‘ओरिएन्ट एक्स्प्रेस’वर ताब्यासाठी टाटांचा पुन्हा प्रयत्न Print

रतन टाटांच्या निवृत्तीपूर्वी  होणार व्यवहार
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

पाच वर्षांपूर्वी अशयस्वी ठरलेल्या खेळीसाठी टाटा समूहाकडून पुन्हा प्रयत्न सुरू आहे. ‘ताज’सारखे साखळी हॉटेल चालविणाऱ्या टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स कंपनीने अमेरिकास्थित ओरिएन्ट एक्स्प्रेस हॉटेल्स खरेदी करण्यासाठी पुन्हा चंग बांधला आहे. यामार्फत कंपनीला आंतरराष्ट्रीय ऐषारामी हॉटेल शृंखलेवर ताबा मिळवता येईल.
इंडियन हॉटेल्सने यासाठी ओरिएन्टला धाडलेल्या प्रस्तावात प्रति समभाग १२.६९ डॉलरचा मोबदला रोखीने मोजण्याची तयारी दर्शविली आहे. टाटा समूहातील या हॉटेल कंपनीची अगोदरच ओरिएन्टमध्ये ६.९ टक्के हिस्सा आहे. (२००७ मध्ये तो १० टक्के होता.) मात्र उर्वरित सर्व ९३.१ टक्के हिस्सा खरेदी करून या हॉटेल साखळीवर वर्चस्व मिळविण्याची टाटा समूहाचा मानस आहे. या ताबा व्यवहारासाठी इंडियन हॉटेल्सने मोजलेली किंमत ही त्या कंपनीच्या बाजारमूल्यापेक्षा (गुरुवारच्या समभाग भावानुसार) ४० टक्के अधिक आहे. टाटामार्फत आलेला प्रस्ताव विचाराधीन असल्याचे ओरिएन्टनेही मान्य केले असून अद्याप यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. जगभरात २२ हॉटेल्स कार्यरत असलेल्या ओरिएन्टवर सध्या ५३ कोटी डॉलरचे कर्जही आहे. गेल्या दशकभरात टाटा समूहाने रतन टाटा यांच्या अध्यक्षतेखाली विदेशात अनेक कंपन्या पादाक्रांत केल्या. टाटा डिसेंबर २०१२ अखेर निवृत्त होण्यापूर्वी कंपनीला हा व्यवहार पूर्ण करावयाचा आहे. टाटा यांना ओरिएन्टचे माजी मुख्याधिकारी पॉल व्हाईट तसेच फेरारी कार निर्माता कंपनीचे विद्यमान अध्यक्ष लुका कॉर्डेरो यांचा रतन टाटा यांना या ताबा व्यवहारासाठी उघड पाठिंबा आहे.