कर्नाटक बँकेचे अधिग्रहण : आयसीआयसीआय, कोटक बँकेकडून इन्कार Print

कर्नाटक बँकेचा समभाग वर्षांच्या उच्चांकावर
व्यापार प्रतिनिधी , मुंबई
दक्षिण भारतातील खासगी क्षेत्रातील कर्नाटक बँकेने, खासगी क्षेत्रातील देशातील अग्रणी आयसीआयसीआय बँक तसेच कोटक बँकेकडून ताबा मिळविला जाण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. शिवाय ताब्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही आयसीआयसीआय तसेच कोटक बँकेने इन्कार केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून अघिग्रहणासाठी कर्नाटक बँकेचे नाव चर्चिले जात आहे. मंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या या खासगी बँकेवर आयसीआयसीआय बँकेकडून अधिग्रहणासंबंधाने रिझव्र्ह बँकेला रीतसर प्रस्तावही सादर केला गेला असल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने मंगळवारी ठळकपणे प्रसिद्धीस दिले.

कोटक महिंद्र बँकेने कर्नाटक बँकेत स्वारस्य दाखविले असून, रिझव्र्ह बँकेकडे तिचाही तसा प्रस्ताव गेला असल्याचे या वृत्तात म्हटले गेले होते. तथापि, कर्नाटक बँकेने ‘राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)’कडे खुलासेवार निवेदन देताना, ‘प्रसिद्धीमाध्यमांतील या सारख्या अफवांचे आपण खंडन करीत आहोत. गुंतवणूकदारांनी याची दखल घ्यावी’, असे म्हटले आहे. त्याचबरोबर, आयसीआयसीआय बँक तसेच कोटक महिंद्र बँकेनेही अशा कोणतेच प्रयत्न त्यांच्या वतीने सुरू नसल्याचे ‘एनएसई’कडे खुलाशादाखल स्पष्ट केले आहे.
परंतु ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्ताच्या परिणामी कर्नाटक बँकेच्या समभागाला जोरदार मागणी मिळाली. त्याने रु. १२७ अशा वर्षांच्या उच्चांकावर मजल मारली. दुपारनंतर एकंदर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला तरी कर्नाटक बँकेचा समभाग कालच्या तुलनेत १.८० टक्क्यांची वाढ दाखवून रु. १२२.६० वर बंद झाला. गेल्या महिनाभरात कर्नाटक बँकेचा समभाग तब्बल ४० टक्क्यांनी वधारला आहे. १७ सप्टेंबरला रु. ८६.५५ वर असलेला हा समभाग १५ ऑक्टोबरला रु. १२०.८० (बीएसई) वर गेला. भावातील या वाढीला या समभागांतील उमद्या उलाढालीतील वाढीचीही साथ मिळत आली आहे. दैनंदिन उलाढाल ३ ते ६ कोटी रुपयांदरम्यान असलेल्या या समभागात गेल्या आठवडय़ाभरापासून सरासरी ११ ते १३ कोटी रुपयांची उलाढाल होत आली आहे. १२ ऑक्टोबरला तर या समभागात ३१.३२ कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल नोंदली गेली आहे.