सीआरआय पंप्सचे युरोपीय बाजारपेठेत पाऊल Print

 

ब्रिटनची कंपनी ताब्यात घेत नव्या उत्पादन निर्मितीत
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
युरोपीय बाजारपेठेत अधिक विस्तार करताना पंप निर्मिती आणि निर्यातीतील आघाडीच्या सीआरआय पंप्स कंपनीने ब्रिटनस्थित पंप्स अॅण्ड प्रोसेस सिस्टिमचा काही व्यवसाय ताब्यात घेतला आहे. या कंपनीचा सुमारे ९० टक्के व्यवसाय खरेदी करताना सीआरआय पंप्सने औद्योगिक वापरासाठीच्या नव्या उत्पादन निर्मितीत पाऊल ठेवले आहे.


१९९१ मध्ये स्थापन झालेल्या पंप्स अॅण्ड प्रोसेस सिस्टिम्समार्फत ब्रिटनबरोबरच कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, चिली या देशांमध्ये विविध उत्पादने पुरविली जातात. याबाबतचा एकूण व्यवहार स्पष्ट करण्यात आला नसला तरी यासाठी अंतर्गतरित्या भांडवल उभारणी करण्यात आल्याची माहिती सीआरआय पंप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी चैतन्य कोरान्न्ो यांनी दिली. ब्रिटनच्या या कंपनीची उत्पादने आता सीआरआय पंप्सच्या ब्रॅण्डअंतर्गत तयार करून विकली जाणार आहेत. सीआरआय कंपनी पंप्स अॅण्ड प्रोसेस सिस्टिम्सच्या सहकार्याने भारतातील व्यवसाय विस्तार कायम राखताना कोईम्बतूर येथे नवीन उत्पादन निर्मिती प्रकल्प येत्या काही दिवसात साकारणार आहे.
जागतिक पंप बाजारपेठ ही ३,२०० कोटी डॉलरची असून त्यात भारतीय पंप निर्मिती क्षेत्र २०० कोटी डॉलरचा हिस्सा राखते. तर सीआरआय पंप्सने मार्च २०१३ अखेर १,००० कोटी रुपयांच्या उलाढालीचे आणि २०० कोटी रुपयांच्या निर्यातीचे उद्दीष्ट राखले आहे. २०११-१२ मध्ये कंपनीने ८०० कोटी रुपयांची उलाढाल आणि १३० कोटी रुपयांची निर्यात नोंदविली आहे.