटला नाही. या प्रकरणात जीएमआर कंपनी हैदराबादेतील नेमपल्लीच्या गुन्हे न्यायालयात गेली होती. यानंतर हे प्रकरण विशेष न्यायदंडाधीकाऱ्याकडे वर्ग करण्यात आले. याबाबत मल्ल्या यांना २० सप्टेंबर रोजी समन्सही पाठविण्यात आले होते. सुनावणीच्या वेळी शुक्रवारी मल्ल्यांसह किंगफिशरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी कुणीही हजर नव्हते.