‘फोर्स मोटर्स’कडून २६ आसनी ट्रॅव्हलर व्हॅन Print

alt

प्रतिनिधी , पुणे
फोर्स मोटर्स या कंपनीने ‘ट्रॅव्हलर २६’ ही २६ आसनी ‘मोनोकॉक पॅनेल’ व्हॅन बाजारात आणली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसन फिरोदिया आणि विक्री व विपणन विभागाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी एन. के. रतन यांनी मंगळवारी या गाडीची तीन रूपे सादर केली. २०१३-१४ या आर्थिक वर्षांत या ४,५०० गाडय़ा विकण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. तसेच पुढील २-३ वर्षांत सध्याच्या तीन पट म्हणजे, दहा हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले.


बिगर वातानुकूलित, स्कूल बस व वातानुकूलित अशा तीन प्रकारांत ही वाहने उपलब्ध आहेत. यापैकी बिगर वातानुकूलित गाडीची किंमत १० लाख ८७ हजार रुपये आहे. ‘फोर्स’च्या याआधी ‘ट्रॅव्हलर’ श्रेणीच्या व्हॅन उपलब्ध आहेत. त्याच्या ६५,००० गाडय़ांची विक्री झाली आहे. आता नव्याने आलेल्या व्हॅन्समध्ये मोनोकॉक पॅनेल तंत्रज्ञानाचा वापर केलेली ही जगातील पहिलीच गाडी आहे, असा दावा कंपनीने केला आहे. मोनोकॉक तंत्रज्ञानात स्टीलच्या पॅनेल्सपासून गाडीची एकसंध बॉडी बनविली जाते. गाडीचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. ‘ट्रॅव्हलर’ श्रेणीत या गाडीची इंधन कार्यक्षमता १५ टक्क्य़ांनी अधिक असल्याचा कंपनीचा दावा आहे. द्रुतगती मार्गावर या गाडीची इंधन कार्यक्षमता एक लिटर पेट्रोलला ९ किलोमीटर तर शहरांत लिटरला ८ किलोमीटर इतकी आहे. याबरोबरच या गाडीला चारही चाकांवर ‘व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक’ची सुविधा आहे. प्रवाशांना चढणे-उतरणे सोपे जावे यासाठी गाडीच्या फ्लोअरची उंची कमी ठेवली गेली आहे. तसेच प्रवासादरम्यान होणारे अपघात टाळण्यासाठी गाडीचे केंद्रीय गुरूत्वही कमी ठेवण्यात आले आहे. कंपनीतर्फे पुढील वर्षी लक्झरी प्रकारातील ट्रॅव्हलर २६ गाडी सादर करण्यात येईल. तसेच या वर्षांच्या अखेरीस नवीन ‘स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल’ही सादर करण्यात येईल असे फिरोदिया म्हणाले. कंपनी पुढील वर्षी आणखी एक व्हॅन बाजारात आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.