श.. शेअर बाजाराचा : पॉवरफुल पॉवर ऑफ अॅटर्नी Print

चंद्रशेखर ठाकूर - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

‘ब्रोकरला पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन मी पस्तावलो’ असे अनेक जण सांगतात. मात्र पॉवर ऑफ अॅटर्नीचे तत्त्वच कुणी लक्षात घेत नाही. शेअर्सची खरेदी किंवा विक्री करायची तर डिमॅट खाते असणे हे आवश्यक आहे हे सर्वानाच माहीत आहे. शेअर्स विकायचे असतील तर फोनवरून आपण दलालाला सूचना देऊ शकतो म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या ऑफिसमध्ये जायची गरज नाही. पण पुढील कार्यवाही म्हणजे डिलीव्हरी इन्स्ट्रक्शन स्लिप घेऊन डीपीकडे जाणे ही होय. मात्र तेवढी देखील तसदी घ्यायची नसेल तर आपण आपल्या दलालालाच पॉवर ऑफ अॅटर्नी देऊ शकतो. तसे केल्यास माझ्याऐवजी दलाल इन्स्ट्रक्शन स्लिप भरील. अनेक वेळा आपण एखादी बाब सोय आणि सुलभता म्हणून करायला जातो आणि नेमकी तीच आपल्या त्रासाचे कारण बनते. ब्रोकरने मला फसवले अशा प्रकारचे अनुभव शेकडो गुंतवणूकदार ग्राहक मेळाव्यात मला सांगत असतात. ‘ब्रोकरला पॉवर ऑफ अॅटर्नी देऊन मी पस्तावलो’ असे अनेक जण सांगतात. मात्र पॉवर ऑफ अॅटर्नीचे तत्त्वच कुणी लक्षात घेत नाही. प्रथमत: एक गोष्ट अनेक गुंतवणूकदार समजून घेत नाहीत की जी काही पॉवर ऑफ अॅटर्नी त्यांनी आपल्या ब्रोकरला दिलेली असते ती केवळ डिमॅट खाते ऑपरेट करण्यासाठी असते. याचा अर्थ माझ्या डिमॅट खात्यातून शेअर्स ट्रान्सफर करण्यासाठी जी डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप भरावी लागते ती माझ्या वतीने माझा ब्रोकर भरू शकतो इतकेच! बरे जेव्हा मला वाटेल तेव्हा मी पण ती स्लिप भरू शकतो. पॉवर ऑफ अॅटर्नी दिली म्हणजे मी काही माझे हक्क गमावून बसत नाही. कारण शेवटी माझ्या डिमॅट खात्याचा मीच मालक आहे!
तथापि ब्रोकरला पॉवर ऑफ अॅटर्नी देताना एक काळजी जरूर घ्यावी. ती म्हणजे पॉवर ऑफ अॅटर्नी ‘जनरल’ न देता ‘लिमिटेड पर्पज’ द्यावी. लिमिटेड पर्पजचा अर्थ असा की, मी ५० टाटा मोटर्सचे शेअर्स माझ्या दलालामार्फत विकले असतील तर माझा दलाल माझ्या डिमॅट खात्यातून फक्त ५० टाटा मोटर्सचे शेअर्स आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेऊ शकेल, एक शेअर्सदेखील जास्त नाही. दोन्ही प्रकारच्या पॉवर ऑफ अॅटर्नीचे मसुदे डीपीकडे उपलब्ध असतात. अनेक वेळा असे होते की, आपला डीपी (जिथे माझे डिमॅट खाते आहे) आणि ब्रोकर हे एकच असतात. परंतु त्याला दिलेली पॉवर ऑफ अॅटर्नी डिलिव्हरी इंस्ट्रक्शन स्लिप भरण्यापुरतीच आहे, मी सूचना दिल्याशिवाय माझा ब्रोकर माझेसाठी शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, हे लक्षात घेतले जात नाही. उपरोक्त पॉवर ऑफ अॅटर्नी दिल्यामुळे उगीचच आपण समजून चालतो की, ब्रोकर त्याला वाटेल तेव्हा माझ्यासाठी शेअर्स खरेदी करील किंवा विकेल. याबाबत स्टॉक एक्स्चेंजने एक परिपत्रक काढले आहे त्यात याविषयी स्पष्ट खुलासा केलेला आहे.
यावरून लक्षात येईल की, मनमानी करायला ब्रोकरला अधिकार नसतो. पण जेव्हा मी खरेदी केलेल्या शेअर्सचे पसे वेळेवर जर माझ्या ब्रोकरला दिले नाहीत तर ब्रोकर स्टॉक एक्स्चेंजला पसे कुठून देणार? अशा प्रसंगी मात्र मी सूचना देऊन खरेदी केलेले शेअर्स ब्रोकर विकून टाकणार. अर्थात या दोन व्यवहारातून मी काही देणे ब्रोकरला लागत असेन तर ते देणे माझ्यावर बंधनकारक असते हे उघड आहे. याचा अर्थ असा होत नाही की, मी सांगितल्याशिवाय ब्रोकरने शेअर्स विकले. ब्रोकरकडे ट्रेिडग अकाउंट उघडताना जे करारावर आपण सही करून देतो त्यात तसा उल्लेख असतोच. पण बऱ्याच गुंतवणूकदारांच्या बाबतीत असे घडते की, ब्रोकरच्या ऑफिसमधील कुणीतरी विशेष ओळखीचा माणूस ग्राहकाने न सांगताही शेअर्स खरेदी करतो व नियमानुसार २४ तासांच्या आत ग्राहकाला काँट्रक्ट नोट (बिल) पाठवतो. हातात काँट्रक्ट नोट येताच ग्राहकाला कळून येते की मी न सांगताच असा व्यवहार झाला आहे. अशा प्रसंगी तातडीने करायची गोष्ट अशी की त्या ब्रोकरची तक्रार संबंधित स्टॉक एक्स्चेंजकडे करायला हवी. पण बहुतांश गुंतवणूकदार हे करीत नाहीत आणि मग काळ सोकावतो! कित्येक मंडळी तर मला अशीही भेटली की जी काँट्रक्ट नोट वाचून पाहायचीही तसदी घेत नाहीत. अर्थात तो व्यवहार गुंतवणूकदाराला मान्य आहे असाच अर्थ निघतो कारण शेवटी बोलतात ते कागद !
नुकतेच सेबीने देखील या बाबतीत स्पष्ट निर्देश दिले आहेत जेणेकरून ब्रोकर ग्राहकाच्या वतीने आपणहून व्यवहार करू शकत नाही. अनेकवेळा ग्राहक फोनवरून खरेदी विक्रीची सूचना देतात. अशा प्रसंगी ऐकण्यात चूक होऊ शकते. उत्तम म्हणजे ईमेलद्वारे किंवा लेखी स्वरूपात सूचना दिल्यास असा प्रसंगच ओढवणार नाही.  ब्रोकर आणि गुंतवणूकदार यांच्यात जो करार झालेला असतो त्यातील प्रत्येक कलम नीट वाचून मगच सही केली पाहिजे पण बहुतांश मंडळी ब्रोकर कागदावर  फुली मारून देईल तिथे सह्या करून मोकळे होतात!