मार्केट मंत्र : सणावळीची खरेदी करायची काय? Print

निमिष शाह - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

सण आणि खरेदी हे नाते इतके पक्के आहे की, सणासुदीला ग्राहकाकडून भाव पाहिला जात नाही. हेच पाहा ना, सोन्याच्या भावाने आकाश गाठले असतानाही यंदा दसऱ्याला त्याच्या खरेदीचा जोर कायम असल्याचे दिसून आले. शेअर बाजारातही दिवाळीपर्यंत खरेदीचा जोर कायम राहण्याबाबतची जी आशा आहे ती यासाठीच! तरी जशी चर्चा आहे त्याप्रमाणे शेअर उलाढाल कर (एसटीटी) कमी करण्याचा अर्थमंत्रालयाने निर्णय घेतलाच तर या खरेदीला आणखी बळ मिळेल यात शंकाच नाही. तूर्तास शेअर निर्देशांक सरलेला आठवडाच काय, पूर्ण महिनाभर आहे त्याच पातळीवर घुटमळताना दिसत आहे. कंपन्यांच्या तिमाही निकालांचा हंगाम हा यथातथाच असतानाही बाजाराने मोठी घसरण दाखविली नाही, हे नवलाचेच! काही स्टॉक स्पेसिफिक हालचाल निश्चितच आहे. विशेषत: चांगली तिमाही कामगिरीला बाजाराने डोईवर घेतल्याचे, तर वाईट कामगिरीवर बाजाराने  खुट्ट प्रतिसाद दिल्याचे आढळून आले आहे. लार्सन अॅण्ड टुब्रो, टीसीएस, केर्न इंडिया, आयटीसी, आयडिया, आयसीआयसीआय बँकेच्या चांगल्या निकालांना बाजाराने दाद दिली आहे. विदेशी वित्तसंस्था या शेअर्समध्ये दाबून खरेदी करीत आहेत. वॉखार्ट नवनवीन उच्चांक बनवीत आहे. औषध कंपन्यांचे शेअर्स हे अनिश्चिततेच्या स्थितीत सुरक्षितता बहाल करतात. म्हणूनच गुंतवणूकदारांचा वोखार्टसह पिरामल, डिव्हिज लॅब, ऑरबिंदो फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज्. कॅडिला हेल्थकेअरकडे ओढा सद्यस्थितीत अपरिहार्य दिसत आहे.
जागतिक स्तरावर फारशा नकारात्मक घडामोडी नसल्या, तरी जपानमधील वाढती वित्तीय तूट आणि स्पेनच्या बऱ्याच बँकांची ‘मूडीज्’कडून झालेल्या पतघसरणीचे प्रतिकूल पडसाद शेअर बाजारात उमटताना दिसले. आगामी महत्त्वाचा जागतिक संकेत हा नोव्हेंबरमधील अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा आणि त्याचा निकालाचा असेल. सुदैवाने हा निकाल आणि आपल्याकडचा दिवाळीचा सण एकाच समयी येत असून, तो पर्यंत बाजारात वरचा स्तर टिकून राहील असे दिसते. तांत्रिक विश्लेषणाच्या भाषेत बोलायचे झाल्यास निफ्टी निर्देशांक ५७२० पातळीवर काही दिवस तग धरत नाही, तोवर आगामी तेजीचा संकेत मिळत नाही. सध्या निफ्टीला जेमतेम ५७०० पातळी सांभाळता आली आहे, त्यापुढे मजल मारताना मात्र त्याची दमछाक होताना दिसत आहे.
मागे सुचविल्याप्रमाणे आयआरबी इन्फ्रामधून नफा कमावून बाहेर पडण्याचा सल्ला अनेक वाचकांना फलदायी ठरला असेल. तर याच स्तंभात १०० रुपयांवर शिफारस केलेल्या ‘टीबीझेड’नेही २२० पर्यंत मजल मारली आहे. सणांचे दिवस असल्याने ग्राहकोपयोगी उत्पादने, वस्त्रोद्योग, रंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये स्वाभाविक तेजी दिसून येत आहे. आगामी आठवडय़ात रिझव्र्ह बँकेचे पतधोरण हा बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाचा घटनाक्रम आहे. बाजाराची दोलायमानता आणि वध-घटीचे चक्र या आठवडय़ातही कायम राहील. त्यामुळे कटाक्षाने ‘स्टॉप लॉस’ आणि नफा दिसत असल्यास तो आंशिक स्वरूपात कमावून घेण्याचे धोरण गुंतवणूकदारांनी पाळायला हवे. अल्पकालीन खरेदी म्हणून परसिस्टंट सिस्टीम योग्य वाटतो.