केजी टू बारावी : विद्यार्थ्यांसाठी नवी विशेष वाहिनी Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
केजी ते थेट बारावीपर्यंतच्या मुलांना आधुनिक दृकश्राव्य माध्यमाद्वारे शिक्षण देणारी नवी दूरचित्रवाहिनी झी समूहाने सुरू केली आहे. झीक्यू या नावाने सादर करण्यात आलेल्या या वाहिनीत उपरोक्त वर्गाचे सर्व अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत. झी समूहाच्या झी लर्न या शैक्षणिक साखळी असलेल्या कंपनीमार्फत या नव्या वाहिनीसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या वाहिनीवर दिवसभर विविध शैक्षणिक कार्यक्रम असतील. गेल्या १८ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या झी लर्नच्या देशभरातील ३ लाख विद्यार्थी आणि पालक तसेच शिक्षकांशी संवाद साधून आलेल्या अनुभवातून नव्या वाहिनीसाठीचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आल्याची माहिती झीक्यूच्या व्यवसाय प्रमुख शुभदशी त्रिपाठी यांनी दिली. गेल्या दोन दशकांपासून देशातील मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या झी समूहाच्या सध्या विविध ३१ दूरचित्रवाहिन्या असून १६८ देशांमध्ये त्यांचे ६५ कोटींहून अधिक दर्शक आहेत. कंपनीचे झीक्यू ही नवी ३२ वी वाहिनी असून दिवसाचे २४ तास तिचे प्रसारण पेड चॅनल म्हणून असेल.