‘टेलिनॉर’ला भारतात सापडला नवा सोबती Print

 

पीटीआय , नवी दिल्ली - शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२

बांधकाम क्षेत्रातील यूनिटेकबरोबर सामोपचाराने काडीमोडानंतर नॉर्वेच्या टेलिनॉरला भारतातील दूरसंचार क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लक्षदीप इन्व्हेस्टमेन्ट्स अॅण्ड फायनान्सच्या रूपाने नवीन भागीदार मिळाला आहे. शुक्रवारी येथे त्यासंबंधाने उभयतांकडून करारही केला गेला. पूर्वाश्रमीची भागीदार कंपनी यूनिटेक वायरलेसपासून फारकत घेतल्यानंतर, टेलिनॉरने ‘टेलिविंग्स कम्युनिकेशन्स’ नावाने आपल्या भारतीय अंग स्थापित केले असून, लक्षदीपला या कंपनीत २६ टक्के भागीदार केले गेले आहे.

‘यूनिनॉर’मध्ये यापूर्वी ६७.२५ टक्के हिस्सा राखणाऱ्या टेलिनॉरने आता नव्या व्यवसायात ७४ टक्के हिस्सा आपल्या ताब्यात ठेवला आहे. कंपनीने नव्याने दूरसंचार परवान्याबाबत स्वारस्य दाखविले असून, विद्यमान ‘यूनिनॉर’ सेल्युलर सेवा ब्रॅण्डच्या अस्तित्वाबाबत अथवा नव्या नावाबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजचे मुख्य प्रवर्तक व व्यवस्थापकीय संचालक दिलिप संघवी यांच्या पत्नी विभा यांचे लक्षदीपचे प्रवर्तक सुधीर वालिया हे बंधू आहेत. ही भागीदारी वालिया यांची स्वतंत्र गुंतवणूक असे जरी यानिमित्ताने स्पष्ट करण्यात आले असले तरी वालिया यांचा सन फार्मामध्ये ०.७४% हिस्सा आहे. तर त्यांच्या पत्नी रक्षा वालिया यांचा सन फार्मामध्ये १.६८% हिस्सा आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे टूजी ध्वनिलहरींचे २२ परवाने रद्द झाल्यानंतर टेलिनॉरने यूनिटेकबरोबरची भागीदारी संपुष्टात आणण्याची घोषणा केली होती. फसवणूकप्रकरणी नुकसान भरपाईच्या टेलिनॉरच्या मागणीला मात्र यूनिटेकने आव्हान दिले होते. अखेर हा प्रश्न न्यायालयाबाहेर नुकताच सामोपचाराने सोडविण्यात      आला. यानंतर यूनिटेकने यूनिनॉरमधील सर्व ३२.७५ टक्के हिश्श्याची टेलिनॉरला विक्री केली.     
दूरसंचारात वाढते ‘औषध’ स्वारस्य
काही दिवसांपूर्वीच पिरामल हेल्थकेअरने देशातील दुसऱ्या क्रमांकाची व्होडाफोन या दूरसंचार कंपनीत ११ टक्के हिस्सा खरेदी केला होता. व्होडाफोनमधून एस्सार समूह बाहेर पडल्याने हा व्यवहार झाला होता. चांगल्या परताव्याच्या दृष्टीने ही अल्प कालावधीतील गुंतवणूक आहे, असे त्यावेळी पिलामलचे अजय पिरामल यांनी म्हटले होते. नॉर्वेच्या टेलिनॉरबरोबर भागीदारी करीत देशातील औषध निर्माण क्षेत्रातील दुसरी कंपनी ‘सन फार्मा’ही दूरसंचार व्यवसायात अप्रत्यक्षपणे उतरली आहे. सन फार्मामधील किरकोळ भागधारक व मुख्य प्रवर्तक दिलिप संघवी यांच्या मेव्हण्याने टेलिनॉरच्या भारतीय व्यवसायातील २६ टक्के हिस्सा खरेदी करण्याची तयारी दर्शविली आहे.
भारत आणि चीन दरम्यान २०१५ पर्यंत १०० अब्ज डॉलरचा व्यापार होईल. चीनबरोबरचे व्यापारी संबंध वृद्धींगत होताना हे उद्दीष्ट गाठणे अशक्य होणार नाही. गेल्या वर्षांत हा व्यवहार ७५ अब्ज डॉलरपेक्षा अधिक राहिला आहे.
आनंद शर्मा,
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री (शुक्रवारी दिल्लीत)
सेन्सेक्स
१८६२५.३४
१३३.२९

निफ्टी
५६६४.३०
४१.००

वधारले
महिंद्र अॅण्ड महिंद्र    २.५७%
हीरो मोटोकॉर्प    १.६८%
बजाज ऑटो    १.३१%
गेल    ०.८३%
भेल    ०.७३%

घसरले
हिंदुस्थान यूनि.    -२.१४%
आयटीसी    -२.००%
सिप्ला    -१.८४%
डॉ. रेड्डीज् लेबो.    -१.५९%
रिलायन्स    -१.३९%