मल्ल्यांना ‘व्हर्जिन’ शुभेच्छा! Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई

रंगेल स्वभावासाठी विजय मल्ल्या भारतात चांगलेच ओळखले जातात. जागतिक पातळीवर ब्रिटनचे रिचर्ड बॅ्रन्सन हे नावही यासाठीच घेतले जाते. मात्र व्यवसाय चालविण्याच्या बाबतीत दोघेही भिन्न! एकीकडे मल्ल्या यांच्या किंगफिशरचे पंख कर्जाच्या बोझ्याने छाटली गेली असताना बॅ्रन्सन यांच्या व्हर्जिन अॅटलांटिकने नव्या उमेदीने आकाशात झेप घेण्याचा विडा उचलला आहे. मिचमिच्या डोळ्याचे आणि लाल-गोबरे बॅ्रन्सन शुक्रवारी भारतीय पोषाखात मुंबई उपनगरात टॅक्सीवर ढोल घेऊन भांगडय़ासह आनंदोत्सवात साजरा केला. हाती होता भारतीय तिरंगा तर सोबतीला अपरिहार्य अशा भारतीय आणि विदेशी नारीही!
ब्रिटनमध्ये रेल्वे वाहतुकीसह हवाई सेवेतही अग्रेसर असलेल्या ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन अॅटलांटिकची मुंबई ते लंडन ही विमान सेवा येत्या रविवारपासून पुन्हा सुरू होत आहे. त्याचीच जाहीर घोषणा आणि शुभारंभासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते आले होते. तूर्त केवळ नवी दिल्ली ते लंडन असाच प्रवास होणाऱ्या व्हर्जिनची मुंबई - लंडन हवाई सेवा तीन वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. हवाई क्षेत्रात किंगफिशर, जेट तसेच एअर इंडिया यांचा बाजारहिस्सा कमी होत असताना व्हर्जिनने आता मुंबईबरोबरच हैदराबाद, बंगळुरु आणि गोवा येथूनही उड्डाणे घेण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. कंपनीची मुंबईहून लंडनसाठीची उड्डाणे एअरबस ए३३०विमानाद्वारे होतील; यासाठी कंपनीने ३० कोटी पौंडाची गुंतवणूक व १४० जणांना रोजगार देऊ केला आहे. किंगफिशरच्या मल्ल्या यांच्याबद्दल ते म्हणाले की, ‘कंपनीबद्दल काय चुकीचे झाले आहे, हे माहित नाही; मात्र त्यांना मी भविष्याबद्दल शुभेच्छा देऊ इच्छितो.’ भारतीय हवाई क्षेत्रात ४९ टक्क्यांपर्यंत थेट विदेशी गुंतवणूक खुली करण्याच्या निर्णयावर मात्र त्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.    
‘किंगफिशर’मध्ये काय चुकीचे घडले सांगता येत नाही; मात्र त्यांना (मल्ल्या यांना) मी भविष्याबद्दल शुभेच्छा देऊ इच्छितो.’
रिचर्ड बॅ्रन्सन