नवीन ‘अल्टो’च्या बुकिंग्जने १० हजाराचा आकडाही गाठला! Print

alt

तीन लाखांपेक्षा कमी किमतीच्या कार बाजारपेठेत नवीन स्पर्धक दाखल
व्यापार प्रतिनिधी , मुंबई
मारुती सुझुकीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिन्झो नाकानिशी यांनी मंगळवारी नवी ‘अल्टो ८००’ ही कार सादर केली. नवी अल्टो ८०० ही जुन्या मारुती ८०० च्या समकक्ष किंमत असलेली कार असून ती आता टाटाच्या नॅनो, ह्युंदाईच्या ईऑन व शेव्हर्लेच्या स्पार्कबरोबर स्पर्धा करेल.


पदार्पणापूर्वीच त्यासाठी १०,००० नोंदणी झाली आहे. गेल्या चार वर्षांपासून कंपनीचे २०० हून अधिक अभियंते ही कार तयार करीत होते. यासाठी कंपनीचे ४७० कोटी रुपये खर्ची पडले आहेत. मारुतीची अल्टो सर्वप्रथम २००० मध्ये रस्त्यांवर उतरविण्यात आली होती. या कालावधीत ती २० लाखांहून अधिक विकली गेली आहे. तर कंपनीने १९८४ मध्ये सर्वप्रथम वाहने तयार करताना मारुती ८०० च सादर केली होती. ८० च्या दशकात वर्षांला ४० हजार वाहने विकणाऱ्या या कंपनीची स्वस्तातील प्रवासी वाहने चालू आर्थिक वर्षांत मात्र २१ टक्क्यांनी कमी विकल्या गेली आहेत.
पेट्रोल आणि सीएनजीवर धावणाऱ्या या कारची किंमत अनुक्रमे २.४४ ते २.९९ लाख व ३.१९ ते ३.५६ लाख रुपये आहे. सध्याच्या अल्टोची किंमत पेट्रोलसाठी २.४९ ते ३ लाख तर सीएनजीसाठी २.९७ ते ३.४८ लाख रुपये आहे. पेट्रोलवरील अल्टोची इंधनक्षमता २२.७४ किमी प्रती लिटर तर सीएनजीवरील ८०० ची इंधनत्रमता ३०.४६ किमी प्रती किलो आहे.