आशावाद उंचावला! Print

व्यापार प्रतिनिधी , मुंबई

केंद्र सरकारतर्फे घेतलेल्या आर्थिक सुधारणांचा परिणाम हा सकारात्मकच आहे आणि त्याचा देशातील उद्योग व्यवसायावरही तसाच परिणाम होईल, असा बळकट आशावाद कंपन्यांची आर्थिक जबाबदारी हाताळणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘डन अ‍ॅण्ड ब्रॅडस्ट्रीट इंडिया’ (डी अ‍ॅण्ड बी) या विश्लेषक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. देशातील एकूण आर्थिक व्यवस्थेविषयी मत मांडताना या अधिकाऱ्यांनी येत्या तीन महिन्यात भारतीय अर्थव्यवस्था वेग धरेल, असे म्हटले आहे. यासाठी मुख्य कारण हे सरकारतर्फे नुकत्या जाहीर झालेल्या आर्थिक सुधारणा हेच असेल, असेही नमूद केले आहे. यासाठी ‘कॅलेंडर’ (जानेवारी ते डिसेंबर) वर्ष ग्राह्य धरण्यात आले आहे. यानुसार या वर्षांतील ऑक्टोबर ते डिसेंबर २०१२ या तिमाहीत देशाची एकूणच आर्थिक स्थिती ही केवळ वर्षभरापूर्वीच्या या कालावधीपेक्षाच नव्हे तर आधीच्या तीनही तिमाहीच्या तुलनेत उंचावलेली असेल.
आशावादासाठी ० ते १०० अशी पातळी आहे. यामध्ये १०० मध्ये अधिकाधिक आशावादी, असा त्याचा अर्थ होतो. करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ही पातळी ६० इतकी आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत या पातळीत यंदा ८.१ टक्के वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर गेल्या तीनही तिमाहीपेक्षा यंदाची ही आशादायक पातळी अधिक उंचावली आहे.
यापूर्वी झालेल्या तिमाही सर्वेक्षणात २९ टक्के मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांनी अर्थव्यवस्था कंपन्यांसाठी लाभाची आहे, असे म्हटले होते. तर यंदा हे प्रमाण वधारून ५६ टक्के झाले आहे. तर वर्षभरापूर्वी असे मत व्यक्त करणाऱ्यांचे प्रमाण ५० टक्के होते.
असे असले तरी या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांनी वाढत्या उत्पादन खर्चाबद्दल चिंता व्यक्त केल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्याचबरोबर डिझेल दरवाढीमुळे गेल्या काही कालावधीत त्याचा महागाईवर परिणाम झाल्याचेही यानिमित्ताने निदर्शनास आणले गेले आहे.
डिसेंबर २०१२ अखेरच्या चौथ्या तिमाहीत मात्र उद्योगांना भेडसावणारी निधीची चणचण दूर होऊन उत्पादनावर होणारा खर्चही या दरम्यान कमी होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. मल्टी ब्रॅण्ड रिटेल, हवाई तसेच प्रसारमाध्यम क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तार व डिझेलची किंमतवाढ आणि अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसवरील मर्यादा यासारखे निर्णय केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात आर्थिक सुधारणा राबविताना घेतले होते.
यानंतर निवृत्तीवेतनासाठी हे क्षेत्र खुले करतानाच विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादाही ४९ टक्क्यांपर्यंत नेले होते.

विश्वास ‘असोचेम’लाही!
स्थानिक पातळीवर आर्थिक मंदी असली तरी आणि जागतिक अस्तिथरता असली तरी येत्या सहा महिन्यात भारतीय उद्योग क्षेत्रातील व्यवसायात सकारात्मक बदल होतील, असा आशावाद ‘असोचेम’ या उद्योजकांच्या संघटनेनेही व्यक्त केला आहे. उद्योग मंदीतून बाहेर पडत असून आगामी कालावथीत त्यांची प्रगती चांगली असेल, असे त्यांना वाटते, असे संघटनेने म्हटले आहे.
‘असोचेम’ने विविध ३०० उद्योजकांचे मत जाणून केलेल्या सर्वेक्षणानंतर हे मत मांडले आहे. सप्टेंबरमध्ये असा आढावा घेताना बांधकाम, निर्मिती, वित्त, गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले होते. यामध्ये, गेल्या सहा महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेत फारसा चांगला बदल झाला नसला तरी येणाऱ्या दोन तिमाहींचा कालावधी उद्योगासाठी नक्कीच लाभकारी असेल, असे नमूद करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या दोन तिमाही उलटल्या असून आता चालू महिन्यापासून दोन तिमाही शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या कालावधीपेक्षा आताचा कालावधी किफायतशीर असेल, असे यात म्हटले गेले आहे.    

देशातील प्रमुख कंपन्यांच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांनी यंदा नोंदविलेली अर्थव्यवस्थेबद्दलची ही आशादायक पातळी गेल्या तीन महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. येथील उद्योग क्षेत्रात नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक सुधारणांनी वातावरण उंचावले आहे. तसेच भारतीय बाजारपेठेतील विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा रसही अधिक वाढला आहे.
मोहन रामास्वामी,
मुख्य अधिकारी, डन अ‍ॅन्ड ब्रॅडस्ट्रीट.

वाढता उत्पादन खर्च, अधिक व्याजदराने मिळणारे अर्थसहाय्य, सुमार पायाभूत सुविधा तसेच प्रकल्प सुरू होण्यास अडथळे ठरणारे नियामकांचे मुद्दे आदी उद्योगांसाठी चिंतेचे आहेत. मात्र आता उद्योग आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठी चांगला कालावधी असेल, असेच मत सर्वत्र व्यक्त होत आहे.
राजकुमार धूत, अध्यक्ष, ‘असोचेम’.