शेअर बाजार आठवडय़ाच्या नीचांकावर Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता, कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल तसेच रिझव्र्ह बँकेच्या आगामी पतधोरणात फारसे बदल न होण्याची अपेक्षा यामुळे गुंतवणूकदारांनी शुक्रवारी अखेरच्या दिवशी अधिक प्रमाणात नफेखोरी अवलंबिली. परिणामी १३३.२९ अंश घसरणीसह ‘सेन्सेक्स’ १८,६२५.३४ या आठवडय़ाच्या नीचांक पातळीवर आला. ४१ अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ ५,७०० च्याही खाली स्थिरावला.
रिझव्र्ह बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे पतधोरण येत्या मंगळवारी जाहीर होणार आहे. वाढता महागाई दर पाहता यंदा व्याजदर कपातीची अपेक्षा नसल्याचे यापूर्वीच अर्थतज्ज्ञांनी तसेच बँकप्रमुखांनी व्यक्त केले आहे. मात्र रोख राखीव प्रमाणासह अन्य दरांमध्ये पाव ते अर्धा टक्क्यांच्या कपातीची अपेक्षा आहे. याचा दबाव भांडवली बाजारात आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी प्रकर्षांने दिसून आला. दरम्यान, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांनी फायद्याचे तर पंजाब नॅशनल बँक, गेल यांनी नफ्यात घसरणीचे तिमाही निष्कर्ष जाहीर केले; त्याचा परिणामही या कंपन्यांच्या समभाग मूल्यांवर दिसून आला.

सिक्वेल लॉजिस्टिक्स व्होडाफोनच्या ‘बिग लीग’चे विजेते
लघु व मध्यम उद्योगक्षेत्राला चालना देण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून ‘व्होडाफोन’ने राबविलेल्या ‘ड्राइव्ह इन टू बिग लीग’ या वार्षिक मोहिमेचे यंदाच्या विजेतेपदाचा बहुमान मुंबईच्या सिक्वेल लॉजिस्टिक्सने पटकावला आहे. या कंपनीला बक्षीस स्वरूपात कल्पनातीत असे मानाचे पद प्राप्त होणार आहे. सिक्वेल लॉजिस्टिक्सचे बोधचिन्ह अतिथी प्रायोजक म्हणून बुद्ध इंटरनॅशनल सर्किट सुरू होत असलेल्या फॉम्र्युला वन रेसिंगमध्ये व्होडाफोन मॅक्लॅरेन मर्सिडिझ कारवर झळकविला जाणार आहे. शिवाय या रेसिंग निमित्ताने व्होडाफोनकडून २००९ पासून राबविल्या जाणाऱ्या ‘जॉइन द टीम’ स्पर्धेचे यंदा राहुल छाब्रिया, पार्थ दोषी हे दोन मुंबईकर विजेते ठरले आहेत. या ऑनलाइन व एसएमएसद्वारे घेतल्या गेलेल्या स्पर्धेने देशभरातून सहा लाखांहून अधिक उत्साही प्रतिसाद मिळविला.