वेतनासाठी अंतर्गत स्रोतातून निधी जुळवणार : किंगफिशर Print

पीटीआय, नवी दिल्ली

तब्बल महिनाभर संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीच्या चार महिन्यांचा  पगार देण्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद ही अंतर्गत रचनेतूनच करण्यात आल्याचा दावा किंगफिशर एअरलाईन्सने केला आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी नागरी हवाई महासंचालकांनी भेटून आर्थिक तरतूद तसेच उड्डाण वेळापत्रकाबाबत लवकरच योजना सादर करू, असे या अध्र्या तासाच्या चर्चेत बिंबविले. तर कंपनीने याबाबत आपल्या भागधारकांसह संचालक मंडळालाही कल्पना द्यावी, असे नागरी हवाई संचालकांनी सांगितले.
संपकरी कर्मचाऱ्यांमुळे २६ दिवसांची टाळेबंदी जाहीर कराव्या लागणाऱ्या किंगफिशरसमोरील तिढा अखेर गुरुवारी सुटला. कंपनीने मार्च ते जून या महिन्यांचे वेतन डिसेंबरअखेपर्यंत देण्याचे निश्चित केले आहे. ४ हजार कर्मचाऱ्यांना देण्यासाठी ८० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. याबाबतची कल्पनाही कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांनी नागरी हवाई महासंचालक अरुण मिश्रा यांना दिली. मिश्रा यांनीही कंपनीला वेतन योजनेची कल्पना आपल्या भागधारकांना द्यावी, असे सांगतिले.
किंगफिशरला कर्मचाऱ्यांना वेतन देता यावे यासाठी तिला १,३०० कोटी रुपयांचे कर्ज देणाऱ्या स्टेट बँकेने तिची गोठविण्यात आलेली बँक खाती खुली करण्याची तयारी दाखविली होती. तसे झाल्यास यामाध्यमातून किमान ६० कोटी रुपये तरी उभे राहतील, असा अंदाज आहे. विमानतळाच्या वापरासाठीचा सेवा कर न भरल्यापोटी कंपनीची ही खाती कर विभागाने काही महिन्यांपूर्वी गोठविली होती.