बाजारात सावध स्थिरता; नजर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणावर Print

व्यापार प्रतिनिधी, मुंबई
विशेषत: विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा पंचवार्षिक वित्तीय आराखडा आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भांडवली बाजारावर अनुकूल परिणाम साधण्यास अपयशी ठरला. उलट रिझव्‍‌र्ह बँकेच्या मंगळवारच्या अर्धवार्षिक पतधोरणाकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी व्यवहारातील सावध पवित्रा कायम ठेवला. परिणामी, ‘सेन्सेक्स’ अवघ्या १० अंशांनी १८,६३५.८२ पर्यंत, तर ‘निफ्टी’ १.३० अंश वाढीसह ५,६६५.६० वर स्थिरावला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खांदेपालटाच्या जोरावर सकाळच्या सत्रात नव्या सप्ताहाची सुरुवात तब्बल ११८ अंशांच्या वाढीने करणारा मुंबई निर्देशांक १८,७४३.४१ पर्यंत झेपावला होता. मात्र दिवसभरात ही तेजी बाजाराला राखून ठेवता आली नाही. दुपारच्या सत्रातही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट तसेच चालू खात्यातील तूट रोखण्यासाठी जाहीर केलेल्या उपाययोजनांवर बाजाराने  विशेष प्रतिक्रिया नोंदविली नाही. तमाम गुंतवणूकदारांची नजर रिझव्‍‌र्ह बँकेच्या उद्या जाहीर होत असलेल्या अर्धवार्षिक पतधोरणाकडे आहे. व्याजदराशी संबंधित बँक, बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचे मूल्य घसरताना दिसले.