दर्दी मुंबईकरांची खरेदीसाठी गर्दी.. Print

व्यापार प्रतिनिधी , मुंबई ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
alt

वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करून मुंबईकरांनी अखेर दसऱ्याच्या निमित्ताने खरेदीवर विजय मिळविलाच. उद्योग, व्यापाऱ्यांसह चाकरमान्यांमध्येही गेल्या अनेक दिवसांपासून असलेले निराशेचे वातावरण खरेदीचा हंगाम सुरू झाल्याच्या निमित्ताने पार बदलून गेले होते.नटण्या-मुरडण्यापेक्षा गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे कल वाढत असल्याचे बुधवारी दिवसभर सराफ दुकानांमधून दिसत होते. त्यामुळे दागिन्यांपेक्षा वळे अथवा सोन्याची नाणी पसंत केली जात होती.

नाण्यासाठीही दुकानांबरोबरच बँकांमध्येही व्यवहार नोंदले जात होते. दसऱ्याची सुटी असूनही अनेक बँकांच्या शाखा खास यासाठी सुरू ठेवण्यात आल्या होत्या. ‘बॉम्बे बुलियन असोसिएशन’च्या दफ्तरी सोने तोळ्यामागे काल १०० ते १२५ रुपयांपर्यंत घसरून ३१ हजाराच्या आत विसावले असले तरी प्रत्यक्ष मुंबई, ठाणे, कल्याणसह अनेक दुकांनांमध्ये ते १० गॅ्रमसाठी ३१,६०० रुपयांच्या पुढे विकले जात होते, अशी माहिती उमेश धोत्रे यांनी दिली. किलोसाठी ६० हजाराच्या आतील चांदी  पुन्हा ७५ हजारांपर्यंत जाईल, या विश्वासावर पांढऱ्या धातूचीही खरेदी होत होती.
दसऱ्याच्या निमित्ताने नव्या निवाऱ्याचा शोधही मुंबईकरांनी थांबविलेला नाही, हेही दिसून आले. शहरातील बांधकाम क्षेत्रात जानेवारीपासून फारशी मागणी नसली तरी चौरस फूटांमागे दर काही कमी होत नाही, हे पाहून आताही गुंतवणूक वाईट नाही, असाच कल अनेक विकासकांकडे विजयादशमीच्या दिवशी झालेल्या नोंदणीतून दिसून आला.
वन बीएचकेपेक्षा अधिक आकाराची आणि सर्व अत्याधुनिक सुख-सोयींसह सादर करण्यात आलेले निवासी प्रकल्प मध्यमवर्गीयाकडून पारखले जात असून ते खरेदीही केले जात असल्याचे निरिक्षण नोंदविण्यातोले आहे. विकासकही दर कमी करीत नसले तरी जोडीला देणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करीत असल्याचे आणि ते बिंबवित असल्याने घरखरेदी एक गुंतवणूक पर्याय म्हणूनही स्वीकारत आहेत. पश्चिम उपनगरासह कल्याण, बदलापूर, अंबरनाथपुढील नव्या प्रकल्यांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. तुलनेने नवी मुंबई मागे पडली आहे.
सध्या सर्वत्र मंदीचे वातावरण असताना तुलनेने घरांसाठीची विचारणा आणि नोंदणी समाधानकारक असल्याचे विकासक पारस गुंडेचा यांनी सांगितले. मंदी सरली, हे आता सुरू झालेले चित्र येत्या कालावधीतही कायम असेल, असेही ते म्हणाले.    
नव्या उत्पादनांमुळे यंदा ‘बुकिंग’
गेल्या अनेक महिन्यांपासून वाहन उद्योग हा निराशेच्या गर्तेतच आहे. एप्रिल-मेपासूनची वाहन कंपन्यांच्या विक्रीची आकडेवारी सतत नकाराच्या दिशेने आहे. यंदा मुंबईसारख्या वाहतूक कोंडीत इंधनदरवाढीनेही घाम काढला असतानाच दसऱ्याच्या शुभदिनी तुलनेने मात्र समाधानकारक वाहनांसाठीची नोंदणी झाली आहे. नव्या उत्पादनाचाही यात सिंहाचा वाटा असल्याचे ‘फोर्टपॉईंट’चे संदीपकुमार बाफना यांनी सांगितले. वाहनांसाठीच्या मागणीचा ओघ गेल्या आठवडय़ात अधिक दिसला, असेही ते म्हणाले.