सुरक्षा मापदंडांच्या अभावी ७ लाख कार्यालयीन दिवसांचे नुकसान Print

 

व्यापार प्रतिनिधी , मुंबई
दक्षिण मुंबईतील मंत्रालयाला तसेच प्रचंड गजबजाटीच्या मनिष मार्केटला हल्लीच लागलेल्या आगीच्या घटना या सुरक्षाविषयक मापदंडांबाबत झालेल्या दुर्लक्षाची उदाहरणे आहेत. व्यावसायिक सुरक्षा आणि स्वास्थ्यासंबंधी नियम अस्तित्वात असूनही त्याचे पालन करण्याबाबत होणाऱ्या बेपर्वाईची भयानक परिणती म्हणजे देशभरात दरवर्षी सरासरी ७ लाख कार्यालयीन दिवसांचे नुकसानीत होते असे आढळून आले आहे.


कामाच्या ठिकाणी असणारे धोके व जोखीम ओळखणे, त्यानुसार योग्य खबरदारीचे उपाय योजणे, आपत्कालीन जोखीम व्यवस्थापन वगैरेंवर सुरुवातीला एकरकमी मोठा खर्च करावा लागणार असला तरी अंतिमत: तो उद्योग-आस्थापनेसाठी दीर्घमुदतीत संभाव्य नुकसान टाळणारी गुंतवणूकच ठरते, असे यूबीएमचे प्रकल्प संचालक विजय अधिकारी यांनी सांगितले. यूबीएमच्या पुढाकाराने येत्या १८ व १९ ऑक्टोबर रोजी नेहरू सेंटर, वरळी येथे आयोजित होत असलेल्या ‘व्यावसायिक सुरक्षा व स्वास्थ्य (ओएसएच- इंडिया)’ या प्रदर्शनाची माहिती देताना त्यांनी हे सांगितले. देशातील निर्माण क्षेत्र, तेल, वायू व ऊर्जा क्षेत्र, खाणकाम, अवजड अभियांत्रिकी, बांधकाम, वाहन उद्योग, औषधी आणि हॉटेल्स व करमणुकीच्या क्षेत्राशी निगडीत हजारो व्यवसायिक तसेच सुरक्षा व स्वास्थ्य-तज्ज्ञांसाठी ‘ओएसएच इंडिया’ हे व्यासपीठ ठरेल, असे त्यांनी सांगितले. सुरक्षाविषयक विविध मुद्दय़ांवर चर्चा करणाऱ्या या शुल्क-आधारीत उपक्रमाच्या आयोजनात थ्रीएम इंडिया, ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल, अन्सेल हेल्थकेअर युरोप, लेकलॅण्ड ग्लोव्हज् अॅण्ड सेफ्टी अॅपरल व हनीवेल सेफ्टी प्रॉडक्ट्स यासारख्या अग्रगण्य कंपन्यांचा समावेश आहे.