सोने तारण ठेवून कर्ज; गरजवंतांकडून मागणी वाढली Print

कंपन्यांपेक्षा बँकांचा व्याजदर कमी, पर्यायही अधिक
वीरेंद्र तळेगावकर ,मुंबई ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

सोने खरेदीबरोबरच मौल्यवान धातूच्याच्या बदल्यातील कर्जमागणीही गेल्या काही दिवसांमध्ये वाढत आहे. पिवळ्या धातूला असलेला ३१ हजारी भाव आणि अल्प कालावधीसाठीच्या निधी पुर्ततेची गरज यामुळे ‘सोन्याच्या बदल्यात कर्ज’ हा नवा पर्याय जोर धरू लागला आहे. सोने तारणानंतर वित्तपुरवठय़ाचा व्याजदर मात्र कंपन्यांच्या तुलनेत बँकांचा कमी असून त्यांच्याकडून अधिक पर्यायही कर्जदारांना दिले जात आहेत.


‘सोन्याच्या बदल्यात कर्ज, तेही सर्वात कमी व्याजदरात’ या जाहिरातींची भुरळ गेल्या काही दिवसांमध्ये अधिक पडू लागली आहे. या क्षेत्रात मालकी समजले जाणाऱ्या बिगर बँकिंग वित्त कंपन्यांकडून गेल्या काही दिवसांमध्ये ठेवींवर आकर्षक परतावा देऊ केल्याने त्यांच्या अपरिवर्तनीय रोख्यांनाही मागणी वाढली. परिणामी, मुथूट फायनान्स, मण्णपुरम यासारख्या बिगर बँक वित्त कंपन्यांनी सोने बदल्यात कर्ज या पारंपारिक व्यवसायावर अधिक भर दिला. अल्पावधीच्या निधीची गरज या माध्यमाद्वारे भागविण्याकडे सोनेधारकांकडे कल वाढतो आहे, असा बिगर बँकिंग वित्त कंपन्यांचा दावा आहे.
१० ग्रॅमसाठी सोने दर ३५ हजार रुपयांपर्यंत गेल्यानंतर तर या कंपन्यांकडून सोने तारणावर दिले जाणारे कर्ज व्याजदरही कमालीचे कमी झाले आहेत. त्यांच्यामार्फत सध्या वार्षिक १२ ते २७ टक्क्यांपर्यंत कर्ज मिळते. तर कालावधीही ६ महिने ते ३ वर्षांचा आहे.
तुलनेत राष्ट्रीय आणि खाजगी बँकांमार्फतही हा व्यवसाय अधिक जोम धरत आहे. बँकांच्या एकूण कर्ज वितरणापैकी कोणे एकेकाळी ७ टक्के प्रमाण सोने तारणाच्या बदल्यात कर्जासाठी राखले असताना आघाडीच्या खाजगी बँकांमार्फत ते आता थेट १२ टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे. शिवाय बँकांचा सोने तारणाचा व्याजदरही वार्षिक १०.४५ ते १७ टक्के आहे. बँकांद्वारे दोन महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी कर्ज दिले जाते. बिगर बँक वित्त कंपन्यांना सोने मूल्याच्या केवळ ६० टक्क्यांपर्यंतची कर्ज पुरवठा मर्यादा असली तरी बँका मात्र ८० टक्क्यांपर्यंत सोने बदल्यात वित्तीय पुरवठा करू शकतात. शिवाय बँकांकडे कर्जासाठी तारण म्हणून दागिन्यांबरोबरच नाणीही ठेवता येतात. ती सुविधा बिगर बँकिंग वित्त कंपन्यांकडे नाही. त्यांच्याकडे केवळ दागिनेच ठेवून कर्ज घेता येते. दोन्ही माध्यमातून १८, २०, २२ तसेच २४ कॅरेटचे सोने तारण ठेवता येते. दोन्ही यंत्रणेमार्फत सोनेधारकाचे कर्ज मंजुर करताना विविध प्रमाणात प्रक्रियाशुल्क आकारले जाते.    
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतियेच्या निमित्ताने होणारी सोने खरेदी सर्वाधिक मानली जाते. यंदाच्या एप्रिलमधील या मुहूर्तदिनीही देशभरात ४२ टन खरेदी झाली. १० ग्रॅम सोन्याचा दर होता २१,८१५ रुपये.
याच मुहूर्ताला भारतात सर्वाधिक सोने खरेदी २००८ मध्ये झाली होती. (म्हणजे लेहमन ब्रदर्सच्या रुपाने आलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या कालावधीपूर्वी.) तोळ्याला २८,८८५ रुपये भाव असताना यावेळी ५५ टन सोनेखरेदी केली गेली.
गुंतवणुकाचा सर्वोत्तम पर्याय म्हणून पिवळ्या धातूला असलेली मागणीही निराळे क्रम रचत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची खरेदी १० ते १५ टक्क्यांनी कमी झाली आहे; मात्र त्यातुलनेत नाणी आणि बार यांची खरेदी ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
देशात कच्च्या तेलानंतर पिवळे सोने सर्वाधिक आयात केले जाते. यानंतरही क्रमांक लागतो तो रासायनिक खतांचा. २०११ मध्ये ९३३.४० टन सोने आयात करण्यात आले होते. ८० च्या दशकात ६५ टन, ९० च्या दशकात ४०० टनपर्यंत आयात होणारे सोने २०१० मध्ये १ हजार टनच्याही वर गेले होते.
जागतिक पातळीवर २,००० टनपेक्षाही अधिक सोन्याचे उत्पादन घेतले जात असताना भारतातून अवघी २ टनपर्यंतची निर्मिती होते. यंदाच्या एप्रिलपासून सोने आयात काही प्रमाणात कमी झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांवर नवा कर, बिगर स्टॅण्डर्ड सोन्यावरील आयात शुल्क ५ वरून १० व नाण्यांवरील २ वरून थेट ४ टक्क्यांवर केल्यामुळे यात घट झाली आहे.

