मार्केट मंत्र : तेजीला खिंडार आणखी किती? Print

निमिष शाह
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गुंतवणूकदारांच्या हितरक्षणाची जाग एनएसई आणि बीएसई या दोन्ही विद्यमान शेअर बाजारांना आली आहे. गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या व्यवहारांचा तपशील एसएमएस आणि ई-मेलद्वारे येत्या सोमवारी, १५ ऑक्टोबरपासून दोन्ही एक्स्चेंजकडून ताबडतोबीने कळविला जाणार आहे. स्पर्धेचा एक फायदा म्हणजे सेवा गुणवत्ता सुधारते. यथावकाश जेव्हा एमसीएक्स-एसएक्स सुरू होईल तेव्हा विशेषत: छोटय़ा गुंतवणूकदारांचा बाजारात राबता वाढेल यासाठी चढाओढ सुरू झाली तर ती एकंदर भांडवली बाजाराच्या सुदृढतेसाठी आवश्यकच ठरेल.
शेअर बाजारात विदेशी वित्तसंस्थांचा वरचष्मा कायम आहे. किंबहुना सध्याच्या घडीला बाजाराचा कल वरच्या दिशेने ठेवण्यात त्यांचीच गुंतवणूक कामी येत आहे. अन्यथा या स्तंभात अनेकवार लिहिल्याप्रमाणे देशांतर्गत वित्तसंस्था, फंडांकडून गुंतवणूक होण्यापेक्षा निर्गुतवणुकीचेच प्रमाण जास्त आहे. एकूण गेल्या तीन वर्षांत एफडीआय (थेट विदेशी गुंतवणूक) यापेक्षा जास्त गुंतवणूक ही विदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांकडून सुरू आहे. असा हा प्रायव्हेट मनी अर्थात शेअर बाजारातही येत आहे.
सेन्सेक्स १९,००० वर अल्पकाळासाठी गेला आणि पुन्हा खाली रोडावला आहे. त्यामुळे बहुतांश गुंतवणूकदारांनी पुन्हा ‘डिफेन्सिव्ह’ धाटणीच्या शेअर्सकडे होरा वळविला आहे. सतत वाढत असलेले हिंदुस्तान युनिलीव्हर, आयटीसी हे स्पष्ट करतात. शुक्रवारी इन्फोसिसच्या निकालाचे आकडे बाजाराच्या एकूण अपेक्षेच्या किंचित फरकाने आले असले, तरी निकालासंबंधी आणि भविष्यातील दृष्टीक्षेपाविषयी व्यवस्थापनाकडून आलेल्या वक्तव्यांनी बाजाराची निराशा केली. गेल्या तिमाहीत एकाच दिवशी निकाल जाहीर करणाऱ्या क्रमांक १ व २ च्या आयटी कंपन्यांनी आता आठवडाभराचे अंतर राखले आहे. टीसीएसचा निकाल १९ ऑक्टोबरला येऊ घातला आहे.
आयसीआयसीआय बँकेने गृहकर्जाच्या दरात जवळपास एका टक्क्याने केलेली घट ही आगामी सणासुदीच्या ऑफर्सची नांदी देणारी आहे. अशा ऑफर्स केवळ बँकांकडूनच नव्हे तर अन्य अनेक क्षेत्रातील कंपन्यांकडून आता सुरू होतील. गेले वर्ष-दीडवर्ष नुकसान झेलणाऱ्या ब्रोकिंग कंपन्यांनाही आगामी दिवस चांगले राहण्याची शक्यता आहे. सत्यम कॉम्प्युटरचा वनवास संपल्याचे दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये बीएसईच्या ‘ए’ वायदा गटात त्याने पुन्हा स्थान कमावले आहे. तर मागे ८६९ वर सुचविलेला वोखार्ट फार्मा तुफान वाढला आहे. दररोज वरचे सर्किट लागत १४२० वर पोहचलेल्या या शेअर्सनी अनेकांचा चांगलाच फायदा दिला असेल. परिणामी ‘टी’ ग्रुपमध्ये वर्णी लागलेल्या वोखार्टमधून आता नफा कमावून बाहेर पडलेले बरे. नवीन खरेदीसाठी ब्रुक्स लॅब्स चांगला वाटत आहे. दीर्घकालीन खरेदीसाठी ‘जीएसएफसी’वर लक्ष असावे.
एरव्ही ऑक्टोबरचा महिना हा मंदीचाच असतो. यंदाच्या ऑक्टोबरच्या सुरुवातीला तेजीचा उत्साही प्रवाह दिसून आला आणि पुढे या तेजीला खिंडार पडतानाही दिसून आले. तेजी अखंड राहील की खिंडार विस्तारेल काय हेच आता पाहायचे!