किंगफिशर संपकरी कर्मचारी कामावर रुजू Print

 

उड्डाणांना मात्र महिना लागणार
कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचा थकलेला पगार डिसेंबपर्यंत मिळणार
पीटीआय , नवी दिल्ली - शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२

वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने अखेर कर्मचाऱ्यांचा चार महिन्यांचा थकलेला पगार येत्या डिसेंबपर्यंत देण्याचे मान्य दिले. त्यामुळे गेल्या २६ दिवसांपासून कंपनीत सुरू असलेला संप गुरुवारी मागे घेण्यात आला आहे. कंपनी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधींमध्ये झालेल्या करारानुसार, कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार येत्या २४ तासांत दिला जाणार असून एप्रिलचे वेतन ३१ ऑक्टोबपर्यंत, मेचे वेतन दिवाळीपूर्वी आणि जूनचे वेतन डिसेंबरअखेरीस अदा केले जाणार आहे, तर जुलै ते सप्टेंबपर्यंतचा थकलेला पगार पुढच्या मार्चपर्यंत दिला जाणार आहे.

त्यामुळे एअरलाइन्सचे विमानचालक आणि अभियंत्यांसह सर्व कर्मचारी ताबडतोब कामावर रुजू होणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांनी सांगितले.
या करारानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असला, तरी किंगफिशरची विमाने मात्र आणखी दोन-तीन आठवडे तरी जमिनीवरच राहणार आहेत. किंगफिशरची ढासळलेली आर्थिक स्थिती आणि विमानप्रवासाच्या सुरक्षेच्या मुद्दय़ावर या कंपनीचा वाहतूक परवाना निलंबित करण्यात आलेला आहे.    

हे विमान उडते अधांतरी..
* ३० सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांचा संप, १ ऑक्टोबरला लागलेली टाळेबंदी आणि त्या नंतर ‘डीजीसीए’ने निलंबित केलेले ‘शेडय़ुल्ड ऑपरेटर्स परमिट’ (विमान वाहतूक परवाना) यामुळे किंगफिशरची विमाने जमिनीवरच आहेत. या कंपनीला २६ ऑगस्ट २००३ रोजी परवाना देण्यात आला होता. त्याची मुदत येत्या ३१ डिसेंबरला संपणार आहे.
* गेल्या वर्षांच्या प्रारंभी किंगफिशरच्या ताफ्यात तब्बल ६६ विमाने होती. आता केवळ सात एअरबस ए-३२० आणि तीन एटीआर टबरे प्रॉप्स अशी दहाच विमाने शिल्लक आहेत.
* आठ हजार कोटींचा तोटा आणि सात हजार ५२४ कोटींचे कर्ज या गाळात किंगफिशरची चाके रुतली आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून किंगफिशरने कर्जाचे हप्तेही भरलेले नाहीत.

कर्मचाऱ्यांना ग्रांप्री पावली?
संपकरी कर्मचाऱ्यांना डिसेंबपर्यंत तीन महिन्यांचा थकीत पगार देण्यावरच अडलेल्या कंपनी व्यवस्थापनाने गुरूवारी अखेर चार महिन्यांचा पगार देण्याचे मान्य केले. त्याचे कारण लवकरच होत असलेल्या फॉम्र्युला वन ग्रांपीमध्ये दडलेले असल्याचे सांगण्यात येते. या स्पर्धेमध्ये विजय मल्ल्या यांची भागीदारी असलेला सहारा फोर्स इंडिया हा संघ सहभागी होणार आहे. त्यामुळे ऐन स्पर्धेच्या वेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी तेथे हंगामा करू नये, म्हणून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या अशी चर्चा आहे.
भरारी केव्हा?
गेल्या २६ दिवसांपासून सुरू असलेला कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने किंगफिशर व्यवस्थापनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र कंपनीचे विमाने उडण्यास किमान तीन ते चार आठवडय़ांचा अवकाश आहे. प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच कंपनीला आर्थिकदृष्टय़ा सबळ बनविण्याच्या दृष्टीने आपण पूर्णत सक्षम बनविणारी योजना किंगफिशरने ‘डीजीसीए’ला सादर करून पटवून द्यावी लागेल. या विमान वाहतूक नियामक प्राधिकरणाचे त्यातून समाधान झाले, तरच किंगफिशरला पुन्हा वाहतूक सेवा सुरू करण्याचा परवाना मिळू शकेल.