चर्चा-वाटाघाटी मुंबईत, प्रत्यक्ष प्रकल्प-गुंतवणूक मात्र राज्याबाहेर! Print

प्रगत महाराष्ट्राला मुंबईत येऊन थेट आव्हान
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, केरळचे मुख्यमंत्री ओम्मेन चांडी आणि आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग आपले उद्योग विभाग आणि बडय़ा अधिकाऱ्यांच्या फौजफाटय़ासह आर्थिक राजधानी मुंबईत डेरेदाखल होतात; येथील विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा-वाटाघाटी करतात आणि प्रसंगी प्रकल्प-गुंतवणुकीविषयक करारमदारही केले जातात.

गेल्या काही महिन्यांमध्ये असे चित्र वारंवार दिसून येत असून, औद्योगिकदृष्टय़ा प्रगत महाराष्ट्राला केवळ आंध्र-कर्नाटक-गुजरातच नव्हे तर अशा उदयोन्मुख स्पर्धक राज्यांकडूनही आता आव्हान मिळू लागले आहे.
आपापल्या राज्यात गुंतवणुकीचा ओघ वाढावा यासाठी उद्योगपतींना आकृष्ट करण्यासाठी गेल्या तीन महिन्यात मध्यप्रदेश, केरळ या राज्यांच्या मुख्यमंत्र्यापाठोपाठ छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग गुरुवारी मुंबई दौरा करून गेले. मुंबईत येण्यापूर्वी त्यांनी पुण्यातही याच कामासाठी ते एक दिवस थांबले होते. मुंबईत हिंदुजा (अशोक लेलॅण्ड), कुमारमंगलम बिर्ला (आदित्य बिर्ला समूह), एस्सेल समूहाचे (सुभाष चंद्रा), बियाणी (फ्युचर समूह)  निरंजन हिरानंदानी, अभिनेता व नवउद्योजक अजय देवगण वगैरे मंडळींशी त्यांच्या भेटीगाठी झाल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे सर्वात स्वस्त विजेची उपलब्धता आणि अखंडीत वीजपुरवठा, पोलाद, सीमेंट, अ‍ॅल्युमिनियम या कच्चा मालाची स्थानिक स्तरावर मुबलक उपलब्धता, प्रकल्प मंजुरीची वेगवान प्रक्रिया आणि राजकीय स्थैर्य या छत्तीसगडच्या वैशिष्टय़ांना पाहून अनेक उद्योगांनी स्थलांतरणाचा विचार बोलून दाखविला असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी छत्तीसगडचा पर्याय सर्वाधिक आकर्षक वाटत असल्याचेही अनेकांनी सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नक्षलवादी हिंसाचाराची समस्या गंभीर असली तरी ती केवळ बस्तरच्या छोटय़ा विभागापुरती सीमित आहे. आधीच वरकड वीजनिर्मिती करणाऱ्या छत्तीसगडमध्ये पुढील दोन-तीन वर्षांत जवळपास ४० वीजप्रकल्पातून आणखी ३० हजार मेगाव्ॉटची वीजनिर्मिती अपेक्षित आहे. प्रचंड निसर्गसंपदा लाभलेल्या राज्याचा गेले दशकभर कृषी क्षेत्राचा तसेच आर्थिक विकासदर दोन अंकी स्तरावर राहिला आहे आणि या छत्तीसगडच्या उजव्या बाबी येत्या २ ते ३ नोव्हेंबरला होत असलेल्या जागतिक गुंतवणूकदार संमेलनात ठळकपणे देशविदेशातील गुंतवणूकदारापुढे ठेवण्यात येतील, असे छत्तीसगडचे मुख्य सचिव सुनील कुमार यांनी सांगितले. अभिनेता अजय देवगण यांनी सौर ऊर्जाक्षेत्रात स्वारस्य दाखविले आहे; हिंदुजा समूह फाऊंड्री व फोर्जिग उद्योगासाठी उत्सुक आहे, एस्सेल समूह अम्युझमेंट पार्कसाठी त्याचप्रमाणे आयटी, आयटीसंलग्न सेवा, वाहन उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योगात नव्याने गुंतवणूक येऊ घातली असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि प्रत्यक्षात महाराष्ट्रातून किती उद्योगांचे नेमके स्थलांतरण होते, हे ३ नोव्हेंबरच्या संमेलनातून दिसून येईल.