सोने तारण कर्ज तुलना
                           तारण पर्याय       व्याजदर                  मूल्याच्या तुलनेत पुरवठा    कालावधी    
बिगर बँक वित्त कंपन्या    केवळ दागिने      १२ ते २७ टक्क्यांपर्यंत       ६० टक्के       ६ महिने ते ३ वर्षांपर्यंत     
राष्ट्रीय/खाजगी बँका        दागिन्यांसह नाणीही   १०.४५ ते १७ टक्क्यांपर्यंत    ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत  २ महिने ते ३ वर्षांपर्यंत

उदा. समजा ३० हजार रुपये तोळा असा सोने दर गृहित धरला तर २४ कॅरेटच्या एका ग्रॅमच्या सोने बदल्यात बिगर बँक वित्तीय कंपन्यांमार्फत कर्ज मिळते ते १,८०० रुपये तर बँकांकडून  त्यासाठी अधिक, २,४०० रुपये मिळते.
सोने तारण कर्जावर ०.०२ ते १.५ टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्कही आकारले जाते.

सेन्सेक्स  १८७१०.०२  (-८३.४२)
निफ्टी       ५६९१.४० (-२५.७५ )

वधारले
एल अ‍ॅण्ड टी    १.९१%
आयसीआय.बँक    ०.५३%
हिंदुस्थान यूनि.    ०.२२%
कोल इंडिया    ०.१८%
सिप्ला    ०.१८%

घसरले
जिंदाल स्टील    -२.४३%
हीरो मोटोकॉर्प    -१.९०%
हिंदाल्को    -१.५६%
इन्फोसिस    -१.४२%
आयटीसी    -१.२९%

मल्टी कमॉडिटी एक्स्चेन्जच्या स्टॉक एक्स्चेन्जने अवघ्या सहा आठवडय़ांमध्ये ७०० सदस्यांची नोंदणी केली आहे. इतक्या कमी कालावधीत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नोंदणी होणे हे यंदा प्रथमच घडत आहे.
- जोसेफ मॅसी,
एमसीएक्स-एसएक्सचे सीईओ (सोमवारी मुंबईमध्ये)