तीन महिन्याचाच देतो : व्यवस्थापन Print

किमान चारचा द्या : संघटना
तिढा पगाराचा
व्यापार प्रतिनिधी, मुंबई

एकाएैवजी तीन महिन्यांचे वेतन आणि तेही दिवाळीपूर्वी देतो, असे केवळ तोंडी आश्वासन किंगफिशरने सोमवारी कर्मचाऱ्यांना दिले. मात्र लेखी आणि अवघ्या दोन दिवसात, तेही सातपैकी किमान चार महिन्यांचा पगार तरी द्या, या कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर गेल्या २० दिवसांहून अधिकपासून सुरू असलेला एअरलाईन्समधील तिढा कायम आहे. सोमवारी मुंबईत व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत कंपनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही विभागातील कर्मचाऱ्यांना आणि तेही केवळ पहिल्या तीन महिन्यांचेच वेतन देण्याचे तोंडी आश्वासन दिले. मात्र सर्व कर्मचाऱ्यांना आणि तेही किमान चार महिन्यांचे पूर्ण वेतन लेखी आश्वासनासह मिळाले पाहिजे, या संघटनेच्या आग्रहाखातर चर्चा पुन्हा फिस्कटली. आंदोलक कर्मचाऱ्यांचा आता कंपनीच्या व्यवस्थापनावर विश्वास राहिला नसल्याचे आजच्या चर्चेतून स्पष्ट जाणवत होते. तसे संघटनेच्या नेत्यांनी थेट बोलूनही दाखविले. व्यवस्थापनाचा मुख्य कार्यकारी अधिकारीच कोणाशीही आमची बोलण्याची तयारी नाही; आम्हाला थेट मल्ल्या यांचीच (किंगफिशरचे मालक) भेट हवी आहे, असा तगादा यावेळी लावण्यात आला.
सलग चौथ्यांदा वाढविण्यात आलेल्या टाळेबंदीची मुदत उद्याच, मंगळवारी संपत आहे. असे असले तरी कंपनीने येत्या ६ नोव्हेंबपर्यंत उड्डाणे न घेण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. आणि यानंतर आठवडय़ाभरातच (११ नोव्हेंबरपासून) दिवाळी आहे. नागरी हवाई संचालनालयाने कंपनीला उड्डाणे घेण्यास दिलेली स्थगिती कायम  आहे.