मल्टीनॅशनल कंपन्यांचे धोरण Print

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

भारतात औषधांचं मोठं मार्केट आहे. त्याचंही आकर्षण या मल्टीनॅशनल कंपन्यांना आहे. एॅलोपॅथी औषधाला पर्याय म्हणून आयुर्वेदिक औषधे अनेक देशांतून स्वीकारली जात आहेत.
आर्थिक सुबत्तेच्या बळावर महासत्ता बनलेले देश, आपले हे स्थान अढळ राहावे म्हणून काय वाट्टेल ते करतात. प्रसंगी युध्दाची धमकी देऊन वेळ आल्यास इतर छोटया मोठया देशांवर युध्द लादले जाते. येथील राजवट उलथून टाकली जाते. हे सारे काही आपले हितसंबंध जपण्यासाठीच केले जाते. अशाप्रकारची वर्तवणूक महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांचीही असते. या मोठया कंपन्या आपल्याला अडचणीच्या ठरवू पहाणाऱ्या दुसऱ्या कंपन्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना त्या स्थिरावू देत नाहीत. या प्रतिस्पर्धी कंपन्यांची उत्पादने आरोग्यास हानिकारक आहेत. त्यातील अमूक अमूक द्रव्ये शरीराला अपाय करतात. अशाप्रकारचे जावईशोध या मल्टीनॅशनल कंपन्या लावतात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. या मल्टीनॅशनल कंपन्या एवढया सामथ्र्यवान असतात की त्यांच्यापुढे काही देशातील सरकारांना झुकावेच लागते. तसे झाले की आपल्याला पाहिजे तसे बदल व कायदेकानून करण्यास या कंपन्या यशस्वी होतात.
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतातही अशा प्रकारची खेळी अनेकवेळा खेळलेली आहे. त्यांचे उद्देश कधीकधी सफल झाले. अर्थात भारत सरकार आपल्या धोरणांच्या बाबतीत ठाम असल्याने या कंपन्यांची डाळ फारशी शिजली नाही. मात्र एक गोष्ट नक्की, पायाभूत सुविधांच्या बाबतीत आम्ही अजूनही खूप मागे आहोत. या गोष्टीची जाणीव मल्टिनॅशनल कंपन्या आम्हाला पदोपदी करुन देत असतात. या मल्टीनॅशनल कंपन्यांची दृष्टी आता आमच्या औषध कंपन्यांकडे वळली आहे. भारतात औषधांचं मोठं मार्केट आहे. त्याचंही आकर्षण या कंपन्यांना आहे. आमच्याकडेही औषधे बनविण्याऱ्या ख्यातनाम कंपन्या आहेत. त्यातून निर्माण होणारी औाषधे आम्ही परदेशी पाठवतो. त्याचबरोबर आयुर्वेद व इतर ‘फॉर्मस् ऑफ अल्टरनेट मेडिकल ट्रिटमेंट’ आमच्याकडे चांगल्यापकी विकसित झाल्या आहेत.
एॅलोपॅथी औषधाला पर्याय म्हणून ही औषधे अनेक देशांतून स्विकारली जात आहेत. आम्ही अनेकप्रकारची आयुर्वेदिक औषधे निर्यात करतो.  मध्यंतरी काही आयुर्वेदिक औषधांमध्ये हेवी मेटल्स् जास्त प्रमाणात आहेत अशी ओरड करण्यात आली. काही देशांनी ही औषधे आयात करण्यास बंदी घातली. जगातील बनावट औषधांपकी जवळजवळ ३० ते ३५ % औषधे भारतीय असतात अशा स्वरुपाचा प्रचार या मल्टिनॅशनल कंपन्या करीत आहेत. वास्तविक बनावट औषधींचा डेटा आमच्याकडेही काही प्रसिध्द व कार्यक्षम संस्थांमध्ये जमा केला जातो. त्याच्या माहितीप्रमाणे हे प्रमाण केवळ ० ते ०.४५% पेक्षाही कमी आहे. अशी बनावट औषधे किंवा ज्याला ‘सबस्टॅण्डर्ड’ म्हणता येईल, अशी औषधे फार मोठया प्रमाणावर निर्माण होत नाहीत. आमच्याकडेही काही राज्यातील विशेषत: केरळ व महाराष्ट्र या राज्यात अशी औषधे आढळून आली. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. काही आंतराष्ट्रीय बंधनांमुळे अशा स्वरुपाच्या घटनांबाबत काही कारवाई करता येत नाही. नियामक एजन्सीची हीच अडचण आहे.
भारतातील औषध कंपन्या पुरेशा सक्षम आहेत. आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.
- संजीव पेंढरकर
(लेखक विकोचे संचालक आहेत.)
ई-मेल : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it