‘बॅंक ऑफ महाराष्ट्र’च्या उलाढालीचे ‘सीमोल्लंघन’! Print

प्रतिनिधी , पुणे
‘बँक ऑफ महाराष्ट्र’ ने एक लाख ५१ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करून उलाढालीचे ‘सीमोल्लंघन’ केले आहे. हा टप्पा पार केल्यामुळे बँकेचा मध्यम आकाराच्या (मीडियम साईज) बँकेमध्ये समावेश झाला असल्याची माहिती, बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग यांनी मंगळवारी दिली. अध्र्या वर्षअखेरीनंतर बँकेच्या कामगिरीची माहिती देताना नरेंद्र सिंग म्हणाले, ‘‘ग्रामीण भागातील २४ शाखांसह गेल्या सहा महिन्यांत ४९ शाखा नव्याने सुरू करण्यात आल्या असून देशभरातील शाखांची संख्या १ हजार ६३८ झाली आहे. सध्या बँकेच्या २७ राज्यांसह दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये शाखा असून लवकरच नागालँड आणि मणिपूर येथे शाखा सुरू करण्यात येणार आहेत. पुण्यामध्ये लोकमंगल शाखा येथे कॉईन व्हेंडिंग मशिन, चेक डिपॉझिट मशिन आणि सेल्फ अपडेट पासबुक या सुविधा देणारे एटीएम सेंटर सुरू करण्यात आले आहे. सरकारमान्य ५५१ शाळांमध्ये स्वच्छतागृहांसाठी बँकेने पुढाकार घेतला आहे.’’