तिढा किंगफिशरचा ; आता काय? Print

बँकांपुढे प्रश्न; कर्मचारी ठाम
व्यापार प्रतिनिधी , मुंबई
alt

कर्मचारी आणि व्यवस्थापना दरम्यान मासिक वेतनाचा तिढा कायम असल्याने किंगफिशर एअरलाईन्सला देणी कशी वसूल करायची, या ऐरणीच्या प्रश्नावर आता वाणिज्य बँका एकत्र आल्या आहेत. कंपनीकडे असलेले ७,५०० कोटी रुपयांचे कर्ज कसे मिळवायचे याबाबत वित्त पुरवठा करणाऱ्या स्टेट बँकेसह १७ विविध बँकांची लवकरच बैठक होणार आहे.कर्मचारीरुजू होत नसल्याने वेळोवेळी वाढविलेल्या टाळेबंदीची नवी मुदत मंगळवारीच (२३ ऑक्टोबर) संपली. ती आता येत्या गुरुवापर्यंत पुन्हा लांबविण्यात आली आहे. या दरम्यान कर्मचाऱ्यांनी वेतन अदा करण्याचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन कंपनीने केले आहे. संघटनेने मात्र त्याकडे फिरकूनही पाहिलेले नाही.
कंपनीला कर्ज देणाऱ्या राष्ट्रीयकृत पंजाब नॅशनल बँकेचे अध्यक्ष के. आर. कामथ यांनीही या बैठकीबाबत दुजोरा दिला. या परिस्थितीतून कसे बाहेर यायचे, याची चर्चा येणाऱ्या बैठकीत होईल, असेही ते म्हणाले. भारतीय स्टेट बँकेच्या मुंबईतील मुख्यालयातही याच महिन्याच्या सुरुवातील बँकप्रमुख आणि किंगफिशरचे वरिष्ठ अधिकारी यांच्या दरम्यान चर्चा झाली होती. कंपनीमार्फत निधी पूर्ततेचे आश्वासन मिळत असल्याने वेळोवेळी कारवाई न करण्याचा निर्णय बँकांनी घेतला होता. नागरी हवाई महासंचालनालयाने कंपनीला परवाना रद्द करण्याबाबत नोटीस पाठविल्यानंतर स्टेट बँकेने कंपनीची खाती खुली करून ६० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती.
किंगफिश कंपनीवर जानेवारी २०१२ पासून बँकांच्या ७,५०० कोटी रुपयांच्या कर्जासह ८ हजार कोटी रुपयांच्या नुकसानीचाही भार आहे. परिणामी कंपनीची विविध करदेयकेही थकली असून कंपनीने मार्चपासून आपल्या कर्मचाऱ्यांनाही मासिक वेतन दिलेले नाही. कंपनीतील कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यात वेतन देण्याची तयारी व्यवस्थापकाने दाखविली आहे. मात्र त्याला कर्मचारी संघटनेचा विरोध कायम आहे. याअंतर्गत मार्चचे वेतन गुरुवारीच तर एप्रिलचा पगार ३१ ऑक्टोबरपूर्वी आणि मेचा दिवाळीपूर्वी (११ नोव्हेंबर) करण्यात येईल, असे कंपनीने गृहित धरले आहे. उर्वरित जून ते सप्टेंबरचे वेतन कंपनीला कुणी अर्थसहाय्यकारी मिळाल्यानंतरच दिले जाईल, अशी भूमिका कंपनीने घेतली आहे. तर चालू ऑक्टोबर महिन्याचा पगार देईपर्यंत डिसेंबर तर नोव्हेंबरचा जानेवारी २०१२ मध्ये उजाडेल, असे कंपनीने म्हटले आहे. किंगफिशर एअरलाईन्सला २६ ऑगस्ट २००३ रोजी हवाई परवाना बहाल केला होता. त्याची मुदत ३१ डिसेंबर रोजीच संपत आहे. दरम्यान, नागरी हवाई महासंचालनालयाने कंपनीचा परवाना ५ नोव्हेंबपर्यंत स्थगित ठेवला आहे. याबाबतचा निर्णय गेल्याच आठवडय़ात घेण्यात आला होता. कंपनीला परवाना रद्द करण्याबाबत पाठविण्यात आलेल्या नोटीशीला उत्तर न दिल्याने हे पाऊल उचलण्यात आले होते.