मुकेश अंबानी यांचे अढळपद कायम! Print

मालमत्ता घसरूनही सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक एकचे अब्जाधीश
वृत्तसंस्था, मुंबई

रिलायन्सचे मुकेश अंबानी हे यंदा पुन्हा अब्जाधीश भारतीयांच्या पंक्तीत सर्वोच्च स्थानावर कायम आहेत. मालमत्तेत घसरण होऊनही सलग तिसऱ्या वर्षी त्यांनी वरचे स्थान टिकवून ठेवले आहे. विशेष म्हणजे धाकटे बंधू अनिल अंबानी यांचे स्थान यंदा दोन पायऱ्यांनी उंचावले असून ते ६ अब्ज डॉलरच्या संपत्तीचे मालक आहेत.
‘फोर्ब्स इंडिया’च्या अब्जाधीशांच्या जाहीर झालेल्या यादीत  मुकेश अंबानी यांचे २१ अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह पहिले स्थान कायम आहे. गेल्या वर्षभरात त्यात १.६ अब्ज डॉलरची घट झाली आहे. लक्ष्मीविलास मित्तल हे दुसऱ्या स्थानी आहेत. मात्र त्यांचीही व्यक्तिगत मालमत्ता यंदा ३ अब्ज डॉलरने घटली आहे आणि अंबानी यांच्यापेक्षा ती ५ अब्ज डॉलरने कमी आहे. तर ‘टॉप टेन’मध्ये एरव्ही सातत्याने स्थान मिळविणारे सुनिल भारती मित्तल आणि गौतम अदानी हे अनुक्रमे १२ व्या व १६ व्या स्थानावर गेले आहेत.
१०० श्रीमंत भारतीयांची संपत्ती यंदा ३.७ टक्क्यांनी वधारली आहे. ती आता २५० अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी १०० अब्जाधीशांची मालमत्ता २० टक्क्यांनी घसरली होती. एकूण अब्जाधीशांची संख्याही यंदा आधीच्या ५७ वरून ६१ एवढी झाली आहे.    
मल्ल्या यांना वाईट काळ
‘किंग ऑफ गुड टाईम्स’ म्हणून ओळखले जाणारे किंगफिशरचे मल्ल्या मात्र अब्जाधीशांच्या यादीतून यंदा बाहेर फेकले गेले आहेत. भारतीय श्रीमंतांच्या फोर्ब्सच्या नामावलीत मल्ल्या हे ७३ व्या स्थानावर असले तरी त्यांची मालमत्ता ८० कोटी डॉलरच्या आत असल्याचे दाखविण्यात आले आहे. विशेष म्हणजे किंगफिशर जमिनीवर येण्याआधी, गेल्या वर्षीच्या यादीत १.१ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह मल्ल्या ४९ व्या स्थानावर होते. ‘किंगफिशरवरील २ अब्ज डॉलरच्या कर्जभारामुळे मल्ल्या यांचा या यादीसाठी वाईट काळ सुरू आहे’, असे फोर्ब्सने म्हटले आहे.
अब्जाधीश      संपत्ती     (कोटी रु.)
मुकेश अंबानी     १,११,३००
लक्ष्मी मित्तल    ८४,८००
अझीम प्रेमजी    ६४,६६०
पालनजी मिस्त्री    ५१,९४०
दिलिप संघवी    ४८,७६०
अदि गोदरेज    ४७,७००
सावित्री जिंदाल    ४३,४६०
रुईया बंधू    ४२,९३०
हिंदुजा बंधू    ४२,४००
कुमारमंगलम बिर्ला    ४१,३४०
अनिल अंबानी    ३१,८००